आत्मभान देणारा विचारवंत : Page 4 of 7

पोकळी भरून काढत त्यांनी महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ नव्याने उभी करण्यात मोठं योगदान दिलं. पुढे सातारा गादीचे शेवटचे छत्रपती प्रतापसिंह यांची तत्कालीन ब्रिटिश धार्जिण्या ब्राम्हण सरदारांनी केलेली विटंबना आणि त्यात त्यांचा झालेला शेवट याची कहाणीही त्यांनीच पुढे आणली. त्यातून पश्चिम महाराष्ट्रात ब्राम्हणेतरी आंदोलनाचा पाया घातला गेला.

विशेषतः त्यांच्या पुण्यातल्या वास्तव्यात याला तेज आलं. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या तरुणांसोबत प्रबोधनकार आल्यामुळे ब्राम्हणवादी चळवळे गांगरून गेले. लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत आणि रामभाऊ यांनी गायकवाड वाड्यातल्या गणपतीत अस्पृश्यांचे मेळे नेले. तिथेच समता सैनिक संघाची स्थापना झाली. जातिभेद मोडून एकत्र पंगती मांडल्या गेल्या. यामागे एक महत्त्वाची प्रेरणा प्रबोधनकारांचीच होती. त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार, मेलेले गाढव घरासमोर टाकणं, मृत्युच्या खोट्या अफवा उठवणं असा त्रास झाला. पण ते त्याला पुरून उरले.

राजर्षींचा कोदंड   

या काळात ब्राम्हणेतर आंदोलनाचं नेतृत्व छत्रपती शाहू महाराज करत होते. प्रबोधनकारही व्याख्यानं देत गावोगाव हिंडत होते. शिवाय ठिकठिकाणच्या कागदपत्रांत ग्रामण्याचा इतिहास शोधत होते. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणी वर्तमानपत्रांची टीकेला जशास तसं उत्तर देण्यासाठी महाराजांनाही एक कलमबहाद्दर हवाच होता. या दोन महापुरुषांत पहिल्याच भेटीत अखंड स्नेह निर्माण झाला. वेदोक्त पुराणोक्त वाद असो की क्षात्रजगद्गुरु पीठाची स्थापना असो, प्रबोधनकारांनी पुरवलेल्या ऐतिहासिक दाखल्यांमुळे छत्रपतींना खूपच मदत झाली.

२१ साली प्रबोधनकारांना टायफॉइड निमोनिया झाला होता. तीन महिने आजार लांबल्यामुळे दर महिन्याचा पगार येत नव्हता. पैशाची अडचण होती. अशावेळेस एक वकील शाहू महाराजांचं पत्र घेऊन आले. एका विषयावर पुराणांच्या आधारे ग्रंथ लिहिण्यासाठी पाच हजारांचा चेक त्यात होता. पण त्यावर प्रबोधनकारांचं उत्तर होतं, पुराणे म्हणजे शिमगा, असं माणसारा मी आहे. छत्रपतींसारखा नृपती असे भलभलते विषय कसे सुचवतो. एखादी जात श्रेष्ठ ठरवल्याने. आपली जात कनिष्ठ ठरत नाही. मी थुकतो या चेकवर. ही छत्रपतींनी घेतलेली परीक्षा होती. ही इज द ओन्ली मॅन वुई हॅव कम अक्रॉस हू कॅन नॉट बी बॉट ऑर ब्राइब्ड ,’ असं सर्टिफिकेट महाराजांनी दिलं ते त्यामुळेच.

छत्रपतींचं चुकलं तिथे प्रबोधनकारांनी घणाघाती टीकाही केली. प्रबोधनच्या दुस-याच अंकात त्यांनी अंबाबाईचा नायटा हा स्फोटक लेख लिहिला. काही मराठा मुलांनी अंबाबाईची देव्हा-यात जाऊन पूजा केली होती. त्याबद्दल त्या मुलांना शाहूंनी शिक्षा केली होती. त्यामुळे प्रबोधकरांच्या लेखणीचा प्रसाद चाखवा लागला. क्षत्रिय शंकराचार्य बनवण्याविषयीही प्रबोधनकारांनी शाहूंना ठोकून काढलं होतं.

असं असलं तरी शाहूंनी प्रबोधनकारांवरचा लोभ तसाच ठेवला. एका रात्री दादर भागात एक गाडी कोदंडाला शोधत फिरत होती. शाहू महाराज प्रबोधनकारांना कोदंड म्हणून हाक मारत. ते प्रबोधनकारांकडे आले आणि शाहू महाराजांकडे घेऊन गेले. खूप रात्र झाली होती. महाराज आजारी होते. छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांचा इतिहास लिहेनच, अशी शपथ छत्रपतीनी आपल्या हातावर हात ठेवून घ्यायला लावली. सकाळी महाराजांच्या मृत्यूची बातमी आली.

प्रबोधनची पत्रकारिता

लहानपणी पनवेलला असतानाच प्रबोधनकारांना पॉकेट एनसाक्लोपेडिया नावाचं एक छोटं पुस्तक सापडलं. त्यातल काही माहितीपर भाग भाषांतर करून त्याकाळी लोकप्रिय असलेल्या ह. ना. आपटेंच्या करमणूक मध्ये पाठवला. तो छापण्यात आला. हरिभाऊंनी पत्र पाठवून आणखी लेख मागवले. आणि प्रबोधनकारांच्या लिखाणाला सुरूवात झाली. केरळकोकिळकार कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी पनवेलमुक्कामी लेखन आणि पत्रकारितेचे संस्कार प्रबोधनकारांवर केले. त्याआधी शाळेत असतानाच विद्यार्थी नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं. त्यासाठी एक घरगुती छपाई यंत्रही बनवलं. एका आठवड्याला पन्नास अंक छापले. चार पाच महिने चालवलं. पण प्रत्यक्षात त्यांच्या हाताला शाई लागली ती मुंबईच्या तत्त्वविवेचक छापखान्यात. १९०८ च्या सुमारास ते तिथं असिस्टंट प्रुफरिडर होते. तिथे असतानाच ते विविध ठिकाणी टोपण नावांनी लिहित. तर नावाने इंदुप्रकाश आणि ठाण्याचं