निवडक बातमीदार

जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या साप्ताहिक बातमीदार मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात खूप लेखन केलं. या साप्ताहिकातील त्यांचे वाचकांचे पार्लमेंट हे सदर खूपच गाजले. याव्यतिरिक्त त्यांचे भरपूर लेखन या साप्ताहिकात प्रसिद्ध झाले. त्यापैकी हे काही लेखांचे संकलन...

 

सत्यशोधक ज्योतिबा

सत्य चिरडले वेचुनि ठेचूनि उफाळेल ते नेमानें।

जो सत्याचा शोधक मोक्ष त्यास ये बलीदाने

''ब्राम्हण भट जोशी उपाध्ये इत्यादि लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरितां व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारें आज हजारों वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत यास्तव सदुपदेश व विद्याद्वारें त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरितां म्हणजे धर्म व व्यवहारसंबंधी ब्राम्हणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यांस मुक्त करण्याकरिता '' ता. २४ माहे सप्तंबर सन १८७३ रोजी स्थापन झालेल्या

सत्यशोधक समाजाचे जनक

 ज्योतिराव गोविंदराव फुले यांची पुण्यतिथि चालू आठवड्यात महाराष्ट्रभर साजरी होणार आहे. ज्योतिबाच्या हयातींत आणि सन १८९० साली ते दिवंगत झाल्यानंतर सुमारे अर्धशतक रंजल्या गांजल्या अनाथ अपंग मानवतेच्या उद्धारासाठी सबंध आयुष्य कुरबान करणा-या या थोर विचारक्रांतिकारकाच्या हेतूंचा कडूजहर विपर्यास चालूच होता. या विपर्यासाच्या बदकर्मात पुणे शहर नि पुणेरी बामण यांनी

कमालीचा बदलौकीक

कमावलेला आहे. ता. ४ सपतंबर १९२५ रोजी पुणे मुनसिपालटींत फुले पुतळ्याचा प्रश्न आला तेव्हा तर या बदलौकीकाच्या शर्यतींत पुण्याच्या भटांनी आणि मयत बाबूराव फुले नि हयात गणपतराव नलावडे यांसारख्या त्यांच्या भटाळलेल्या बामणेतरी मांजरांच्या डावल्यांनी लोकशिक्षण चढाओढ केली. ''ज्योतिबा फुले हा क्रिस्ती मिशन-यांचा एक पोटभरू दास होता, '' या पालुपदाने सुरुवात करून, त्या सत्यशोधक महात्म्यावर नऊ लाख बिभत्स शिवीगाळीचा उकीरडा उधळण्याचा मुनसिपालटीत शिमगा साजरा झाला आणि त्याचे एक छापील चोपडेहि फैलावण्यात आले. आज काळ बदलला. आता

काळाची करणी पहा

ज्या मंडईच्या कळशी माडीवर मयत लखुनाना आपटे यांच्या अध्यक्षतेखालीं ज्योतिबाचा अर्वाच्य शिमगा साजरा झाला, ----------- पुतळा बंडाच्या प्रसंगी ज्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला एक आठवडाभर हत्यारबंद पोलिसांच्या पहा-याचे कडे पडले होते, तो पुतळा

फुले मंडईचा द्वारपाळ

बनला. निबंधमालेत ज्या मराठीच्या शिवाजी नें ज्योतिबाला महामूर्ख शूद्रशिरोमणि ठरविण्यासाठी पेशवायी तंगडझाड केली. ते विष्णूशास्त्री चिपळोणकर एका बटाटेवाल्याच्या दुकानाच्या फडताळातच बसलेले आढळले असते, पण तेथून ते मागेच फरारी होऊन कोणच्याशा कॉलेजच्या कोप-यांत छपून बसलेले आहेत म्हणतात. ज्या बाबूराव फुल्याने ज्योतिबाला स्वरचित छापील चोपड्यातून निरर्गल शिव्याचा भडीमार केला, त्याला त्याच वेळी

तोंडात किडे पडून मरशील

असा हजारो बाया बापड्यांनी शाप दिला. आणि काय आश्चर्य सांगावे ! खरोखरच तो प्राणी अखेर तस्सेच होऊन परलोकवासी झाला !

ज्योतिबा बण्डखोर निर्माणच कां झाला ? तुका म्हणे पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काम नोहे ज्योतिबा जातिवंत होता. ज्या श्रमजीवी शूद्र समाजात त्याचा जन्म झाला, त्याच्या सामाजिक नि धार्मिक अडीअडचणी, वरिष्ठ जातवाल्यांचा हरघडी टोचणारा बोचणारा उपहास निंदा छळ तिटकारा -------- विचारवंत मस्तकात दर क्षणाला प्रतिकाराच्या तुफानी लहरी खळखळत होत्या. चोहो बाजूंनी हिंदूंची समाजरचना, सामाजिक जुनेपुराणे विकल्प आणि मनुस्मृतिप्रणित वेदिक धर्माचे दण्डक

खबरदार गरबड करशील तर

म्हणून त्याला रोजच्या रोज धमकावीत होते. बामणांची हिटलरी पेशवाई नुकतीच नष्ट झाली होती तरी त्या जळालेल्या सुंभाचे पीळ कायम होते. पेशवाईच्या पुनर्घटनेचे पुणेरी भटांचे प्रयत्न जारी होते. श्रमजीवी शेतकरी कामकरी समाज कुंथत होता, पण त्या घाणेरड्या जिण्याची चीडच त्याला येत नव्हती. देवाने दिलेल्या जन्माच्या आधीव्याधी मुकाटतोंडी आपण भोगल्याच पाहिजेत या भ्रमाने ते सारे पछाडलेले होते. अस्पृश्यांची अवस्था शूद्रांहून भयंकरच होती.

 

या सर्व अधोगतीचे कारण काय

 

याचा ज्योतिबा कसोशीनें विचार करू लागला आणि त्याने बिनचूक सत्य शोधून