थोडक्यात चरित्र: Page 5 of 7

जगत्समाचार या वृत्तपत्रांत लिहित होते. त्यानंतर  त्यांनी जळगाव इथे सारथी हे मासिक वर्षभर चालवलं.

पण त्यांच्या लेखणीला खरा बहर आला तो प्रबोधनमुळे. १६ ऑक्टोबर १९२१ रोजी हे पाक्षिक सुरू झालं. ब्राम्हण ब्राम्हणेतर वादात नव्या वादांना जन्म देण्यासाठी आणि आक्षेपांना उत्तर देण्यासाठी त्यांना स्वतःच्या मालकीचं नियतकालिक हवं होतं. A fortnightly Journal devoted to the Social, Religious and Moral Regeneration of the Hindu Society, असं ध्येय असणा-या प्रबोधनला राजकारणाचं वावडं मुळीच नव्हतं. त्याकाळात सरकारी नोकराला स्वतःचं मासिक काढता येत नसे. पण आपल्या कामात अतिशय वाकबगार असलेल्या प्रबोधनकारांना ब्रिटिश सरकारने प्रबोधन काढण्याची विशेष सवलत दिली. पण आपल्या मतस्वातंत्र्याचा संकोच होतोय, असं वाटल्यावर त्यांनी लवकरच सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.

सामाजिक सुधारणांना पांढरपेशा समाजाच्या पुढे नेत बहुजनसमाजापर्यंत पोहोचवणारं प्रबोधन आगरकरांच्या सुधारकच्याही काही पावलं पुढे गेलेलं होतं, असं मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिताना रा. के. लेले सांगतात. प्रबोधनकारांच्या शैलीविषयी ते म्हणतात, त्यांच्या वाणीच्या आणि लेखणीच्या शैलीला महाराष्ट्रात जोड सापडणे कठीणच ! त्यांचा नुसता टोला नव्हे, तर सणसणीत प्रहार असे. वाचणा-याच्या अंगाचा तिळपापड व्हावा अशी त्यांची भाषा असे. पण ती अधिक बाळबोध, सोपी आणि अस्सल मराठमोळा वळणाची होती.

महाराष्ट्रावर प्रबोधनचा खप आणि प्रभाव प्रचंड होता. त्याने आपल्या अवघ्या पाच सहा वर्षांच्या कालावधीत बहुजनवादी पत्रकारितेला मान्यता, वलय आणि विचारांचं प्रौढत्व मिळवून दिला. त्यामुळे प्रबोधन बंद पडल्यानंतरही प्रबोधनकार हे बिरुद त्यांच्यामागे नावासारखं सन्मानानं येऊन चिकटलं. आगरकरांचा वसा पुढे नेण्यासाठी त्यांनी पुण्यात असताना लोकहितवादी नावाचं साप्ताहिकही वर्षभर चालवलं.

प्रबोधन बंद पडल्यानंतर त्यांनी स्वतःचं पत्र काढलं नाही. पण ते सतत लिहित राहिले. मालती तेंडुलकरांच्या प्रतोदचे ते वर्षभर संपादक होते. कामगार समाचारा पासून अग्रणीपर्यंत आणि विजयी मराठा पासून कंदिलपर्यंत अनेक नियतकालिकांत ते लिहित राहिले. नवा मनू मधील तात्या पंतोजीच्या घड्या , पुढारीमधील शनिवारचे फुटाणे , नवाकाळमधील घाव घाली निशाणी , लोकमान्यमधील जुन्या आठवणी आणि बातमीदारमधील वाचकांचे पार्लमेंट अशी त्यांची अनेक सदरं गाजली. शेवटच्या काळात ते प्रामुख्याने मार्मिकमधून लिहित होते.

कर्मवीरांचे गुरू

ब्राम्हणेतर आंदोलनासाठी सातारा पिंजून काढताना भाऊराव पाटलांशी गाठ पडली. भाऊरावही प्रबोधनकारांप्रमाणेच सेल्समन. ते टायकोट घालून किर्लोस्करांचे नांगर विकायचे. पण अस्पृश्यांना शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेसाठी त्यांनी वाहून घेतलं. त्यांचा कामाचा सर्व आराखडा प्रबोधनकारांसमवेत दादरच्या खांडके बिल्डिंगमधेच तयार झाला. साता-यात नांगरांचा कारखाना सुरू करायचा आणि त्यातून मिळणा-या पैशांवर बोर्डिग उभी करायची असा प्लान होता. त्यासाठी उद्योजक खानबहाद्दूर धनजी कूपर यांनी पाडळी येथे कारखाना सुरू केला. तिथेच छापखाना सुरू करण्यासाठी प्रबोधनकारही पोहोचले. पण या कारखान्यातून ना बोर्डिंगला पैसे मिळाले ना प्रबोधन दीर्घकाळ छापता आलं.

कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कामाला जेव्हा कधी अडचण आली तेव्हा प्रबोधनकार उभे राहिले. बोर्डिंगमधल्या मुलांसाठी घरोघर जाऊन धान्यही मागितलं. रयत शिक्षणाची कल्पना माझी असली तरी त्या बीजाला चैतन्याचे, स्फूर्तीचे नि उत्साहाचे पाणी घालून त्याला अंकुर फोडणारे आणि सुरुवातीच्या काळात धीर देऊन विरोधाचे पर्वत तुडवण्याचे मार्ग दाखवणारे माझे गुरू फक्त प्रबोधनकार ठाकरे. ते माझे गुरू तर खरेच. पण मी त्याना वडिलांप्रमाणे पूज्य मानतो. ’, असं कर्मवीरांनी प्रबोधनकारांविषयी म्हटलंय. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते ख-या अर्थाने कोण असेल तर कर्मवीरच. असा माणूस प्रबोधनकारांना