निवडक बातमीदार: Page 2 of 50

काढले की प्रचलित हिंदू धर्म, त्याचे पाषाण हृदयी प्रचारक आणि प्रवर्तक बामण भट आणि वरिष्ठपणाच्या सत्तामदाने बेफाम असलेले बामण गृहस्थ हे सारे या मानव-संहाराच्या विशाळ कटातले मुख्य आरोपी आहेत. त्यांचे वर्चस्व सफाचाट झुगारून दिल्याशिवाय सुटकेचा दुसरा मार्गच नाही या कटवाल्यांच्या धुमाकुळाने शुद्रादि अस्पृश्यांची माणुसकी ठार झालीच आहे. पण खुद्द त्या पांढरपेशा समाजांतल्या मुली स्त्रिया नि अनाथ विधवा यांचेहि जिणे नासलेले सडलेले आहे, हेहि ज्योतिबाने बिनचूक हेरले. लोकांच्या धार्मिक समजुती आचार विचार आणि नीती अनीतीच्या कल्पना आरपार बदलल्याशिवाय, मागासलेल्या श्रमजीवी समाजांचीच काय, पण तमाम हिंदू समाजाचीहि धड गत नाही, आणि हे सत्य सिद्धीला नेण्यासाठी

साक्षरतेशिवाय शूद्रांचा तरणोपाय नाही,

ही एकच मक्खी ज्योतिबाने हुडकून त्या दिशेने सत्यशोधक समाज-स्थापनेचा -------- मदोन्मत्त होऊन बसलेल्या भटा बामणांच्या सामाजिक नि धार्मिक वर्चस्वावर हिरिरीने हल्ला चढवला.

ब्राम्हणांचे येथे नाही प्रयोजन

द्यावे हाकळून जोती म्हणे.

अशी भीमगर्जना केली. भटां बामणांच्या पुढारपणावर, त्यानी काढलेल्या पंथ पक्ष पत्रांच्या मिजासीवर हल्ला चढवणाराला आजहि ते कसे नि किती पाण्यात पहातात, हरत-हेने बदनाम करतात, हयातींतून उखडण्याचा अट्टाहास करतात, हे विचारांत घेतले म्हणजे पाऊणशे वर्षांपूर्वी ज्योतिबाला कसकसल्या

भट विरोधाच्या वणव्यातून

होरपळत जीवन कंठावे लागले असेल याचा तेव्हाच अंदाज लागतो. पण तो मर्द बिचकला नाही. बावरला नाही. त्याने धीर सोडला नाही. अखंड चिंतनांतू काढलेल्या सत्यावर त्याचा अढळ विश्वास होता त्याच्या सिद्धीसाठी देवाच्या कृपाप्रसादाची करुणा त्याने भाकली नाही. देवाला धूपच घातला नाही. भिक्षुकशाही हिंदू धर्माला त्याने साफ खेटारले आणि मानवी समानतेचा पुरस्कार करणारा

नवा सत्यशोधक धर्म

त्याने जाहीर केला. प्रचारासाठी अनेक पुस्तके लिहिली. व्याख्यानांची परवड रचली. जबरदस्त भटी वृत्तपत्रे त्याला पदोपदीं आडवीत होती, हिणवीत होती, खिजवीत होती. मुर्दाड भाषाशैलीनें टर टिंगल करीत होती. हव्या त्या कुटाळ गटारयंत्री गप्पांनी त्याला बदनाम करीत होती. तरीहि निर्धाराने पण हासतमुखाने, कटाक्षाने पण निंदकांची कीव करीत, ज्योतिबा आपल्या शुद्ध सत्याच्या ज्योतिप्रकाशाने वाट काढीत ठाम पावलाने पुढेपुढे जातच होते.

अलिकडे १५-२० वर्षांत ज्योतिबाचे गुणगायन करण्याची बामण पंडितांत शर्यत लागलेली दिसते. ठीक आहे. आनंद आहे. हयातभर छळ करून मारलेल्या बापाचे तेरावे बुंदीच्या लाडवांच्या मेजवानीने साजरे करण्यासारखा हा प्रकार असला तरी

नेले ते जळ. उरली ती गंगा

न्यायाने त्या तेराव्याचे कौतुक करायला हरकत नाही. ओबडधोबड बोबड्या बोलांनी मागासलेल्या श्रमजीवी जनतेच्या उद्धारासाठी, त्या काळी उपलब्ध असलेल्या अवजड बोजड साधनानी नि भाषेनी, सत्यशोधक धर्माचा खटाटोप करणा-या ज्योतिबाचा ज्योतिप्रकाश वाजवी होता. सत्य, न्याय नि समता यांवर आधारलेला होता, त्याने केवळ शूद्रांदि अस्पृश्य समाजाचेच हित होत होते असे नव्हे, तर

पृथिव्यां सर्व मानवाः

च्या उद्धाराचा संघटनेचा संकेत होता. चालू घडीच्या समाजवादी तत्वांची बीजेच त्यांत आढळतात. हे आब्राम्हण शूद्रादि विचारवंताना पटू लागले आहे. ही समाधानाची गोष्ट होय.

या नव्या सत्यशोधकी धर्मप्रसाराच्या कामांत सहकार करायला ज्योतिबाला फारच थोडे सहकारी लाभले. तो विचारच इतका जबरदस्त बण्डखोरीचा होता का तो एकाकी पचनी पडण्याएवढा मगदूर मोठमोठ्या पांढरपेशांना नव्हता, तर ज्योतिबाच्या मागासलेल्या जातभाई समाजाची कथा ती काय ! सुरुवातीला माळी गवळी रामोशी समाजांतले मूठभर अनुयायी मिळाले, तरी क्षत्रिय मराठा समाजातला एकहि आदमी त्या वेळी पुढे सरसावलेवा आढळत नाही. कारण स्पष्ट आहे. पेशवाईच्या पुनरागमनाची स्वप्ने पाहाणा-या भटां बामणांइतकेच मराठा समाजातले सरंजामी पुढारी आपापल्या शिलकी

शिलेदारी वैभवात तर्र

होते. आत्मोद्धाराचा नि समाजोद्धाराचा ज्योतिबाला बसलेला चिमटा त्यांच्या गांवींही नव्हता. साक्षरतेचे महत्वहि त्यांना पटत नव्हते. सत्यशोधक समाजाचे ध्वजधारक म्हणून मराठा समाजांतील जी कांही थोडी मंडळी पुढे आलेली दिसतात, ती सारी काल परवाची लागण आहे. अलिकडच्या काळांत या चळवळीला जे महत्त्व आले ते केवळ

छत्रपती शाहू महाराज

यांच्या प्रभावी पुढारपणामुळेंच