पंडिता रमाबाई सरस्वती : Page 10 of 31

शीघ्र कवित्वाने आणि संस्कृतभाषा पटुत्वाने प्रोफेसर टॉनी, पंडित महेशचंद्र न्यायरत्न, केशवचंद्र सेन, आनंद मोहन घोस प्रभृति मोठमोठ्या पुढाऱ्यांना नि पंडितांना चकित करून टाकले आहे. अशी बातमी येताच कोण हो ही ? तिकडे बंगाल्यात कशी गेली ? का गेली ?” इत्यादी चौकशी महाराष्ट्रात चालू झाल्या.

प्रकरण ४ थे

 सत्कार सन्मान आणि भविष्याचा शोध

जागोजागच्या शास्त्रीपंडितांच्या सभांतून आणि धर्ममंडळातून रमाबाईला व्याख्याने, प्रवचनांची निमंत्रणे येऊ लागली. सत्कार सन्मानाची झुंबड उडाली. कलकत्ता येथील सिनेट हाऊसमध्ये सर्व जुन्या नव्या मतांच्या शास्त्री पंडित पुढाऱ्यांची आणि संस्कृताच्या प्रोफेसराची प्रचंड जाहीर सभा भरली. आपल्या बरोबरीचीच एक विद्वान स्त्री या नात्याने सर्वांनी रमाबाईंचा हार्दीक सत्कार केला. संस्कृत कविताबद्ध एक मानपत्र अर्पण करून

 रमाबाईला पंडिता पदवी

दिली. आपण प्रत्यक्ष सरस्वती देवीच आहात या मानपत्रातील उल्लेखाला रमाबाईंनी तात्कालिक संस्कृत शीघ्र कवितेने उत्तर दिले. - आपण माझी जी एवढी प्रशंसा की तिला मी मुळीच पात्र नाही. मी सरस्वती नव्हे, तर त्या देवीच्या दरबारातील एक विनम्र सेविका आहे आणि भारतीय अबलांच्या शैक्षणिक नि सर्वांगिन उद्धारासाठी मी आपले आयुष्य वेचणार आहे. आपणा सर्व पंडिताग्रणींचा आशीर्वाद असावा, सरस्वती आणि पंडिता या बहुमानाच्या पदव्या रमाबाईशिवाय इतर कोणत्याही हिंदी स्त्रीला मिळालेल्या नाहीत.

महिलोद्धाराची पहिली आरोळी

 केशवचंद्र सेन वगैरे मंडळींनी रमाबाईंना आपापल्या घरी बोलावून, आळी-मोहल्यातल्या पडदानशीन स्त्रियांपुढे व्याख्याने देण्याचा उपक्रम केला. पंडिता संस्कृतात बोलत आणि कोणीतरी शास्त्री बंगाली भाषेत त्याचा तर्जुमा सांगत असे. एकदा बाबू ज्योतिंद्र मोहन टागोर यांच्या घरी बंगाली पंडितांची सभा भरून रमाबाईंच्या जीवनाविषयीची कल्पनांची खूप कसोशीने परीक्षा घेण्यात आली. शास्त्रपुराणातले प्राचीन आधार दाखवून, स्त्रियांन नुसते साक्षरच नव्हे, तर सुविद्य होऊन, पुरुषांच्या बरोबरीने समाजकारण, धर्मकारण नि राजकारण हाताळण्यात काही पाप नाही. तो त्यांचा अधिकारच आहे. हा सिद्धांत हजरजबाबी कोटीक्रमाने इतका ठसठशीत मांडला की सारे सभाजन कौतुकाने माना डोलवू लागले.

बाबू आनंद मोहन घोस यांच्या घरी स्त्रियांची सभा भरली असता पंडिता रमाबाईंनी द्रोपदी, देवकी, सत्यभामा, सावित्री इत्यादी पौराणिक महिलांची उदाहरणे देऊन, पुरुषांच्या बरोबरीने सार्वजनिक सर्व कार्यात पूर्वी स्त्रिया कशा भाग घेत असत, हे सांगितले. त्या आणखी म्हणाल्या, - प्राचीन काळी भरतखंडात बालविवाहाची रूढी मुळीच नव्हती. मुलीचे बालपणी लग्न केले नाही आणि त्यांना शिक्षण दिले तर त्या दुर्वर्तनी निघतील, हा भ्रम मूर्ख लोकांनी रूढ केलेला आहे. पुराणकालीन यच्चयावत थोर लौकीकवान महिलांनी प्रौढावस्थेत स्वयंवराचा हक्क गाजवलेला आहे आणि आपल्या विद्वत्तेने मोठमोठे समाजकारणी नि राजकारणी मुकाबले सोडवून देशाचे कल्याण साधलेले आहे.

सोनेरी कव्हराचे संस्कृत बायबल

 ख्रिस्तपंथियांची पहिलीच ओळख

 कलकत्त्यास एक वर्ष मुक्काम असताना, पंडिताबाईंचा शेकडो ब्राह्मण विद्वानांशी परिचय झाला. पण ख्रिस्तीधर्म आणि मिशनरी याविषयी त्यांना कसलीच काही माहिती नव्हती. एक दिवस त्यांना ख्रिस्ती मंडळींच्या स्नेह संमेलनाचे निमंत्रण आले. ख्रिस्तीजन म्हणजे कोण ? काहीच उमगे ना त्यांना. अनेक ब्राह्मण मित्रांच्या सांगण्यावरून श्रीनिवाससह त्या संमेलनाला गेल्या. त्या प्रसंगाची हकिकत रमाबाई अशी सांगतात, - ख्रिस्तीजनांच्या मेळाव्यात जाण्याचा आमच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. तेथे जमलेल्या सर्व मंडळींनी आमचे फार आपुलकीने स्वागत केले. खुर्च्या-टेबल, सोफे, दिवे वगैरे थाट अगदी नव्यानेच आम्हाला दिसला. जमलेले अनेक हिंदी स्त्री-पुरुष इंग्रजी पद्धतीचा पोशाख करून अगदी साहेब बनलेले आणि बोस, बॅनर्जी ही नावे तर ब्राह्मणांची ! बुचकळ्यात पडलो आम्ही. हे लोक इंग्रजी लोकाच्या हातचा चहा पीत होते नि बिस्कीटे खात होते. त्यांनी आम्हालाही चहा-बिस्कीटाचा आग्रह करताच आम्ही दचकूनच गार झालो. वाटले, कलकत्ता शहरात कलीने पुरा कहर माजवला आहे. म्हणूनच हे चांगले चांगले