आत्मभान देणारा विचारवंत

विविधांगी आयुष्य जगलेल्या प्रबोधनकारांच्या आयुष्याची थोडक्यात ओळख करून दिलीय, प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक सचिन परब यांनी...

महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. त्यांची ओळख आहे सत्यशोधक आंदोलनातले एक बिनीचे समाजसुधारक आणि प्रभावी लेखक पत्रकार म्हणून. पण त्यांचं कर्तृत्व आणि प्रतिभा अनेक अंगांनी फुललेली. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, चळवळ्ये, शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही दशांगुळं उरणारं हे व्यक्तिमत्त्व. माडासारखं उंच वाढणं टाळून जगण्याचा चहुअंगाने अनुभव घेत वटवृक्षासारखा बहरणारा हा माणूस. जणू शंभर माणसांचं आयुष्य एकटा जगला.

समोर दिसणा-या अन्यायावर तुटून पडत त्यांनी विसाव्या शतकात महाराष्ट्राला नवं वळण लावलं. मूठभरांच्या घरात कोंडलेला सामर्थ्याचा प्रकाश आपल्या बुद्धिमत्तेने आणि चळवळींच्या मदतीने सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवला. महाराष्ट्राचे विचार आणि कृती, इतिहास आणि भूगोल बदलण्याचं श्रेय ज्यांच्या नावावर आहे, त्यात प्रबोधनकारांचं नाव खूप वर आहे. चाकोरीत फसणं मान्यच नव्हतं. त्यामुळे आजही एका विचारधारांचे आणि इझम्सचे चष्मे घालून त्यांच्याकडे नाही बघता येत. ते एकाचवेळी बहुजनवादी असतात आणि हिंदुत्ववादीही. प्रबोधनकार म्हणून आवडणा-यांना त्यांचं ठाकरे असणं पचलं नाही, तर ठाकरे म्हणून प्रेमात पडणा-यांना त्यांचं प्रबोधनकार असणं डाचत राहिलं. आणि त्यांचं कर्तृत्व कायम पडद्याआडच राहिलं.

बंडखोर बालपण

प्रबोधनकारांची जन्मतारिख १७ सप्टेंबर १८८५. जन्मगाव पनवेल. पण ठाकरेंचं मूळ गाव पाली. हे पाली मध्य प्रदेशातलं असल्याचा दावा केला जात. पण हे पाली म्हणजे आपलं अष्टविनायकांच्या गणपतीचं पाली. हे ठाकरेंचं कूलदैवत असल्याचा उल्लेख आहे. आजोबा भिकोबा धोडपकर देवीभक्त साधुपुरुष होते. पण शाक्तांचा सिद्धींच्या मागे लागून आलेला माणूसघाणेपणा त्यांच्याकडे नव्हता. उलट बावीस वर्ष केलेल्या पंढरीच्या वारीमुळे निस्पृह लोकसेवेचं व्रत त्यांनी पाळलं.

त्या काळात काही लोकांनी पैसे कमावण्यासाठी प्लेगदेवी बनवली होती. ती रेड्यावर बसून गावोगाव फिरून पैसे गोळा करत असे. भिकोबा म्हणजे तात्या अंगण झाडताना ती समोर आली. त्यांनी हातातला खराटा फक्त जमिनीवर आपटला आणि ती प्लेगदेवी पोटात मुरडा आला म्हणून गयावाया करू लागली. प्रबोधनकारांवर अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचे संस्कार तेव्हाच होत होते. आईचे वडील बाबा पत्की हे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ. पण त्यांचा पिंड शिवोपासनेचा आणि जनसेवेचा. सध्या पनवेलच्या आधीचे हार्बर लाइनवरचे एक स्टेशन लागतं, खांदेश्वर. त्या खांदेश्वराची स्थापना बाबांनीच केलेली. देवळाचा धर्म की धर्माची देवळे असा प्रश्न विचारणा-या प्रबोधनकारांनी रॅशनॅलिझम