निवडक बातमीदार: Page 6 of 50

नि भुकेलेल्या बामणेतरी कंपूला

राज्यलोभाचे मधाचे बोट

चाटवून आपल्या भजनी लावले कांग्रेजी भण्डाराच्या मळवटानी त्यांना खूप सजवून सजवून मढवून त्यांच्या महाराष्ट्रभर वराती नाचवल्या. शेतकरी कामक-यांची म-हाठी संघटना काँग्रेजी चळवळीच्या पचनी पडली. उरल्यासुरल्या तत्वनिष्ठ सत्यशोधकांवर पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे त्याना भुंकायला सोडले. सत्ताप्राप्तीचा आपला तळीराम गार झाल्यावर, दिले त्या सगळ्या बामणेतरी पुढा-यांना शेळपट चोथ्यासारखे भिरकावून खिडकीबाहेर ! बहुजनसमाज सेवेचे अस्सल मिशनरी स्पिरीट या कंपूला असते, तर त्यांच्या कार्याचा नि निष्ठेचा असा

खेळखंडोबा झालाच नसता

महाराष्ट्रातल्या श्रमजीवी दलितांच्या संघटनेचे पुढा-यांच्या राज्यलोभाने वाटोळे केले. कोल्हापूरच्या बा मिनिस्ट्रीला तोच अनुभव आला.

इटीज बेटर टु बी ए किंगमेकर दॅन ए किंग (राजा बनण्यापेक्षा राजा निर्माण करणारा असण्यातच खरी शिताफी.) असे एक आंग्लसूत्र आहे. राज्यसत्ताधारी होण्यापेक्षा त्या सत्तेचे सूत्रधार होण्यातच खरी शहामत हत्तीपेक्षा माहुताचे महात्म्य मोठे श्रमजीवी दलितवर्ग साक्षर झाला, समाज धर्म राजकारणातले खरें खोटे त्याला स्वतः अंदाजता येऊ लागले, स्वतंत्र विचाराची त्याची शक्ति वाढली तर तोच अशी एक मोठी जबरदस्त शक्ति होईल का तिच्या नुसत्या हुंकाराने राज्यसत्तेची सूत्रे हालविली चालवली जातील, हे दूरगामी सत्य महात्मा फुल्यानी बिनचूक हेरले होते. त्या भावी शक्तीची ठिणगी पेटवून ते सत्य-समाजामार्फत तिच्यावर निश्चयाने नि निष्ठेने फुंकर मारीत होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यानी ते कार्य केले. त्या कार्याचे गूढ महत्व कोणाला उमगले नाही. इमानी अनुयायी जमले नाहीत. आजूबाजूच्या देशाभिमानी शहाण्यांनी त्यांना वेडात काढून हेळसांड केली. जीव धरू पहाणारे रोपटे उत्तेजनाच्या पाण्याशिवाय मलूल होत गेले. जगवण्याचे पुढचे यत्न चुकीच्या धोरणाचे झाले. आज फक्त त्याचा इतिहास उरला आहे. पुढे काय करावे, हे विचार पुढल्या अंकी.

-----------

सत्यशोधक संघटनेचा पुनरुद्धार

अनाथ अपंगांच्या सेवेच्या नि उद्धाराच्या बुरख्याखालीं हिंदू लोकांना क्रिस्ती धर्माचा बाप्तिस्मा देऊन, क्रिस्तधर्मी ब्रिटिश राज्यकर्त्यांची राजकारणी फळी क्रिस्ती मिशनरी सामर्थ्यवान करीत आहेत, क्रिस्ती सरकारची हिंदुस्थानवरील सत्ता दृढमूल करण्यासाठी आपला एकधर्मी गट बनवीत आहेत. तेव्हा त्या

मिशन-याना आणि त्यानि क्रिस्ती बनवलेल्या हिंदू लोकांना कडकडीत बहिष्कार घातलाच पाहिजे. वेळी महार मांगादि हिंदुधर्मी अस्पृश्याना आम्ही जवळ करू, पण या क्रिस्ती बाट्यांची सावलीहि घेणार नाही. हिंदुधर्म-मार्तण्डांचा हा आक्रोश परवाच्या

राज्यक्रांतीने खोटा ठरवला.

राज्य सत्तांतराच्या कोणत्याहि उपक्रमाला हिंदवी क्रिस्ती जनांनी कसलाहि विरोध केला नाही. इतर सर्व हिंदी जनांबरोबर त्यांनीहि स्वातंत्र्याचा पुरस्कारच केला. देशातले गोरे क्रिस्ती (अँग्लो इंजिअन्स) सुद्धा चालू नवीन मन्वंतरात हिंदी म्हणून समरस झाले आहेत. यावरून एकच सिद्धांत निघतो.

धर्म नि संस्कृतीच्या पायांवर राज्यसत्ता यापुढे अशक्य.

अलिकडच्या काळांत ज्यांनी ज्यांनी धर्म नि संस्कृतीच्या एकवटणवर राज्यसत्ता उभारण्याचे उपद्व्याप केले, ते हिटलर मुसोलिनी मातीला मिळाले ! परकीय क्रिस्ती धर्माच्या बाप्तिस्म्याने का होईना, क्रिस्ती

मिशन-यानी हिंदवी अनाथ अपंगांच्या उद्धारासाठी चालविलेल्या संस्था त्यांच्या

निर्मळ भूतदयेची स्मारके

म्हणून आजहि विनम्र भावाने जागोजाग कामे करीत आहेत. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाचा झेण्डा उभारला तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे हाच निर्मळ जनसेवेचा मिशनरी कित्ता होता. सर्व माणसे एकाच देवाची लेकरे, जात-पात भेद आणि स्पृश्य अस्पृश्यतेची थोतांडे साम्राज्यशाहीचा सोस असलेल्या धर्म मार्तण्डांनी माजवलेली आहेत. ती खणून कुदळून काढली पाहिजेत. तसल्या थोतांडाना उत्तेजन देणारा भिक्षुक-प्रवचित धर्म बहुजन समाजानी संपूर्ण नाकारून, सत्यशोधनाने सिद्ध केलेला नवा सत्यधर्म आचार विचारांत खेळवला पाहिजे. विद्येच्या किंवा संस्कृतीच्या दंभाने समाजांत माणूसघाणेपणा फैलावणारांचा धिक्कार केला पाहिजे. साक्षरतेच्या अखंड प्रयत्नाने तसा

धिक्कार करण्याचे धैर्य

मागासलेल्या निरक्षर समाजांत सणाणले पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीहि साक्षर विद्वान होऊन समाजोन्नतीच्या हरएक क्षेत्रात जनसेवेसाठी सरसावले पाहिजे. हेच नि एवढेच ज्योतिबा कण्ठरवाने सांगत होते.

शंभर वर्षांचा काळ लोटला. देशात नि परदेशांत क्रांत्यांची कितीतरी तुफाने झाली. धर्माविषयी जागतिक दृष्टीकोन