पंडिता रमाबाई सरस्वती : Page 7 of 31

दोन चार रुपड्या महिन्याला मिळतील त्यावर कोठे तरी कशी तरी गुजराण करावी आणि पुढचा रस्ता धरावा असा क्रम चालू झाला. गावोगाव शेकडो शहाणे गृहस्थ त्यांच्या अंगावरून आले गेले, पण एकानेही त्यांच्या बुद्धीमत्तेची किंवा संस्कृत ज्ञानाची माणुसकीने दखल घेतली नाही. आहेत कोणी तरी भिकाऱ्याची पोरं, मागतील भीक, जगतील कशी तरी, नाही तर मरतील ! समाजाची दृष्टी आजही अशीच आढळते.

 एका गावी एका श्रीमंत गृहस्थाने मात्र त्यांच्या संस्कृत ज्ञानाची कीव करून त्यांना आपल्या घरात आश्रम दिला. श्रीनिवासने रोज भागवत पुराण वाचावे आणि रमाबाईने संस्कृत काव्यांवर रसाळ प्रवचने करावी. थोड्याच दिवसात त्यांना या परावलंबी जीवनाचा कंटाळा आला आणि ते उत्तर हिंदुस्थानाकडे पायपीट करीत गेले. माझ्या आयुष्यात कमीत कमी १५ हजार मैल अनवाणी पायपिट मी केली असे रमाबाई म्हणत असत. या चार वर्षांच्या वनवासाचे त्या असे चित्र काढतात –

 ... मधून मधून माझ्या भावाला काम मिळे, तथापि आमचा बहुतेक काळ भटक्यासारखाच जाई. बरेच दिवस उपाशी राहण्याचाही प्रसंग पडत. म्हणून मूठभर दाणे भिजवून थोड्या मिठाबरोबर ते फाकण्याची पाळी येई. पांघरायला घोंगड्या अथवा दुसरी जाड वस्त्रे आमच्यापाशी मुळीच नव्हती. छत्रीचे तर नावच नको. सगळा प्रवास पायी नि अनवाणी. रात्र पडली म्हणजे रस्त्याच्या बाजूच्या एखाद्या झाडाखाली, पुलाच्या कमानीखाली, नाही तर चक्क उघड्या जागेवर आकाशाचे छत आणि जमिनीचा बिछाना करून विश्रांतीसाठी अंग टाकायचे. एकदा पंजाबात झेलम नदीच्या काठी रात्र काढण्याचा प्रसंग आला. अखेर नदीच्या वाळूत दोन खळगे खोदून त्यात आम्ही गळ्याइतके स्वतःस पुरून घेतले. कधीकधी भूकेने पोटात इतकी आग पडायची की ती शमवण्यासाठी आम्ही सालीसकट रानफळे खावून त्यांच्या बियाही गट्टम करीत असू.

देवाधर्माच्या नावावर ढोंगेसोंगे

 अंगाला राख फासणारे, जटा वाढवून गावोगाव धार्मिक अरेरावीने भीक मागत भटकणारे साधू गोसावी यांची संख्या हिंदुस्थानात कोटी-कोटी गणतीची आहे. त्यांच्या आयुष्यक्रम किळसवाणा असतो. बहुतेक सारे ज्ञान शून्य असनही साधुत्वाचा नि योगसामर्थ्याचा मोठा डौल आणतात. तंबाखू, गांजा, भांग, अफू असल्या अंमली व्यसनात ते नेहमी तर्र असतात. त्यांच्या भाषणात ग्राम्यपणा नि अश्लिलपणा फार. शील कशाशी खातात हे तर त्यांच्या गावीही नसते. एकादा दुसरा अपवाद असेल, नाही असे नाही. पण बहुतेकांची तऱ्हा अशीच. असा आपला अनुभव रमाबाई सांगतात. वडील-मातोश्रींनाही हा अनुभव होताच. पण ते म्हणत - यात्रेकरूंना फसवून लुबाडण्यासाठी हे साधू गोसावी आणि तीर्थोपाध्ये हव्या तशा खोट्यानाट्या गोष्टी सांगतात, थापा देतात, धमक्याही देतात, इतके आम्हाला खासखूस माहित असूनही आम्ही त्यांना वंदनीय पूजनीय का मानतो ? धर्मशास्त्रात तसे सांगितले आहे म्हणून. प्रसंगविशेषी आम्ही काही सोंगाड्यांची हजेरी घ्यायलाही कमी केले नाही. पोथींतल्या शब्दांप्रमाणे आचार विचारांची खुरमुंडी करणारांच्या आयुष्याचा असाच गाथागोंधळ व्हायचा ! लाखो लोकांचे जीवन या भ्रमाने बरबाद झाले.

 ढोंगधतुऱ्याचे दोन अनुभव

 (१) कृष्णाची बुडालेली द्वारका समुद्रातून वर येते !

 सन १८७१ सालची गोष्ट. रमाबाई त्या वेळी १३ वर्षांच्या होत्या. अनंतशास्त्र्यांच्या तीर्थयात्रेची छावणी काठेवाडात द्वारकेला पडली होती. द्वारका म्हणजे वैष्णवांचे महाक्षेत्र. डोंगरे कुटुंब वैष्णवपंथी. समुद्र म्हणजे सर्व तीर्थांचे माहेरघर. समुद्रस्नानाने सगळी पातके तडाक्यासरशी भस्म होतात, असा धर्मवान हिंदूंचा विश्वास ! एवढ्यासाठी अनंतशास्त्री द्वारकेला सहकुटुंब एक वर्षभर राहिले होते. या वर्षी साठ वर्षांनी येणारा कपिलाषष्ठीचा योग होता. याच योगावर श्रीकृष्णाने सोने, हिरे, माणकांनी बांधलेली आणि पुढे समुद्रात बुडवलेली द्वारका नगरी समुद्राच्या सपाटीवर येऊन पुण्यवंतांना दर्शन देते म्हणतात. अर्थात तेवढे पुण्य साधण्यासाठी साधू, गोसावी, ब्राह्मण, भिक्षूक, तीर्थोपाध्ये यांना दान दक्षणा, भोजनांनी संतुष्ट करणे जरूर असते. शास्त्रीबोवांनी जवळच्या होत्या नव्हत्याची वाट लावून हे सारे यथासांग केले. शिवाय त्रिकाळ समुद्रस्नानाच्या