आत्मभान देणारा विचारवंत : Page 7 of 7

मडंळाला उलट सलामी म्हणजे कोदण्डाचा टणत्कार या पुस्तकाचा उल्लेख पूर्वी आलाच आहे. भिक्षुकशाहीचे बंड ’, ‘ नोकरशाहीचे बंड अर्थात ग्रामण्याचा साद्यंत इतिहास , दगलबाज शिवाजी अशा पुस्तकांनी इतिहासाची , तर शनिमहात्म्य, धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म , हिंदू धर्माचे दिव्य , हिंदू धर्माचा हास आणि अधःपात अशा पुस्तकांनी धर्माची परखड चिकित्सा केली. पंडिता रमाबाई सरस्वती , श्री संत गाडगेबाबा , कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अल्पचरित्र ही त्यांची चरित्रपर पुस्तकं.

माझी जीवनगाथा हे त्यांचं आठवणीपर आत्मचरित्र आज विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय. त्यांच्या पूर्वप्रकाशित लेखांचे संग्रह आणि पुस्तिकाही ब-याच आल्या. त्यांनी शाहिर बनून लिहिलेले दोन पोवाडेही पुस्तिका रुपाने पाहायला मिळतात. त्यात स्वाध्याय संदेश आणि उठ म-हाठ्या उठ महत्त्वाची पुस्तकं. खरा ब्राम्हण , टाकलेलं पोर , संगीत विधिनिषेध , काळाचा काळ , संगीत सीताशुद्धी या त्यांच्या नाटकांनीही इतिहास घडवला. शिवाय त्यांनी सिनेमेही लिहिले. श्यामची आई , महात्मा फुले आणि माझी लक्ष्मी या आचार्य अत्रेंच्या सिनेमात त्यांनी अभिनयही केला.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, प्रभातकार वा. रा. कोठारी आणि सेनापती बापट या ज्येष्ठ नेत्यांना संयुक्त महाराष्ट्राचे पंचायतन म्हटले गेले. हे कोणत्याही पक्षात नव्हते. त्यांनी स्वतंत्रपणे संपूर्ण आंदोलनावर वचक ठेवला. हे आंदोलन लढलं जात असताना प्रबोधनकार सत्तरीच्या जवळ होते. पण त्यांनी व्याख्यानांचा धुरळा उडवला. त्यांची लेखणी तर बेडरपणे चालत होती. त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घेतलेली मुलाखत महत्त्वाची ठरली. पक्षभेद विसरून एकत्र आला नाहीत, तर काँग्रेस मुंबईसह महाराष्ट्र कधीच देणार नाही, हा बाबासाहेबांनी दिलेला इशारा कळीचा ठरला. त्यानंतर सगळे विरोधी पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत एकत्र आले आणि महाराष्ट्र घडला. त्यानंतर प्रबोधनकारांनी सर्व सार्वजनिक चळवळींचा राजीनामा दिला.

आणि शिवसेना

एका सार्वजनिक नवरात्रौत्सवात झेप घेणा-या वाघाचं प्रबोधनकारांनी काढलेले भव्यदिव्य चित्र छोटे बाळ आणि श्रीकांत पाहत होते. पुढे जाऊन तो वाघ तसाच्या तसा शिवसेनेचं बोधचिन्ह बनला. फक्त हे बोधचिन्हच नाही तर शिवसेना हे नाव, जय महाराष्ट्र हे घोषवाक्य, ज्वलंत मराठी अभिमानाची पताका आणि बहुजनी हिंदुत्ववाद हे सारं मुळात प्रबोधनकारांचंच. बाळासाहेबांनी प्रबोधनकांराचं वाणी, लेखणी आणि कुंचल्याचं कौशल्य उचललं. तर श्रीकांतजींनी त्यासोबत संगीतही घेतलं.

न्यूज डे सोडल्यानंतर कार्टूनिस्ट म्हणून गाजणारे बाळासाहेब शंकर्स विकली च्या धर्तीवर इंग्रजी साप्ताहिक काढण्याच्या तयारीत होते. प्रबोधनकारांनी सांगितलं नाही. मराठी व्यंगचित्र साप्ताहिक हवं. नावही सांगितलं, मार्मिक. मार्मिकने शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेला मराठीच्या अभिमानाचा नारा दिला तो प्रबोधनकारांनीच. शिवसेनेचा जन्म होण्याच्या जवळपास पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईतील परप्रांतियांच्या लोंढ्यावर प्रबोधनमधे लेख लिहिले होते. एवढंच नाही, तर स्थानिकांना नोक-या मिळाव्यात हे तत्त्व इंग्रज सरकारकडून मान्य करून घेतलं होतं.

२० नोव्हेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांचं निधन झालं. तेव्हा शिवसेना मुंबईत सत्तेवर होती. सुधीर जोशी मुंबईचे महापौर होते. त्यांची अंत्ययात्रा ही बाबासाहेब आंबेडकरांनंतरची मुंबईतली सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली गेली. घराच्या उंबरठ्याबाहेर चपलांचा ढीग, ही आपली संपत्ती आहे, असं मुलांना सांगणारे प्रबोधनकार नव्वद वर्षांचं एक श्रीमंत आयुष्य जगून समाधानाने थांबले होते.