थोडक्यात चरित्र: Page 3 of 7

फिरून ग्रामोफोन विकले. कधी विमा कंपनीत प्रचारक बनले. कधी शाळेत शिकवलं तर कधी इंग्लिश स्पीकिंगचे क्लास चालवले. खासगी कंपन्यांमधे सेल्समन आणि पब्लिसिटी ऑफिसर म्हणून तर ते विख्यात होते. कधी पत्रकारांना वक्त्यांची भाषणं उतरवून देण्याचं काम केलं तर कधी निवडणुकीतील उमेदवारांना जाहिरनामे लिहून दिले. पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यात शॉर्टहँड टायपिस्ट ते रेकॉर्ड सेक्शनचे हेडक्लार्क अशी दहा वर्षं सरकारी नोकरीही केली. तेवढाच थोडा स्थैर्याचा काळ. नाहीतर संपूर्ण आयुष्य संघर्ष धावपळ सुरूच होता. पत्रकारिता, लेखन, छपाई हाच उत्पन्नाचा प्रमुख मार्ग होता.

नाटककंपनीत असताना गुप्तेंच्या रमाशी लग्न झालं. वर्षं होतं, जानेवारी १९१० आणि ठिकाण अलिबागजवळचं वरसोली गाव. दादरला बि-हाड टाकलं ते वांद्र्याला मातोश्री बंगल्यात जाईपर्यंत. पण ते विंचवाचंच होतं. कधी भिवंडी तर कधी अमरावती अधी संसाराची धावपळ सुरूच होती. त्यांनाना एकूण दहा मुलं. चार मुलगे आणि सहा मुली. शिवाय रामभाऊ हरणे आणि विमलताई यांना पोटच्या मुलांसारखंच वाढवलं. बाळासाहेब मार्मिकनंतर स्थिरस्थावर झाले, तेव्हा अगदी उतारवयात जगण्यासाठीचा संघर्ष थांबला.

हुंडा विध्वंसक संघ

प्रबोधनकारांची पहिली चळवळ इंग्रजी शाळेत असतानाची. गाडगीळ नावाचे उत्तम शिकवणारे अपंग शिक्षक होते. त्यांना हंगामी म्हणून काढून टाकण्यात आले. त्यासाठी इंग्रजी पाचवीत शिकणा-या केशवने विद्यार्थ्यांच्या सहीचा अर्ज म्युन्सिपाल्टीला केला. आणि त्यांची नोकरी वाचवली.

अगदी लहान असतानाच जरठ बाला विवाहात जेवताना मुद्दामहून म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान हे पद गात असत. आपल्याच वयाच्या म्हणजे दहा बारा वर्षांच्या मंजू या बालमैत्रिणीचे लग्न पासष्ट वर्षांच्या म्हाता-याशी लावलं म्हणून लग्नाचा मांडव त्यांनी पेटवून दिला होता.

प्रबोधन सुरू असताना दादरलाच खांडके बिल्डिंगमधे स्वाध्यायाश्रमाला सुरूवात झाली. प्रबोधनच्या अंकांच्या पॅकिंगसाठी महिन्यातून दोनदा अनेक तरुण रात्र जागवीत. हे सगळे प्रबोधनकारांच्या मुशीत तयार झाले. त्यातून स्वाध्याय आश्रम आणि गोविंदाग्रज मंडळ सुरू झालं. या संस्थांनी व्याख्यानं, पुस्तक प्रकाशनं तर केलीच पण हुंडा विध्वंसक संघाचं काम मोठ्या प्रमाणात केलं. हुंडा घेऊन लग्न होत असेल तिथे हे तरुण निदर्शनं करत. गाढवाची वरात काढत आणि हुंडा परत द्यायला भाग पाडत. विशेष म्हणजे यात तयार झालेले अनेक कार्यकर्ते पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सुरुवातीच्या काळात आघाडीवर राहिले.

महिला उत्थानाच्या कामात प्रबोधनकार नेहमीच आघाडीवर राहिले. महिलांच्या शिक्षणासाठी ते आग्रही होतेच. गोव्यातली देवदासी पद्धत कायद्याने बंद व्हावी म्हणून तिथल्या गवर्नर जनरलला पहिलं निवेदन दिलं गेलं ते प्रबोधनकारांच्याच नेतृत्वात. प्रबोधनकारांनी वीस पंचवीस विधवा विवाहही लावून दिले होते.

ब्राम्हणेतर आंदोलन

प्रबोधनकारांना व्यसन एकच बुकबाजीचं. आधीच पिंड चळवळ्या. क्रांतिकारी विचारांचे संस्कार घरातूनच झालेले. त्यात लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर आणि इंगरसॉल यांच्या वाचनाने मांड पक्की झाली. त्यात राजवाडे प्रकरण उद्भवलं.

भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या वर्षाचा अहवाल लिहिताना इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी मराठेशाहीच्या –हासासाठी ब्राम्हणेतरांना, विशेषतः कायस्थांना जबाबदार धरलं होतं. मात्र सत्य तसं नव्हतंच. इतिहाससंशोधनाच्या नावाने सत्य दडपून ब्राह्मणेतरांचा स्वाभिमान पायदळी तुडवण्याचे प्रकार पेशवाईपासून सातत्याने घडतच होते. राजवाडेंच्या इतिहाससंशोधनातल्या तपश्चर्येची इतकी दादागिरी होती, की त्याला विरोध करण्यात कुणीच समोर येत नव्हतं. अशावेळेस कसाबसा तेहतीस वर्षांचा एक तरुण शड्डू ठोकून उभा राहिला. प्रबोधनकार मैदानात उतरले. त्यांनी कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारतीय इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी असा तडाखेबंद ग्रंथ लिहिला. त्यात मराठेशाहीतलं ब्राह्णणेतरांचं उज्ज्वल कार्य आणि –हासास कारणीभूत ठरलेला ब्राम्हणांचा जातीयवाद याचं उत्तम विवेचन होतं. हे सारं इतकं साधार होतं, की राजवाडे त्याला उत्तरही देऊ शकले नाहीत. ब्राम्हणवादी इतिहासपद्धतीला त्यामुळे खीळ बसली आणि मराठ्यांच्या नव्या इतिहासलेखनाचा पायंडा पडला.

फक्त पुस्तक लिहून प्रबोधनकार शांत बसले नाहीत. ते त्याच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात नागपूरपासून बेळगावपर्यंत गावोगाव फिरले. त्यात ते ब्राम्हणेतर चळवळीकडे आकर्षिले गेले. ब्राम्हणेतरांचं वैचारिक नेतृत्वाची