निवडक बातमीदार: Page 50 of 50

विचारांनी ताजवा चळू ढळू देता कामा नये. कोणाचे अधिकार, नावालौकिकाची चाड. चाली रीति रूढी परंपरा अथवा धर्ममते यांची या कामी पर्वा करण्याचे कारण नाही. विवेकाला पटल्याशिवाय इतर कशाचीहि दिक्कत बाळगण्याचे कारण नाही.

 सत्यशोधकाचे जगत न्यारे असते. तोच त्याचा सार्वभौम स्वामी. जोरजबरदस्ती आणि भीति यांना प्रथम त्याने हद्दपार केले पाहिजे. विकल्प, अहंमन्यता, द्वेष, तिटकारा आणि तुसडेपणा हे सारे सत्याचे नि प्रगतीचे दुस्मान आहेत.

 खरा सत्यशोधक एकादी गोष्ट जुनी आहे म्हणून स्वीकारीत नाही, अथवा नवी आहे म्हणून टाकीत नाही. एकाद्या दिवंगत (श्रेष्ठ) व्यक्तीने असे असे म्हटले आहे, म्हणून त्याच्या शब्दांवर (आंधळेपण ने) तो विश्वास ठेवणार नाही, किंवा तो जिवंत आहे म्हणून (त्याच्या म्हणण्याचे) खंडनहि करणार नाही, प्रत्येक उक्तींत तथ्य किती, सत्य किती, एवढेच तो पहातो. वक्ता कोण याची मुळीच चौकशी करीत नाही. तो राजा असो, गुलाम असो, ऋषिमुनी असो अथवा त्याचा शागीर्द असो, त्याच्या विधानांची कसोटी पाहिली म्हणजे त्यांची सत्यता अथवा बुद्धिप्रभाव कमी अधिक होण्याचे कारणच नाही. त्या उक्तीची किंमत आणि त्या वक्त्याची कीर्ति अथवा सामाजिक दर्जा, या गोष्टी अगदी भिन्नभिन्न असतात. फक्त खोट्यानाट्या लबाड्यानाच काय तो स्थान आणि किर्ती, राजदण्ड नि किरीट यांच्या पाठिंब्याचा उवारा लागत असतो. सूज्ञ, प्रामाणीक आणि बुद्धिवंत यांना विरोधकांच्या संख्याबलाची अथवा बहुमताची पर्वा करण्याचे कारणच नसते. ''हे सत्य आहे, '' ही खात्री पटतांच सत्यवादी त्याचा पुरस्कार करतात. पूर्वज काय म्हणत असत, धर्ममते कशी आहेत, लोकांचे आग्रह, कल्पना नि भावना काय आहेत, इकडे ते लक्ष देत नाहीत. विवेकाला पटेल तेवढेच ते मानणार नि जुमानणार.