पंडिता रमाबाई सरस्वती : Page 9 of 31

टेकडीला लोटीत लोटीत काठाजवळ आणीत असलेला दाखवून) ते पहा एक ऋषी आम्हाला निरोप द्यायला येताहेत मागोमाग आम्ही आज धन्य झालो. पुण्य फळा आले. ’’

पोरांनी आपल्या धंद्याचेच बिंग हुडकून काढलेले पाहताच उपाध्ये मंडळींनी मुकाटतोंडी पोबारा केला.

वीस वर्षांची साडेसाती ?

 वनवासातून सज्जनवासात

 जन्माला येऊन अवघे सहाच महिने झाले असतील नसतील तेव्हापासून तब्बल २० वर्षे तीर्थयात्रा, वनवासाची हज्जारो मैलांची पायपीट नि उपासमार रमाबाईंच्या नशिबी अखंड लागलेली होती. शनीची साडेसाती साडेसात वर्षांचीच असते म्हणतात. पण आयुष्याच्या सुरुवातीचीच तब्बल वीस वर्षे रमाबाईंच्या जीवनाचा उकीरडा करणारा ग्रह कोणता, हे कोडे ज्योतिषांनाही सुटण्यासारखे नाही. ग्रहदशा अनुकूल नसता एकादा मोठा पट्टीचा गवई घरोघर दारोदार ताना ठोकीत फिरता तरी मूठभर तांदळाची त्यावर मेहरबानी करायला कोणाला सूचायचे नाही. पण काळ अनुकूल होताच तोच गवई स्वतःच्या झोपडीत सहज नुसता शिंकला तर ओ हो हो, काय हो पल्लेदार भैरवीची तान ही म्हणून सारे लोक तेथे जमा होतील. प्रतिकूल काळात थोड्याशा गरजेसाठी साऱ्या गावात जोडेफाड केली तर जोड्याच्या टाक्यापुरतीही दाद कोणी घेत नाही. पण तोच काळ पालटला का हजार मैलावरचे रसिक घ्या घ्या म्हणून त्याच्या भेटीसाठी धावत येतात. दुनियेचा बाजार असा उलट्या पावलांचा आहे.

श्रीनिवास आणि रमबाईंची ग्रहदशा पालटली सन १८७८ च्या सुमारास ते कलकत्ता शहरात येऊन दाखल झाले. ईस्ट इंडिया कंपनी सरकार बहादुरांची ही राजधानी. प्राचीन मनुस्मृतींच्या दण्डकांवर डोळे मिटून विश्वसाने आचार विचार करणारे लाखो लोक या शहरात होते णि तसल्या धर्माचरणात मनाला शांती नाही, माणुसकीला वाव नाही, स्त्रियांच्या उद्धाराला कोठेच जागा नाही, असल्या पोती-भिक्षुक-पूजक धर्माच्या नादाने भावी पुरोगामी जमान्यात हिंदुजनांना कोठेही टिकाव धरता येणार नाही, म्हणून त्यातला वाईट भाग कापून काढून चांगल्याचा तेवढा जोराने पुरस्कार करावा, अशा विचारांनी थरारलेले शेकडो पंडितही होते. या विचारसरणीचे बंगल्यातले आद्य बंडखोर राजा राममोहन रॉय. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून केशवचंद्र सेन, पंडित महेशचंद्र न्यायरत्न, कालीचरण बानजी प्रभृती मंडळींनी ब्रम्हो समाज संस्था चालवून हिंदु धर्माचे नवीनीकरण जोराने चालवले होते. शिवाय शास्त्रांचे सामाजिक दंडक, रूढीच्या प्राबल्याने आचार विचारांचा नित्य होत असलेला कोंडमारा, स्त्रियांचे सर्वांगिण अवनति इत्यादी हिंदु धर्माच्या जुलमी गोलमालाला विटलेल्या आणि इंग्रजी ज्ञानाने सत्यशोधक नि चिकित्सक बनलेल्या नवहिंदू तरुणांसाठी माणुसकीचा भूतदयेचा आणि महिलाद्धोराचा सोपा मार्ग दाखवणाऱ्या ख्रिस्ती धर्माचे मोठमोठे मिशनरी कलकत्यास ठाण मांडून बसलेच होते.

सरस्वती देवी अवतरली

          आतापर्यंत पोटभरू, लुटारू भिक्षुक, उपाध्ये, गंजड गोसावडे यांनीच गजबजलेल्या तीर्थक्षेत्रादी ठिकाणी आयुष्य घालविलेल्या बहिण-भावाला कलकत्ता शहर पाहताच, आपण माणसात आल्याचा साक्षात्कार पटला. एका वस्त्रानिशी आलेल्या २० वर्षांच्या, चमकदार, चित्पावनी घाऱ्या डोळ्यांच्या सौंदर्यवान पण सभाधीट रमाबाईंनी एका देवळात तेथल्या मंडळींना आपल्या संस्कृत ज्ञानाचा, पांडित्याची आणि अस्खलित प्रवचनाची चमक दाखवताच नगरात एक महापंडिता आल्याची बातमी बिजलीच्चया वेगाने कलकत्ता शहराभर फैलावली. उपासतापासाने दोघांचे देह कृश झालेले होते, तरी ज्ञानाची संस्कृतीची नि अविचल नीतिमत्तेची झकाकी त्यांच्या तोंडावर ओसंडत होती.

          सुधारक पुरोगामी गटाच्या बंगाली पंडितांचे लक्ष रमाबाईंनी तात्काळ वेधून घेतले. तिची संस्कृत भाषेतली व्याख्याने, प्रवचने नि चर्चा ऐकून मोठमोठ्या पट्टीच्या दशग्रंथी पंडितांनी आश्चर्य व्यक्त केले. पुराण ग्रंथातील अठरा हजार संस्कृत श्लोक घडाघडा पाठ म्हणून तिने संस्कृत शास्त्रांना चकित केले. तिचे व्याकरणातील नैपुण्य पाहून वैय्याकरणी दिग्मूढ झाले.

 ही प्रत्यक्ष सरस्वतीच पृथ्वीवर अवतरली

असे जो तो बोलू लागला. बंगाल्यातल्या देशी-विदेशी वृत्तपत्रांनी रमाबाईंवर मोठमोठे अग्रलेख लिहून तिच्या अवचित आगमनाचा सर्व हिंदुस्थानभर डंका पिटला. मुंबईच्या टाईम्स ऑफ इंडिया, हिंदु प्रकाशित पत्रात - रमाबाई नावाची कोणी वीस वर्षांची मऱ्हाठी तरुणी कलकत्ता येथे आली असून, तिने आपल्या विद्वत्तेने