निवडक बातमीदार: Page 9 of 50

कारण, फुल्यांच्या सत्यधर्माच्या फैलावाला त्याचा विरोधच तसा कट्टर कडवा झाला. गेल्या शंभर वर्षांत जागतिक संघर्षाने आमच्या दैनंदिन जीवनांत अकल्पीत क्रांति घडवली आहे. देवा धर्माच्या आमच्या कल्पना नि भावना फुलेप्रणित सत्यशोधनाच्याहि पुढें गेल्या आहेत. देव आणि मानव यांत दलाल नको.

देवालाच गचांडी दिली तर ?

तर देवाबरोबर दलालहि गेला आणि उरला एकटा मानव ! माणूस हाच मुळी देवाचा बाप. देवाला काय किंवा धर्माला काय, माणसानेच जन्म दिला. माणूस नसता तर देवाला कोणी धूप घातला असता आणि धर्माचे थोतांड माजवले असते देव धर्मामुळेच भिक्षुकांची नि पुजा-यांची संस्था निर्माण झाली आणि अखेर ते तिघेहि मानवांच्या डोक्यावर

शिरजोरपणाचे मिरे वाटू लागले.

धार्मिक वर्चस्वामुळेच भिक्षुक बामण वरचढ झाला आणि पुढेपुढे त्याने सामाजिक नेतृत्वाबरोबर राजकीय सत्ताहि काबीज केली. भारतातले मोठमोठे पराक्रमी राजे महाराजे वर्चस्वबाज भटा बामणांचे गुलाम बनले आणि अखेर त्यांच्या नानाविध कारवायांना बळी पडले. फार काय भिक्षुकशाही इतकेच

राजेशाही हे एक पाप झाले

आज लोकशाहीचा मनु उगवला आहे. श्रमजीवी जनतेच्या जागतिक प्रबोधनाने भारतीय बहुजन समाज थरारून उठला आहे. शतकानुशतके त्याला पारखी झालेली माणुसकी काबीज करायला तो उताविळ झाला आहे. याच वेळी आजूबाजूला त्याच्या विरोधकांच्याहि छुप्या उघड चळवळी चालू आहेत. हिंदू समाजाच्या अद्ययावत क्षेत्रांत वर्चस्व टिकवू पहाणारा

देव धर्मवादी भिक्षुक

निजलेला नाही. बामणांप्रमाणे बामणेतरांतहि तो आढळतो. हिंदू संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी जान कुरबान करायला सरसावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बामण जातियांच्या भरपूर भरण्यात काही वाटचुकलेली बामणेंतरी कोंकरेहि खेचली गेली आहेत. भारतावर अजातवादी (सेक्यूलर) लोकशाहीऐवजी केवळ एकधर्मी हिंदूजातीय साम्राज्यसत्ता असली पाहिजे, अशा धोरणाने साम्राज्यशाहीला मुकलेल्या पेशवाईचे अभिमानी हिंदुमहासभेच्या झेण्ड्याखाली जोरदार उठावाच्या खटपटीत आहेत.

माणुसकीसाठी आतुरलेल्या श्रमजीवी बहुजनांच्या पुढारी छावण्यांकडे नजर टाकावी, तर तेथेहि बारा पुरभय्ये नि तेरा चुली असा शोचनीय देखावा दिसत आहे. प्रत्येक छावणीत श्रमिकांच्या उद्धाराचे ध्येय प्रमुख असले, तरी देवधर्मवादी अट्टाहासाप्रमाणे त्यांचे निरनिराळे सांप्रदायिक हट्ट जोरावर आहेत. कम्युनिष्टाना सोवियत रशिया देवासारखी वाटते. जेधे मो-यांच्या शेतकरी कामकरी पक्षाला कम्युनिष्टी मतें जवळची वाटतात, पण

स्टालिन देवाला शरणागति

व्हायला ते नाकबूल दिसतात. इव्ह जशी आडॅमच्या फासळीतून निर्माण झाली, तसे सोशालिष्ट बोलून चालून काँग्रेसच्या डाव्या फासळीचे मानसपुत्र. काँग्रेजी नि कम्युनिष्टी मतप्रणालींच्या दोन डगरींवर ते आपल्या हालचालींची कसरत करीत असतात. या तिरंगी त्रांगड्यांत श्रमिक जमातीची सध्या कुतरओढ चाललेली आहे. श्रमिकांच्या संघटनेवर हा तिरंगी झगडा हे एक मोठे प्राणसंकट आहे. याची आता त्यानीच दखल घेणे अगत्याचे आहे.

आधी राजकीय का सामाजिक

हा वाद पूर्वी बरीच वर्षे महाराष्ट्रात दुमदुमलेला आहे. समाजाचा बुद्धिवादी मार्गाने वरपासून खालच्या थरापर्यन्त विकास झाल्याशिवाय, राजकारणी आत्मविकासाला समाज लायक ठरणार नाही, असा वाद करणारांची मनस्वी छळणी झालेली आहे. राजकीय सत्ता हाती येतांच उपयुक्त कायद्यांच्या जोरावर सर्वथरी समाजांचा सर्वांगीण विकास हां हां म्हणता करता येईल.

या भरंवशाच्या म्हशीला टोणगा

झालेला आज आपण पहातच आहोत. काँग्रेजी राजवटीच्या अडीच वर्षांच्या अनुभवाने हे सिद्ध केले आहे. आमची अजातवादी लोकशाही असा नुसता डांगोरा पिटून, हजारो वर्षांच्या भिकार संस्काराने समाजांच्या हाडीमासी खिळलेली जातीय वृत्ति एकाकी नष्ट होणे अशक्य आहे. खाणे पिणे आणि विवाहांचे निर्बन्ध तोडणारेहि जातिवादापासून मुक्त होऊ शकत नाहीत. मोठमोठ्या शहरांत दिसून येणारी आचार विचारांची सरमसळ, खेड्यापाड्यांतून पसरलेला कोटीकोटी बहुजन समाजांपर्यंत गेलेलीच नाही. शहरांतला श्रमिकहि अझून देव-धर्म-वादाच्या अंधश्रद्धेपासून मुक्त झालेला नाही. मंदिरप्रवेशाचा कायदा झाला, शहरांतून अस्पृश्यतेला हाकालपट्टी मिळाली, तरी खेड्यापाड्यांतली तिची कदर कायम आहे. शहरी सुधारणासुद्धां परिस्थितीच्या दावणीमुळेच दिसत असते. एकीकडे समान समतावादी सोशालिझमचे नगारे वाजत असतानाच,

संस्कृति-संरक्षकांच्या पलटणी

आपल्या सोवळ्या हाका आरोळ्यांनी थोडाफार विचार करू शकणारांचाहि बुद्धिभेद करताहेत. निरक्षरतेचे प्रमाण आजहि शेकडा ९० असल्यामुळे, कोणत्याहि वाजवी