आत्मभान देणारा विचारवंत : Page 2 of 7

आणि श्रद्धा याचा तोल सांभाळला, तो या बालपणीच्या प्रभावामुळे होता. त्यांनी श्रद्धेची सालटी काढली पण ते कधीच अश्रद्ध झाले नाहीत.

या दोघांपेक्षाही अधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे बय म्हणजे आजी. वडिलांची आई. तिनं जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन साठ वर्ष सूईणीचं काम केलं. मी जन्मभर जातपात आणि हुंड्याचा विरोध केला, त्याची प्रेरणा ही बयच, असं प्रबोधनकार म्हणतात. शाळेतून परतताना एका महाराची सावली छोट्या केशवच्या अंगावर पडली. आता ठाकरे विटाळला, असं सोबतची ब्राह्मण मुलं ओरडू लागली. ते बयने ऐकलं. त्याच्यातल्याच अभ्यंकर नावाच्या मुलाला पुढे ओढलं. त्याची सावली केशववर पाडली. महाराच्या सावलीने महार होतो, तर ब्राह्मणाच्या सावलीने आमचा दादा ब्राह्मण झाला.

पुढे गावात एक महार जातीचे सुभेदार राहायला आले. इंग्रजी पाचवीत असलेले प्रबोधनकार त्यांच्या घरी जाऊन चहा पित. त्यामुळे गावात वादळ उठलं. तक्रार घेऊन येणा-यांना वाटेला लावलं. तुमच्यासारखं दारू पिण्यापेक्षा महाराघरची चहा वाईट नाही, असं सुनावलं. इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो, असं बलिप्रतिपदेला महारणी आरोळी ठोकत. तेव्हा त्यांना ठाकरेंच्या घरात ओटीवर रांगोळीच्या पाटांवर बसवून आणि दिव्याने ओवाळलं जात असे. मगच त्यांना त्यांची दिवाळी देण्यात येत असे. हे संस्कार खूप महत्त्वाचे होते. बय तिच्या उतारवयात दादरला वस्तीला असताना वारली, तेव्हा सगळ्या जातींचे हिंदू तसंच मुसलमान आणि ख्रिश्चनही खांदा द्यायला आले होते.

वडिल सीतारामपंत उर्फ बाळा असेच सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे. नोकरी गेली तरी न घाबरता हरहुन्नरीपणा जपत छोटे उद्योगधंदे केले. त्याचा प्रभाव प्रबोधनकारांवर मोठा होता. नऊ ते पाच मध्यमवर्गीय पांढरपेशा परोपजीवीपणाला त्यांनी आय़ुष्यभर चाट दिली. अनेक उद्योग केले, त्याचं मूळ सीतारामपंतांच्या शिकवणीत. गावात आग लागली की सगळ्यात आधी सीतारामपंतच सर्वस्व विसरून धावून जायचे. गावात प्लेग आला. तेव्हाही असेच धावून गेले. पण प्लेगने त्यांनाच गाठलं. वडील वारले तेव्हा प्रबोधनकार अवघे सोळा सतरा वर्षांचे होते.

पण वडिलांपेक्षाही आईचा प्रभाव मोलाचा होता. तिने अभ्यासाचे आणि स्वाभिमानाचे संस्कार दिले. वडिलांना ल़ॉटरी लागली. तेव्हा १५ रुपये पगार असताना लॉटरी ७५ रुपयांची होती. आपल्याला कष्टाचीच भाकरी हवी, असं आई म्हणाली. राजकीय कार्यकर्ते म्हणून हरामाचे हप्ते मागणा-यांना हे कोण सांगणार ? आईनेच त्यांना वाचनाची, विशेषतः वर्तमानपत्र वाचायची सवय लावली. त्यातून मराठी पत्रकारितेला नव्याने घडवणारा पत्रकार जन्माला आला.

ठाकरेंची जात सीकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. लहानपणी एखाद्या ब्राह्मण शाळूसोबत्याच्या घरी पाणी मागितलं की तो पाणी तपेलीतून आणायचा, ओटीच्या खाली उभा ठेवून ओंजळीत ओतायचा. मित्राची आई ती तपेलीही न धुता आत घेऊ द्यायची नाही. सुरुवातीला प्रबोधनकारांना हे कळायचं नाही. कळायला लागलं तेव्हा त्यांनी सोवळेपणाची टिगल उडवायला सुरुवात केली. ती जन्मभर उडवली.

वडिलांच्या कचेरीतल्या मंडळींनी एका ब्राह्णण बेलिफाच्या घरी धुंदूरमासानिमित्त प्रातर्भोजनाचा कार्यक्रम होता. वडिलांसोबत केशवही गेला होता. तेव्हा ब्राह्मणांची एक पंगत. दुसरी या दोन ठाकरेंची. तर भालेराव नावाचे आणखी एक कारकून तिसरीकडेच बसला. वाढणा-या बायका वरून टाकत. जेवण झाल्यावर वडील दोघांचे खरकटे स्वतःचा स्वच्छ करू लागले, तेव्हा केशव चिडला. हे ब्राह्मण आपल्याशी निराळेपणाने वागतात तर आपण त्यांना आपलेपणाने का वागवायचे, असा त्याचा सवाल होता. तेव्हा त्याचं वय होतं अवघं आठ वर्षं.

जीवनभर संघर्ष

वडिलांची नोकरी सुटल्यामुळे आणि पनवेलात पुढचं शिक्षण नसल्यामुळे शिक्षण थांबलं. त्यामुळे कधी बारामती तर कधी मध्य भारतातलं देवास अशी धावाधाव झाली. फीसाठी दीड रुपया कमी पडला म्हणून मॅट्रिकची परीक्षा देत आली नाही आणि वकील बनण्याचं स्वप्न अपुरं राहिलं. तेव्हापासून साईनबोर्ड रंगवणं, रबरी स्टॅम्प बनवणं, बुकबायडिंग, भिंती रंगवणं, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक असे उद्योग सुरू केले. हुन्नर असेल तर बेकारी कशाला, हे जगण्याचं ध्येयच होतं.

कधी नाटककंपनी, सिनेमाकंपनीत कामं केली. कधी गावोगाव