निवडक बातमीदार: Page 4 of 50

छापील हाकाटी गाढवपणाची मत्सरी आणि पांढरपेश्यांच्या चिथावणीची होती. हे सत्य हडसून खडसून चव्हाट्यावर मांडले गेले. सत्यशोधक समाजाचा झेण्डा उभारून, महात्मा फुल्यानी ज्या ज्या आचार-विचार क्रांतीचे बीजारोपण केले, शेतकरी कामकरी अस्पृश्य जमातींच्या

जागृतीसाठी नि उठावासाठी

ज्या ज्या मार्गांचा साधनांचा नि उद्योगाचा जाहीर पुकारा केला, तीच तत्त्वे चालू घडीच्या समाज-धर्म-राजकारणात अग्रमानाची जागा पटकावून बसली आहेत. सारांश, लोकशाहीचे जे पुसकट चित्र आज आपण पहात आहोत, समतेच्या ज्या व्याख्या आज अनेक पुढा-यांच्या नुसत्या जिभांच्या टकळीवर खिदळत आहेत आणि श्रमजीवी जनतेच्या आर्थिक उद्धाराच्या ज्या सरकारी योजना नुसत्या कागदांवर फडफडताहेत, त्या सर्वांची स्वच्छ तपशीलवार रूपरेषा महात्मा फुले यांनी शंभर वर्षांपूर्वी आपल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यक्रमाने म-हाठी जनतेपुढे मांडली होती. नवीन क्रांतिकारक विचार तात्काळ लोकाना पटत नाही. मानवत नाही. ज्यांच्या हितासाठी ते असतात, तेच त्याना विरोध करतात. रूढ भावनाना नि कल्पनाना लाथाडून

नवीन मार्गाने जाणे

फार जिवावर येते माणसांच्या. आणि तो मार्ग सुचवणारा माणूस बण्डखोर म्हणून राज्यकर्त्यांच्या रोषाला बळी तरी पडतो किंवा ज्या जनतेच्या उद्धारासाठी त्याची तळमळ असते, त्यांच्या निंदा टवाळीला पात्र होऊन. अखेर सांदीला पडतो. ज्योतिबा फुल्याना दुसरे प्रायश्चित्त मिळाले. शंभर वर्षांनीका होईना, पण आज ज्योतिबाच्या सत्यशोधक समाजाच्या सिद्धांताकडे विचारवंत पुढा-यांचे लक्ष्यवेध लागले आहे. शंभर वर्षांपूर्वीच फुल्यांचे सिद्धांत आपण मानले असते, विचारंत खेळवून आचारांत उमटविले असते, तर श्रमजिवी जनतेचे नि अस्पृश्य जमातीचे प्रश्न मागेच निकालात निघून लोकशाहीचा मार्ग आज बराच मोकळा झाला असता, असा जो एक सूर परवाच्या उत्सवांत सर्वत्र ऐकू येत होता, त्यालाच थोडी चालना देण्याचा यत्न आज मी करीत आहे.

आज आपण लोकशाही लोकशाही म्हणून मोठा गाजावाजा चालवीत आहोत. या लोकशाहीतले लोक कोणते ? अर्थात ज्यांच्या श्रमांनी देशाला अन्न वस्त्र मिळत असते, तो अफाट शेतकरी कामकरी वर्गच. सध्या

श्रमजीवी जनतेचे राज्य

चालू आहे, असे पुष्कळ बरळतात, पण तसा काहीहि प्रकार नसून, मूठभर शहाण्या बोलक्या पांढरपेश्यांच्या हातीच सारी राज्यसत्ता आहे आणि चीड येण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्हीच काय ते श्रमजीवी जनतेचे खरेखुरे प्रतिनिधी, त्यांचे कल्याण आम्हाला ठावे, आम्हीच ते करावे, इतरानी नुसते आम्ही काय करतो ते दगडासारखे पहात बसावे, हा त्यांचा दावा ! वस्तुस्थिति पाहिली तर फुल्यांच्या वेळी श्रमजीवी जनता जेथे जशी होती, तेथे तशीच दारिद्र्यांत पडलेली आहे. मजुरांच्या संघटनेच्या जागतिक चळवळीच्या कर्णोपकर्णी येणा-या काही ख-या काही खोट्या बातम्यानी त्यांच्यात

थोडी हालचाल चालू

असल्याचे दिसते. थंडगार पडलेल्या घोणीच्या शरिराला दोन चार बाजूंनी मुंग्या झोंबतात आणि त्यांच्या खेचाखेचीने घोणीची जी हालचाल दिसते, तोच प्रकार श्रमजीवी जनतेच्या सध्याच्या हालचालींत आढळून येतो. त्यांची हालचाल स्वयंभू नाही. स्वयंप्रेरणेची नाही. एकीकडे काँग्रेसवाले खेचताहेत. दुसरीकडे सोवियतधार्जिणे कम्युनिष्ट रशियातल्या

स्टालिनशाही स्वर्गाच्या कहाण्या

सांगून त्यांना ओरबाडताहेत, काँग्रेसच्या डाव्या फासळीचे सोशालिस्ट समाजवादाच्या पंग्या वाजवून अधूनमधून त्याना चुचकारताहेत. चवथीकडे धड ना बामणेतर, धड ना सत्यशोधक आणि धड ना काँग्रेजी असल्या छप्पन मळवटाचे शेतकरी-कामकरी-पक्षवाले त्याना शेमल्याच्या शेपटाने आपल्या कच्छपी लावण्याचा अट्टाहास करीत आहेत. कोणाचे ऐकावे नि कोणाचे टाकावे, समजतच नाही बिचा-यांना ! जो ज्यावेळी त्यांच्यासमोर उभा रहातो, त्याच्या पुराणाला ते भाळतात. हित कोणते आणि अहित कशात आहे, याचे गणितच त्याना सुटता सुटत नाही. श्रमजीवी जनतेच्या संघटनेच्या अशा सर्वत्र चार चिरफळ्या झालेल्या दिसतात. त्यांना चेतावणा-या नि चिथावणा-या प्रत्येक पंथ पक्षात

ख-या खोट्याचा चिवडा

झालेला आहे. लोकशाहीच्या नांवाखाली प्रौढांच्या मतदानाचे हक्क लोकाना मिळाले आहेत, त्यातला सातअष्टमांश वाटा श्रमजीवी जनतेच्या हातांत आहे. तो मोठा मतांचा लचका पदरांत पाडून घेऊन, त्याच्या जोरावर

राज्यसत्ता काबीज करावी

या एकाच हेतूने प्रत्येक पंथ पक्षाने पुढारी चळवळ्ये थरारलेले दिसतात. पांढरपेशा चाणाक्षध वर्गांतले महत्वाकांक्षी तरूण