उपलब्ध नसलेली पुस्तकं

प्रबोधनकारांचं पहिलं पुस्तक नाटक संगीत सीताशुद्धी हे १९०९ सालातलं. ते अखेरपर्यंत लिहितच होते. त्यामुळे त्यांचं सगळं साहित्य एकत्र आणणं आज निव्वळ अशक्य आहे. तरीही आज आपल्या वेबसाइटच्या निमित्ताने जितकं साहित्य एकत्र आलं आहे, तितकं यापूर्वी कधीच आलं नव्हतं. तरीही आमच्या मर्यादांमुळे आम्ही काही पुस्तकं मिळवू शकलेलो नाही. आम्हाला उपलब्ध नसेलेल्या प्रबोधनकारांच्या पुस्तकांविषयी...
प्रस्थान
या पुस्तकात प्रबोधनकारांच्या विविध साहित्यातील आणि वृत्तपत्रलेखनातील काही निवडक भाग एकत्र करण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे उपशीर्षकच मुळी ‘प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांच्या विविध वाङ्मयातील वेचे’ असे आहे. ६८ पानांचं हे पुस्तक १९३८ साली प्रकाशित झालं आहे. प्रकाशक आहेत, श्री नाथ आणि कंपनी, माहीम, मुंबई. प्रबोधनचे ध्येय आणि प्रबोधनची जीवनक्रांती हे प्रबोधनकारांनी आपल्या विचारांविषयी केलेलं चिंतन मांडणारे प्रबोधनचे अग्रलेख यात आहेत. तसेच भिक्षुकशाहीचे बंड, शनिमहात्म्य, ग्रामण्याचा इतिहास, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, दगलबाज शिवाजी, शेतक-यांचे स्वराज्य या पुस्तकांमधील काही वेचे यात आहेत. यात एकूण ३५ लेख आहेत.
लाइफ अँढ मिशन ऑफ रामदास
हे प्रबोधनकारांच्या अगदी सुरुवातीच्या पुस्तकांपैकी एक. बहुदा १९१८ सालातलं. यात प्रबोधनकारांनी समर्थ रामदासांचं इंग्रजी चरित्र लिहिलं आहे. अनेक पुस्तकांमधे याची नोंद मिळते. ब्राह्मणद्वेष्टे म्हणून नावाजलेल्या प्रबोधनकारांनी रामदासांचं चरित्र कसं लिहिलं, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. पण धोपट मार्गाने जाणा-या आणि स्वतंत्र वृत्तीने जगणा-या विचारवंतांमधे असे विरोधाभास जाणवणं स्वाभाविक आहे. प्रबोधनकारांच्या अत्यंत मर्मभेदी पुस्तकांमधेही सुरुवात किंवा शेवटाला जय जय रघुवीर समर्थ लिहिलेलं आढळतं. शनिमहात्म्य पुस्तकात तर ते दासबोध वाचण्याचा सल्ला देतात. शिवसेनेच्या पहिल्या दस-या मेळाव्यातल्या भाषणात ते रामदासांचं अवतरण देतात. त्यामुळे त्यांनी रामदासांचं चरित्र लिहिणं स्वाभाविक मानायला हवं.
रायगडची गर्जना गर्रर्रर्र ढ्रॉक
ही एक प्रबोधनकारांची महत्त्वाची पुस्तिका. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेल्या ग्लिम्प्सेस ऑफ इंडिया या इंग्रजी पुस्तकात अफझलखान वधाप्रकरणी शिवाजी महाराजांना खुनी ठरवून त्यांच्यावर कुत्सित टीका केली होती. शिवाजी महाराज हा प्रबोधनकारांचा वीक पॉइण्ट. कुणी महाराजांवर टीका करतील आणि प्रबोधनकार शांत राहतील, हे शक्यच नव्हतं. त्यांनी रायगडची गर्जना गर्रर्रर्र ढ्रॉक ही पुस्तिका छापली. एक आणे किमतीत सर्वत्र पोहोचवलीही. प्रबोधनकारांनी इंग्रजी पेपरांमधेही लेख लिहिले. महाराष्ट्रातून झालेल्या टीकेमुळे नेहरूंनी माफी मागितली. त्यात मोठं योगदान या पुस्तिकेचं होतं. माझी जीवनगाथामधे प्रबोधनकार लिहितात, ‘या रायगडच्या गर्जनेने महाराष्ट्राला समजले का ठाकरे वाघ मेला नाही. जागताज्योत जिवंत आहे आणि महाराष्ट्राची कुचाळकी करणारांच्या आंगावर तात्काळ झेप घालायला सिद्ध आहे.’
रेल्वे प्रवाशांचा माहितगार मित्र
इतिहासापासून समाजकारणापर्यंत अत्यंत मूलगामी महत्त्वाचं विचारधन देणारे प्रबोधनकार ठाकरे यांनी रेल्वे प्रवाशांसाठी माहितीपुस्तिका लिहिली असेल यावर सहज विश्वास बसणार नाही. पण त्यांनी हेदेखील केलंय. १९२७ साली प्रकाशित झालेली ही ३२ पानांची पुस्तिका थर्ड क्लासच्या रेल्वे प्रवाशांसाटी होती. त्यात रेल्वेच्या कायद्याची आणि नियमांची माहिती थोडक्यात दिली होती. रेल्वे प्रवाशांना सोयीसुविधा पोहोचाव्यात यासाठी झटणारे त्यांचे मित्र रेल्वे मराठे यांच्या आग्रहाखातर त्यांनी ही पुस्तिका लिहिली. मराठे बेळगाव येथे राहणारे होते. त्यांची संस्था बेळगाव रेल्वे प्रवासी मंडळ हे याचे प्रकाशक आहेत. हे पुस्तक आजही सर्व रेल्वे प्रवाशांनी अभ्यासावे असे आहे, असा अभिप्राय प्रबोधनकारांचे अभ्यासक धर्मपाल कांबळे यांनी दिला आहे.
कलमबहाद्दरांस शेलापागोटे
या पुस्तकाविषयी नेमकी माहिती मिळत नाही. पण या नावाने प्रबोधनकार दीर्घकाळ प्रबोधनमधे सदर चालवत होते. त्यात अनेक पुस्तकांची सविस्तर समीक्षा असे. प्रबोधनकारांचा वाचन व्यासंग मोठाच होता. त्यामुळे हे सदर प्रबोधनचे एक आकर्षण बनले होते. त्याचा संग्रह या पुस्तकात असू शकतो. हे पुस्तक असल्याचा उल्लेख प्रबोधनच्या काही अंकांमधे आहे.
याशिवाय
प्रबोधनकारांचे विविध नियतकालिकांमधलं बहुतांश लेखन कधीच पुस्तकरूपानं आलं नाही. ‘मंदिर’ पासून ‘भगिनी’पर्यंत विविध चित्रविचित्र नावांच्या अनेक नियतकालिकांमधे ते सातत्याने लिहित होते. ही नियतकालिकं आज उपलब्धच नसल्यामुळे हे लिखाणही काळाच्या पदरात हरवल्यासारखं झालं आहे. खुद्द ‘प्रबोधन’चेही साता-यातून प्रसिद्ध झालेले अंक

संदर्भ प्रकार: