निवडक बातमीदार: Page 3 of 50

होय. ज्योतिबाच्या सत्यशोधकी एकांडे शिलेदारीचे वास्तविक मूल्यमापन महाराष्ट्रात प्रथम शाहू छत्रपतीनीच केले. पण ते सुद्धा ती तत्वें पचनी पाडता पाडता बेजार झाले ! त्यातच त्यानी बामणेतरी चळवळीचे बांडघुळ लपेटल्यामुळे तर धड ना सत्यशोधक, धड ना बामणेतरी चळवळ, असा विचका होऊन, दोन्हीहि चळवळी लयाला गेल्या. ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक संप्रदायाचा एकही सच्चा अनुयायी आज महाराष्ट्रात आढळत नाही. फुल्यांच्या नांवावर स्वताला विकू पहाणारे मात्र रगड आहेत.

पेशवाई जाऊन आंग्लाई झाली. हा शूद्रादि अस्पृश्य जमातींना आत्मोद्धाराचा मोठा राजरस्ता गवसला, अशी ज्योतिबांची ठाम समजूत होती पण त्या राजवटीत, मागासलेल्या श्रमजीवी समाजांचे दारिद्र्यविमोचन होईल, ते साक्षर होतील, माणुसकीची पुरी उंची त्यांना हस्तगत करता येईल, हा त्यांचा भरंसा मात्र अनाठायी असल्याचेच प्रत्ययाला आले. मानवाच्या उदात्त नि उदार तत्वांवर आंग्लाई राजवटीचे कायदे नि कारभार जरी उभारलेला होता, तरी परकीय देशात निष्कंटक राज्य चालवण्यासाठी, त्यानाहि येथल्या जुन्या सामाजिक धार्मिक नि आर्थिक परंपरेला नि विकल्पांना विरोध करण्याचे धारीष्ट नि धोरण अंमलात आणता आले नाही. शिवाय राज्यकारभार तर शहाण्या नि धूर्त पांढरपेशांच्या सहकारावरच चालवायचा. म्हणूनच पेशवाई अंमलाच्या फार पूर्वीपासून श्रमजीवी जमातीचे असलेले दारिद्र्य, त्यांची भिक्षुक सावकार नि सरंजामदार यांचेकडून नित्य होणारी पिळवणूक आणि गुलामगिरी

जशीच्या तशी कायमच

राहिली. चालू घटकेलाहि ती वज्रलेप कायमच आहे. क्रिस्ती धर्माच्या बाप्तिम्स्याने का होईना, पण रंजल्या गांजल्या अनाथ अपंगांना प्रेमाने जवळ कसे करावे, साक्षरतेने त्यांना माणुसकीत कसे आणावे, हे भूतदयेचे दाखले ज्योतिबा नित्य अभ्यासीतच होता. त्या दिशेने त्याने केलेले स्वावलंबी प्रयत्न इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहेतच. पण अनुयायांचा नेहमीच तुटवडा पडल्यामुळे, त्याच्या हयातीनंतर तसले प्रयत्न कोणी केलेच नाहीत. सत्यशोधकी तिरमिरीने वरघाटी बामणेतर उफाळले. त्यानी समाजसेवेच्या आद्यतत्वांना सफाचाट डावलून

राजकीय हक्कांसाठी भांडणे

केली, एकमेकांत खूप सुंदोपसुंदी माजवली, अखेर त्यानाहि काँग्रेसने आंजारून गोंजारून आपल्या गटात खेचले आणि सफाचाट पचनी पाडून, त्यांचा चोळामोळा लगदा दिला भिरकावून बाहेर ! सारांश काय ? ज्योतिबांनंतर त्यांच्या तत्वांचा मळवट फासलेले पुष्कळ पंथ पक्ष निघाले, झगडले बागडले, जखमी होऊन घरी परले. मागासलेल्या श्रमजीवी जमातीचे कर्मकांड पूर्वी होते तसे आजहि जशाचे तसे कायम ! ज्योतिबाचा सत्यशोधनी ज्योतिप्रकाश संधिसाधू लेखाळ बोलमांडांच्या हातांत दिवटीसारखा दिसत असला, तरी ते सारे

पोटासाठी केले ढोंग,

तेथे कैचा पाण्डुरंग !

अशा मामल्याचा बाजारच होय. शिवरायांनी म-हाट्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तीनचार पिढ्या गाजले वाजले, इतिहासजमा झाले ! पेशवाईने बामणांचा उद्धार केला, वामनी अवसानाने बामणेतराना बळीसारखे पाताळात चिणले, तेहि गेले निजधामाला ! एवढी मोठी आंग्लाई आली, अडीचशे वर्षे नाचली नांदली अखेर येथून खरचटून परागंदा झाली ! या तीन राजवटींचे जसे आता नुसते नावच उरले, तीच गत ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाची झाली आहे. त्या थोर विचारवंत पुरुषोत्तमाचे चरित्र आठवावे, त्याच्या त्या मानवोद्धारी चळवळीतील विश्वस्पर्शी तत्वे मोठ्या कौतुकाने वाचावी गावी ! वहावा ! काय थोर महात्मा होऊन गेला हो ! असे अभिमानाचे उद्गार काढावे. यापेक्षा काय उरले आहे ? ज्योतिबांची सत्यतत्वे अमर होती. त्यांचे सिद्धांतच आज निरनिराळ्या श्रमजीवी जनतेच्या उद्धाराच्या चळवळीत प्रकर्षाने प्रकाशत आहेत. म्हणूनच आज

महात्मा ज्योतिरावकी जय

अशा गर्जना जागोजाग ऐकू येताहेत. पूर्वीच्या कट्टर निंदकाचे वंशज त्याची भजने गात आहेत. मोठमोठे तत्ववेते त्याच्या चरित्राचे नि चारित्र्याचे संशोधन करून प्रबोध निबंध लिहिताहेत. त्यांच्या वार्षिक पुण्यतिथी उत्सवांत त्यांच्या नामसंकीर्तनाने आपली वाणी पुनित करून घेताहेत.

महात्मा फुले अमर आहेत.

सत्यशोधक संघटनेचा पुनरुद्धार

सबंध महाराष्ट्रभर नुकताच महात्मा फुले स्मृतिदिन उत्साहाने साजरा करण्यांत आला. अनेक पंथ पक्षांच्या अनुयायानी ज्योतिबाच्या सत्यशोधकी दूरदृष्टीचे नि सत्यविश्लेषणाचे पवाडे मुक्तकंठाने गायले. ज्योतिबा ख्रिस्ती मिशन-यांचा हस्तक होता, ही मयत बाबूराव फुले नि हयात गणपतराव नलावडे यांची