निवडक बातमीदार: Page 8 of 50

वाद मिटला. पण जेव्हा पहावे तेव्हा पहिली आगळीक (ऑफेन्सिव) बामणांची ! ऑफेन्सिव आली का डिफेन्सिवचा (प्रतिकाराचा) तडाका मिळणारच ! याचमुळे हा वाद आजहि समूळ नष्ट होऊ शकत नाही.

पूर्वजांच्या साम्राज्यवादी कृतकर्माबद्दल ओशाळणारा आणि किंचित पश्चात्ताप करणारा एक लहानसा वर्ग अलिकडे बामणांत दिसत असतो ''होय. आमच्या काही पूर्वजांच्या बामणेतर द्वेषाबद्दल आम्हाला वाईट वाटते. तसे त्यांनी वागायला नको होते. पण आता वरचेवर तो कोळसा उगाळण्यात काय शहाणपणा ?  सध्याची ब्राह्मणांची पिढी स्वतःला ब्राह्मणहि समजायला तयार नाही. एकरंगी शिक्षणामुळे बामण काय बामणेतर काय आता एकच विचारांच्या नि आचारांच्या पातळीवर आले आहेत. अशा वेळी मागल्या इतिहासाचा पुन्हा पुन्हा उल्लेख करण्याने बामणेतरी उमलत्या पिढीच्या मनांत बामणांविषय़ी हकनाहक तेढ, द्वेष, मत्सर नाही का पेरला जाणार ?'' असे या पश्चात्तापित बामण मंडळींचे म्हणणे आहे.

पंचवीस वर्षापूर्वी बामणेतरी उठावाने बामणी साम्राज्यवादाला प्रत्येक क्षेत्रात जो सणसणीत प्रतिकाराचा आणि उघड सामन्यांचा तडाखा दिला, त्यामुळेच काही मूठभर समतावादी ब्राह्मणांची पेरणी जागोजाग झालेली आहे, हे त्यांना कबूल केल्याशिवाय सुटका नाही. आजचा त्यांचा शहाणपणा स्वयंस्फूर्त नाही. शिक्षणसाम्यामुळे ब्राह्मणांची नवीन पिढी आपले जन्मजात ब्राह्मण्य विसरली आहे, या विवानात इतकी अतिशयोक्ति आहे, तितकाच भोळसटपणाहि आहे. एरवी व्यवहारात खाण्यापिण्याचे शिवाशिवीचे निर्बंध ही पिढी जुमानीत नाही, हे खरे असले तरी प्रसंगी त्यांच्या वर्चस्वबाज मर्माला जरा का ढक्का लागला का तात्काळ

त्यांचा गुप्त ब्राम्हण जागा होतो

पराभूत झालेली साम्राज्यवादी वृत्ति फटकार टाकू लागते. मर्माकडे बोट दाखवणा-या नरडीचा घोट घ्यायलाहि ते कमी करत नाहीत, असा व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव आहे. साम्राज्यवादी चित्पावनांत अस्सल जनहितवादी पिण्डाचाहि एक वर्ग पूर्वीपासून आहेच आहे. मी त्या वर्गाला

गुरुवर्ग लोकहितवादींची परंपरा

म्हणत असतो. नामदार गोखले आणि त्यांचा भारतसेवक समाज त्याच परंपरेचा अनुयायी. बहूसंख्य बामणेतर समाजांच्या दाबल्या दडपलेल्या सामाजिक धार्मिक राजकीय महत्वाकांक्षांना तोंड फोडण्याचे कार्य करणा-या या परंपरेच्या चित्पावनांचाहि साम्राज्यवादी केसरीछापवाल्यांनी कसकसा नि किती छळ केला, याचा इतिहास नजरेपुढे धरला म्हणजे अलिकडच्या जागृत बामणेतर प्रतिकारकांविषयीच्या पश्चात्तापित बामणांच्या कुरबुरीला काही अर्थच उरत नाही. जुन्या इतिहासाच्या ज्ञानाने नवीन ब्राम्हण पिढीचा साम्राज्यवादी सोस अजिबात नष्ट झालेला असता, तर वेळोवेळी त्यांचा अंतरंगीचा पिढीजात ब्राम्हण केव्हाहि जागा होताच ना !  लोकहितवादी परंपरेच्या नामधारी चित्पावनांचा

तो ब्राह्मण ठार झालेला

असल्यामुळे, अस्पृश्यांसकट बामणेतर बहुजन समाज गोखले पंथियांशी हरहमेश जसा समरस जसा होवूं शकतो, तसा तो बहुसंख्य केसरीछाप छुप्या साम्राज्यवाद्यांशी का होऊ शकत नाही. याचा विवेक-वादाचे वरवर भस्म फासणा-यानी नको कां काही विचार करायला ? ज्योतिबा फुलेप्रणित समतावादाचा निरहंकारी निर्मळ पुरस्कार करणारा ब्राम्हणवर्ग जितक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रात निर्माण होत जाईल, तेवढा हवाच आहे. सत्यशोधक समाजाने ब्राह्मणांना कधीहि मज्जाव केलेला नव्हता. आजहि असल्या

ख-या ब्राह्मणांचा सत्कार

बहुजनसमाजाकडून होतच असतो आणि असा सत्कार होतो म्हणून ब्राह्मण जागा झालेला असामी त्यांच्याकडे काण्या डोळ्यानी पहातो.

----------

सत्यशोधक संघटनेचा पुनरुद्धार.

सत्याचे संशोधन स्थगित होणारे नसते. नदीच्या प्रवाहाप्रमाणे ते अखंड चालू असते. त्याचे रूप वरचेवर बदलत असत. फुल्यांच्या वेळी जी धर्मतत्वे त्यांना सत्य वाटली, तीं आज तशीच नि त्याच स्वरूपात टिकणे शक्य नाही. वर्तमान कालमानानुसार सत्यशोधक एकाद्या सत्याचा पुकारा करतो. जनतेच्या आचार विचारांना धक्का देऊन पुढे ढकलतो. म्हणजे ते तत्व पुढच्या पिढीने जशाचे तसेच कायम मानून उराशी धरावे, याला जीर्णमतवाद (आर्थाडाक्सी) म्हणतात. ईश्वर एक आहे आणि अखिल मानवजाति त्याची मुले आहेत, हे फुल्यांचे सत्यशोधन त्यांच्या काळी महत्वाचे नि अगत्याचे खरे.

देव नि मानवांत दलाल नको.

ठीक होते ते त्या वेळी. त्या सत्याने दलालाला शेण्डी पोथी जानव्यासकट दिला भिरकावून. सध्या तो कोठेकोठे काढतो मधूनमधून डोके वर.