सीकेपी अंकातील...

दादासाहेबांच्या तारुण्याचें ''शीक्रेट''
लेखकः श्री. देवदत्त नारायण उर्फ भाऊसाहेब टिळक. नाशिक.
पाऊणशे वर्षांचा तरुण पाहायचा असेल तर तो ‘मार्मिक’ ऑफिसमध्यें खिडकीत टेलीफोन जवळ बसलेला सांपडेल. ''या भाऊसाहेब आलांत! ए सरू! भाऊसाहेब आलेत – पण गेले सुद्धां. त्यांना वेळ नाहीं. आं? इथेच अजून? अहो बोलता हां काय? अजून उशीर झाला नाही? सरू आहेत! आहेत! अजून एक मिनीट थांबणार आहेत!'' असें म्हणून हा तरणाताठा माणूस भाऊसाहेबांचे पाऊल घरांत पडल्यापासून त्यांनी जाण्यासाठी आपलें बूड खुर्चीतून उचलीपर्यंत त्या भाऊसाहेबांची एक सारखी टेर टिंगल करण्यांत वेळ घालवितांना किंवा आपल्या नातवांबरोबर उड्यासुद्धां मारतांना आढळेल. त्यांना ''सीरियस'' होतां येते. 'सीरियस'' म्हणजे अगदीच 'सीरियस''. मग त्यांच्या पुढें कोणाची मात्रा चालायची नाहीं. मात्र त्याबरोबरच ही विनोदी बुद्धी व हा पोरपणा जो अंगी भिनलेला आहे तों खरोंखरच अजब आहे व त्याच्या जोरावर ते तरुण – तरुणच का चांगले बालक बनूं शकतात. त्यांच्या अंगी असलेल्या ह्या दुर्मिळ गुणामुळेंच मी त्यांच्याकडे ओढला गेलों. मनांत आलें तर ते कोणालाहि हसवूं शकतील किंवा रडवूं शकतील. आणि मला वाटतें अगदी शेवटल्या प्रवासाला ते निघाले तरी हेंच करतील. जातां जातां हसवीत जातील. मागें एक वृद्ध गृहस्थ त्यांना आपल्या बोळक्या मुखानें विचारूं लागले, ''अहो रानडे एक्स्टेनशन रस्ता हाच का हो?'' त्यावर दादासाहेबांनी सोनापुराकडे बोट करून सांगितले ''सरळ जा, एकच स्टेशन आहे.''
पोरकटपणा म्हणून नाकें मुरडणारांना दादासाहेबांत व माझ्यांत कित्येक दिवस चाललेला एक पत्रव्यवहार हुडहुडीच भरवील. दादासाहेबांनी आपले सारे उरले सुरले दांत काढून घेतलेला होते. एकहि दांत उरला नव्हता. अगदीं बोळकें झालें होतें. नंतर कवळ्या केल्या. पण त्या बोचूं लागल्या म्हणून परत पाठविण्यांत आल्या; व मग त्या कांही दिवस दिसेनाशा झाल्या. पुढेंच येईनात. त्यावर मी त्यांना एक कुन्दकळ्या नांवाची ''कनाका'' लिहून पाठविली होती. क - कथा ना - नाट्यः का - काव्य अशी ती कनाका होती. ही त्यांनी नव्या कवळ्या बसवितांच उघडून वाचावयाची मीं शपथ घातली होती आधी नाही. पाकीटावर आर्या होतीः
प्रिय दादा, उघडा हें पाकिट येतील दांत ज्या दिवशी।
तोवर असेच ठेवा, काय अधिक बोलणें वुध जनाशी।।
वगैरे. त्यानंतर आम्ही दोघांनी ‘आर्येला’ अगदी मेटाकुटीला आणले. इतकी खच्चून तिच्याकडून सेवा घेतली कीं आपल्या सखीचा ह्या दोघा व्रात्यांनी चालविलेला छळ पाहून वरतीं मोरोपंत आमच्यावर संतापून गेले असतील.
कनाकाची कल्पना अशी होती की एका वृद्ध यक्षाचे बोळकें झालें होतें पण त्यांच्या मनांत होतें बिजलीशी लग्न करायचें. तेव्हां त्यानें दादासाहेब ठाक-यांसाठी तयार करून ठेवलेल्या दातांच्या कवळ्या डॉ. मुंडल्यांच्या दवाखान्यातून पळविल्या व त्यानंतर सगळा घोटाळा होऊन दादांच्या कवळ्या त्या चोरीमुळें दादांना उशीरां मिळाल्या. ही कनाका वाचल्यावर दादांनी मला खाली दिल्याप्रमाणें स ना टा लिहून पाठविली.
स ना टा
२१ व्या शतकांत जागतिक अहो मान्यतेच्या (अवमानतेच्या नव्हे) बुरजी कळसावर चमकणारा सनाटा हा एक नवीन साहित्याचा उर्फ लेखी सामानाचा प्रकार (परकर नव्हे नि परक्रारहि नव्हे, प्राकार एटलू सीखर-शिखर) आहे. रामावतार होण्यापूर्वीच रिकामटेकड्या गंजड वाल्मिकानें असे रामायण लिहिलें त्या सारखाच हा ए भविष्य-कथनी काव्यच (म्हणजे काव्याचा ह्यांत काबा, हेवा, दावा, जावा, नणंदा कोणी नाहींत.) णमुणा आहे. स म्हणजे सत्कार, ना मीन्स, नाट्य, आणि टा मायने टाळ्या. यह तीन मसालेका हा बटाटेवडा रसिकांच्या टंगेला वंगणल्याशिवाय NOT STAY अरेरे राहणार नाहीं हाहि अर्थ उत्खनन करून कम्-पल्-शरि व्हावें ना? OFF-SOS
सोपानपुरांतील घटना
(हाल्ट! सोपानपूर म्हंजी सोनापूर नव्हं. सोपन मायने दादर, शिडी जिना – मेला तो जिना नव्हे – आमचें दादर नगर तेथली घटना घण्टा नव्हे.)

संदर्भ प्रकार: