निवडक बातमीदार: Page 10 of 50

विचारांचा उजेड खालच्या थराला नेऊन भिडविणेच कठीण झाले आहे. सरकारी सत्तेच्या जोरावर किंवा सरकारचा पाठिंबा असलेल्या सर्वोदयासारख्या खटपटीनें हे समाज-प्रबोधनाचे कार्य होणार नाही. सरकारविषयी जनतेचा दृष्टिकोन पूर्वीइतकाच साशंक नि विकल्पी आहे. तो बदलण्याच्या कामी

काँग्रेसची नालायकी सिद्ध

झाली आहे. सर्वथरी समाजांच्या आत्मविकासाचे कार्य लोकाभिमुख आणि मिशनरी स्पिरिटच्या स्वतंत्र संघटनेनेच हाती घेतले पाहिजे.

ज्योतिबा फुल्यांचा सत्यशोधक समाज हा याच घाटणीचा एक अस्सल मिशनरी प्रयोग होता त्याच संघटनेचा चालू देशकालवर्तमानानुसार पुरनुद्धार होणे अगत्याचे आहे. संघटनेची जुनी तत्वे बदलली पाहिजेत. सत्यसमाजाला काय किंवा कोणत्याहि सामाजिक संघटनेला काय, राजकारणापासून अलिप्त राहणे अस्वाभाविक नि अशक्यच असते. तथापि हे मिशनरी कार्य हाती घेणारे पुढारी नि कार्यकर्ते

राजकीय सत्तालोभाचा संन्यास

घेणारेच असले पाहिजेत. स्थानिक प्रांतिक मध्यवर्ति कोणत्याहि कारभाराच्या निवडणुकांत ते उमेदवार नसावे. हेच धर्म संस्कृतिवादाच्या मानसिक गुलामगिरीतून सर्वथरी समाजाना मुक्त करून समानतेच्या एकाच पातळीवर आणले पाहिजे. प्रचाराच्या निरनिराळ्या योजना आंखून त्या अंमलात आणण्यासाठी निस्वार्थी स्वयंसेवक पुढे आले पाहिजेत. सर्व जातियांना संघटनेचा दरवाजा मोकळा असला पाहिजे. जागोजागच्या कार्यकारी मंडळांत एकाच जातीचे किंवा जमातींचे लोक न येतील अशी खबरदारी घेणे जरूर आहे.

सर्वोदय समाजाच्याच कार्यासाठी पुढे आला आहे, असे कोणी म्हणतील. येथेहि देव धर्म संत नि महात्म्यांचे बण्ड आहेच. शिवाय, राज्यसत्ता हाती असलेल्या काँग्रेस पक्षाचा त्याला सरकारी पाठिंबा, हीच त्याची जनसेवेच्या नालायकीची मुख्य निशाणी. सर्वोदयाच्या नीतिपाठातल्या अध्यायांची नांवे जरी बदललेली असली तरी प्राचीन भिक्षुकशाहीप्रमाणेच जनतेला एका ठराविक सांच्याच्या सांप्रदायीक गुलामगिरीत जखडण्याचा तो सत्तालोभी पक्षाचा एक सांपळा आहे, बुद्धिवादाला तेथे अवसर नाही. कार्यकर्ते सत्तालोभी आहेत. विद्यमान विज्ञानाच्या विकासाकडे पाठ फिरवून, जनतेला ते हजार वर्षापूर्वीच्या रानवट जिण्याने जगण्याचा ते अट्टाहास करीत आहेत. आहार विहारांचे वर्तुळ शून्यापेक्षाहि लहान व्हावे, भोग लालसेचा विचारही मनाला शिवू देऊ नये, इत्यादि फटिंग गोसावड्यांच्या जिण्याचे कित्ते घटवायला सांगण्यात येते. प्रांतिक काँग्रेजी राजवटीच्या कित्येक कायद्यांचे परिणाम सध्या नेमके याच धोरणाचे आहेत. अशा मार्गाने राष्ट्राचा उद्धार आपण करू शकू, हा भोळसटपणा नसेल तर नागडा हट्टावाद तरी खास.

सर्वोदय समाज महात्मा गांधीप्रणित. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले प्रणित. गांधींपेक्षा फुले महाराष्ट्राला विशेष जवळचे. निदान, परवाच्या उत्सवांत सर्वथरी जमातींच्या पुढा-यांनी फुल्यांविषयी जो आदर निष्ठा नि विश्वास व्यक्त केला, तो खरा नि जिव्हाळ्याचा मानला, तर पुनर्घटीत सत्यशोधक समाजांत ब्राम्हणांसकट सर्व म-हाटी जनतेची एकजीव कट्टर विवेकवादी नि बुद्धिवादी (रॅडिकली रॅशनल) संघटना होणे कठीण नाही. गांधी निष्ठेचे स्तोम माजवणारे जे थोडे टोपलीभर बामणबामणेतर म-हाठे आजकाल लोकांपुढे

आपल्या लुंगीनाचाचे जलसे

नाचवीत आहेत, त्यांचे खायचे नि दाखवायचे दांत निराळे आहेत. मागे आंग्रेजी सत्ताधा-यांपुढे राजनिष्ठेचे (लॉयस्टीचे) तमाशे करणारे रावसाहेब, रावबहादुर, दिवाण बहादुर होते, त्यांचेच हे नवीन काँग्रेसछाप नमुने म्हटले तरी चालतील. बिचा-या काँग्रेजांवर राजत्यागाचा प्रसंग आला, तेव्हा एकतरी रावसाहेब रावबहादुर पडला का त्यांच्या उपयोगी ? जो प्रकार त्यांचा, तोच या लुंगीवाल्यांचा होणार ! अस्सल लोकशाहीचा जोर वाढला आणि उद्या काँग्रेजी पक्षाची पुण्याई संपली, का हेच लफंगे लोक

मोडुनि दंडा फेकुनि देइन

 भिकार भगवी वस्त्रे

हा अर्जुनी फार्स केल्याशिवाय रहाणार नाहीत.

महाराष्ट्राचा पिण्ड पुरोगामी आहे. शिस्तबाज संघटनेचा प्रयत्न केल्यास, उभा महाराष्ट्र बुद्धिवादी व्हायला विलंब लागणार नाही. प्रत्येक नवीन विचाराना विरोध करणारा एक अक्कलवंताचा वर्ग येथे आहे, ही जाणीव ठेवूनहि म-हाठ्यांच्या एकवट संघटनेचा प्रयोग येथे अशक्य नाही. बामणेतरी जागृतीने त्या अक्कलवंतांच्या विरोधाला आता चांगली अद्दल घडवलेली आहे. सदसद्विवेक बुद्धीला स्मरून सांगायचे तर आज महाराषअट्रात बामण बामणेतर वाद नाहीच. वाद आहे तो सनातनी आणि पुरोगामी आचार विचार सरणीचा. बामणेतर वादाचा अधूनमधून चीत्कार करणारे उंदीर यापुढे आपल्या बिळाबाहेर येऊ शकणार नाहीत, म्हणजे,