गणपती, प्रबोधनकार आणि शिवसेना

नव्या पिढीला प्रबोधनकारांची आठवण नाही, असं म्हटलं जातं. पण तरुण पत्रकार सचिन परब यांनी हे म्हणणं खोटं ठरवलंय. जमाना इंटरनेटचा आहे. या आधुनिक आणि प्रभावी माध्यमातून प्रबोधनकारांचं समग्र साहित्य जगभर पोचवावं ही परब यांचीच कल्पना. त्यातूनच ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ ही वेबसाईट तयार झाली. वेबसाईटचे संपादक असलेल्या परब यांनी या लेखातून बेधडक प्रबोधनकारांची स्फूर्तीदायक आठवण जागवली आहे.

१९२६ सालचा दादर सार्वजनिक गणेशोत्सव. टिळक पुलाच्या दक्षिणेला तेव्हा मोकळ्या असलेल्या जागेवर मोठ्या मंडपात गणपती आणला होता. पहिलाच दिवस. प्राणप्रतिष्ठेची पूजाही झाली नव्हती. कारण टिळक पुलावर चळवळ्या तरुणांचा मोठा गट रावबहाद्दूर बोले यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन अस्पृश्य व्यक्तीच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात यावी, अशी मागणी करत होता.

दादरच्या फूलबाजाराजवळचा सेनापती बापट रोड आणि भवानी शंकर रोडला जोडणारा रस्ता ज्यांच्या नावाने आहे, ते मुंबईचे माजी महापौर डॉ. मो. चि. जावळे तेव्हा दादर सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष होते. त्यांच्या गणपती मंडळावर ब्राह्माणांचे वर्चस्व असल्याचा आरोप होता. त्यामुळे छत्रपती शाहूंच्या प्रेरणेने आंबेडकरांच्या मार्गदर्शनात ब्राह्मणेतर तरुणांचा मोठा गट दादरला याचा विरोध करत होता. 'अस्पृश्य समजले जाणारे हिंदूच असल्याने त्यांनाही सार्वजनिक उत्सवातील गणेशमूतीर्चे पूजन करण्याचा हक्क असला पाहिजे', अशी लेखी मागणीच त्यांनी केली. ही मागणी रेटण्यासाठी तरुणांचा जमाव टिळक पुलावर जमला होता. त्यांना रोखण्यासाठी आलेली माहीम पोलिस स्टेशनमधील तुकडी गो-या सार्जंटच्या नेतृत्वाखाली छबिलदास हायस्कूलच्या बांधकाम सुरू असलेल्या नव्या इमारतीच्या तळमजल्यावर आली होती.

पुण्यात ब्राह्मणेतर आंदोलनाचा डंका वाजवून प्रबोधनकर ठाकरे तेव्हा नुकतेच दादरच्या मिरांडा चाळीत पुन्हा राहायला आले होते. बोलेंनी त्यांना निरोप पाठवताच आणि आपल्या बेधडक स्वभावानुसार त्यांनी त्या पाच-सहाशे तरुणांना सोबत घेऊन मंडपात घुसायला सुरुवात केली. रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांना फर्ड्या इंग्रजीत कायद्याच्याच भाषेत चूप करून मंडपाबाहेर घालवले. चळवळीच्या पुढा-यांची भाषणे सुरू झाली आणि जावळेंचा गट १२ वाजताच्या मुहुर्तावर पूजा कशी होणार या विवंचनेत होता. प्रबोधनकार भाषणाला उभे राहिले. 'अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेशपूजनाचा हक्क बजावू देण्याचा निर्णय जावळे कमिटीने तीन वाजेपर्यंत घेतला नाही, तर मी स्वत: ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन.'

प्रबोधनकारांच्या या दणक्याने जावळेंनी तडजोडीची बोलणी सुरू केली. आंबेडकर आले. मार्ग निघाला. आधी रिवाजानुसार ब्राह्मण पुजा-याने गणेशाची प्राणप्रतिष्ठेची शास्त्रोक्त पूजाअर्चा केली. त्यानंतर आंबेडकरांचे सहकारी मडकेबुवा (यांचे नाव परळ चौकाला देण्यात आले आहे) यांनी प्लाझा गार्डनच्या नळाखाली अंघोळ करून पुष्पगुच्छ पुजा-याच्या हाती दिला आणि तो टाळ्यांच्या गजरात गणपतीला वाहिला गेला. नंतर पूर्ण उत्सव नीट पार पडला. पण शेवटच्या रात्री जावळेंनी घोषणा केली की यापुढे दादर सार्वजनिक गणेशोत्सव बंद.

उत्सव बंद पडल्यामुळे नाखुश असलेल्या प्रबोधनकारांनी बोलेंच्या बंगल्यावर बैठक बोलावली. त्यात त्यांनी मांडलेली भूमिका एकदम वेगळी होती. ते म्हणाले, 'महाराष्ट्राची मुख्य देवता श्री मायभवानी. तिच्या दरवाजात सगळ्यांना मुक्तद्वार. श्रीशिवरायांपासून तिचाच उत्सव महाराष्ट्राचा राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतोय. पेशवाईच्या नि त्यांच्या गणेश दैवताच्या स्तोमामुळे, तो उत्सव मागे पडला. लोकमान्यांनी त्याला सार्वजनिक बनवून या स्तोमाचेच पुनरुज्जीवन केले. म्हणून आपण यापुढे नवरात्रोत्सव साजरा करून बहुजन समाजाला एकत्र आणण्याच्या ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन करावे.' त्यानुसार लोकहितवादी संघ स्थापून २६ सालापासूनच त्यापूर्वी राज्यात कुठेही सुरू नसणारा 'श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव' मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला.

प्रबोधनकारांनी आपले आत्मचरित्र 'माझी जीवनगाथा'मध्ये हा सगळा घटनाक्रम अत्यंत सविस्तरपणे सांगितला आहे. पुढे ४० वर्षांनी त्यांच्या चिरंजीवाने म्हणजे बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची सुरुवात केली. या संघटनेची बांधणी करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी त्यांना वडिलांनी स्थापन केलेल्या नवरात्रोत्सवाचा उपयोग न करता, वडिलांनी ज्याची 'स्तोम' म्हणून संभावना केली त्या गणेशोत्सवाचाच आधार घ्यावा लागला. एक मात्र नक्की की शिवसेनेने मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये गणेशोत्सव पोहोचवून त्याच्या आयोजनात बहुजन वर्गाला सामावून घेण्यात

संदर्भ प्रकार: