पंडिता रमाबाई सरस्वती : Page 8 of 31

बुचकळ्या गळ्यापर्यंत पाण्यात उभे राहून सहकुटुंब सहपरिवार मंत्रघोषणाचा सपाटा सारखा चालू ठेवला. कपिलाषष्ठीच्या दिवशी आपल्याला ती सुवर्णाची द्वारका दिसावी, आपली असतील नसतील ती सारी पापे भस्म व्हावी, देव आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि पूर्वीचे आपले गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे, एवढ्यासाठी हा सारा खटाटोप !

 सुवर्ण द्वारकेचे दर्शन घेण्यासाठी हिंदुस्थानाच्या दहाही दिशाहून लाखोलाखो धर्मवंत हिंदू धावून आले. दान, दक्षणा, समुद्रस्नाने, ब्राह्मण भोजपनांचा धुमधडाका चालू झाला. अखेर तो मंगल दिवस उजाडला.

सरोवरात सुसरी आहेत, संभाळा

 आज आपल्याला सोन्याची बुडालेली द्वारका समुद्रसपाटीवर आलेली प्रत्यक्ष दिसणार, म्हणून जो तो आशेच्या मुठीत जीव धरून पहात बसलाय. सकाळी ढगार आले आणि धुकेही बरेच होते. पण तीन प्रहरापासून आकाश स्वच्छ होऊ लागले. संध्याकाळच्या सुमारास मावळत्या सूर्याचे तांबडे पिवळे शेंदरी किरण समुद्राच्या पाण्यावर चमकू लागताच एक सुंदर मनोवेधक देखावा निर्माण झाला. मुंबईच्या समुद्रावर असे देखावे पुष्कळांनी पुष्कळ वेळा पाहिले असतील. तोच प्रकार तेथे झाला. पण लोकांना वाटले, हा हा दिसली हो दिसली, सोन्याची द्वारका काही जण कुजबुजले छे ती तर सूर्याची किरणे होती नुकती. ती अशीच लाटांवर चमकायची. सारा कल्पनातरंगांचा खेळ. द्वारका फक्त पुण्यवानालाच दिसायची ! तेव्हा आपल्याला दिसली बुवा असे सांगून स्वतःला पापी ठरवणार कोण शहाणा पुढे येणार ? जो तो दिसली, मला दिसली अशीच बडबड करीत सुटला. द्वारका दर्शनाने यात्रेकरूंच्या कर्माची कटकट किती मिटली ती त्यांच्या कर्मालाच माहित. पण त्यांनी वारेमाप उधळलेल्या दान दक्षणांच्या बहुमोल द्रव्यांनी तीर्थोपाध्यांच्या तिजोऱ्या मात्र गडगंज तुडुंब भरल्या. हा भोळसाटपणाचा बाजार अजूनही द्वारकेला चाललेला असतो.

(२) रेवळसरातले तरंगते सप्तर्षि

सन १८७९ साली हिमालयाच्या आसपास भटकत असताना मंडीपासून फार दूर नसलेल्या रेवळसर नावाच्या सरोवराजवळ रमाबाई नी श्रीनिवास आले. क्षेत्रविधि करण्याचे हे एक मोठे पवित्र स्थान समजतात. क्षेत्रोपाध्यानी दोघांची चौकशी केली. दोघेही भणंग भिकारी दिसले. दिसले कसले ? होतेच मुळी. ‘‘आम्ही दुष्काळातून भटक आलेले निर्वासित आहोत ’’ असे सांगताच भटजी म्हणाले, - ‘‘सांभाळा हो, या सरोवरात प्रचंड सुसरी आहेत. स्नानासाठी आत उतरूबितरू नका. ’’

रमाबाई – सरोवरात या सात टेकड्या हो कसल्या ?

भटजी – त्या टेकड्यांच्या रूपाने आकाशातील तारकापुंजातले सप्तर्षि येथे तपश्चर्या करीत असतात. दान दक्षणेने आम्हा क्षेत्रस्थ भूदेवाना संतुष्ट केल्याशिवाय त्या ऋषींच्या टेकड्याजवळ जाऊन त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेणे दुरापास्त आहे. सप्तर्षि प्रसन्न झाले तर आपोआप ते चालत काठाजवळ येऊन पुण्यवंत भक्तांना दर्शन देतात. इतरांना सुसरी गटागट गिळून फस्त करतात. या भानगडीत तुम्ही पडू नका बरं. तुम्ही दरिद्री, भिकारी, फुकट प्राणाला मुकाल.

जागोजाग देवधर्माच्या नावावर चाललेले खेळखंडोबा बहिण भावाने अनुभवलेले असल्यामुळे, असल्या थोतांडावरचा त्यांचा विश्वास आता साफ उडालेला होता. सरोवरात गेलोच तर काय होईल ? सुसरी आपल्याला खातील. छान होईल. उपाशी जगण्यापेक्षा असले मरण काय वाईट ? आपण तर मरणाची वाट पाहत आहोत. असा विचार करून उजाडता पहाटे बहिण-भाऊ सरोवरात शिरली. सप्तर्षींचे दर्शन झाले तर उत्तमच. सुसरींनी गट्ट केले तरीही उत्तमच. अशा निश्चयाने ते प्रत्येक टेकडीजवळ पोहत गेले.

पाहतात तो काय चमत्कार सांगावा ? देवदार लाकडांच्या तरफ्यावर दगडमाती रचून त्यावर गवत पालाझाडे उगवलेल्या त्या कृत्रिम टेकड्या होत्या. पुण्यवानांच्या मोक्षासाठी आपोआप काठाकडे त्या येतात. म्हणजे धुर्त भटजी त्यांना गुपचूप लोटीत आणतात. भोळ्या-भाबड्यांना तो दैवी चमत्कार वाटायचा आणि तो तीर्थोपाथ्यांच्या झोळ्या दानदक्षणांनी भरायचे.

रमाबाई नी श्रीनिवास स्नाने करीत असतानाच उपाध्ये तेथे आले. त्यांना पाहून रमाबाई म्हणाली - ‘‘भटजी महाराज, आमची स्नाने निर्विघ्न पार पडली, सातही ऋषींनी आम्हाला दर्शन दिले. सुसरी मात्र भेटल्या नाहीत. (श्रीनिवास एका