पंडिता रमाबाई सरस्वती : Page 6 of 31

तुझ्यावरचे माझे प्रेम आणि सन्मार्गाने चालण्याचे मी तुला लावलेले वळण तू कधी विसरू नकोस बरे. नीतीच्या मार्गावरून चळू ढळू नकोस. पोरी, तू जगलीस वाचलीस तर सदाचरणाने आयुष्य आणि जन्मभर ईश्वरसेवा करण्यास चुकू नकोस. मुली, तू माझी सर्वात धाकटी नि सर्वात आवडती मुलगी आहेस, हे लक्षात ठेव. तुला मी दैवाच्या स्वाधीन करतो. तू त्याचीच कन्या म्हणून अखंड त्याची सेवा नि भक्ती कर.

पित्याच्या या उपदेशाचा तरुण रमाबाईंच्या हृदयावर जो खो ठसा उमटला तोच तिच्या भावी आयुष्यातील पंचखंडमान्य लोकोत्तर कर्तबगारीत अजरामर ठरला.

संकटांच्या कहराने घेतलेले बळी

वडलांचा जलसमाधीचा निश्चय पाहून श्रीनिवास उफाळून उठला. माझ्या जन्मदात्यानी अन्नान्न करून प्राण सोडावे ? धिक्कार धिक्कार मला नि माझ्या तारुण्याला ! झक मारतो तो जात्याभिमान आणि जळो तो वर्गश्रेष्ठत्वाचा कोरडा अभिमान ! माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी वाटेल तो हलका सलका धंदाही करायला मी तयार आहे. चला, आपण सारे एखाद्या खेड्यात जाऊ. बाबांना मी आपल्या खांद्यावर घेऊन चालतो. मोलमजुरी करीन, पण बाबा, जलसमाधीचा हा हट्ट सोडून द्या. श्रीनिवासाच्या नि माझ्या आईच्या आग्रहाने जलसमाधीची प्रसंग एकदाचा टळला. अरण्य सोडून मंडळी खेड्याकडे निघाली. वाटेत शास्त्रीबोवांची प्रकृती बिघडली. एका खेड्यात येताच तहान भुकेच्या वेदनानी त्यांनी डोळे पांढरे केले. मुलांनो, मला थोडे साखरपाणी द्या रे ते म्हणाले. आसपासच्या झऱ्यातले पाणी तोंडात घालता यईल, पण साखर कुठून आणणार ?

साखर पाणी द्या रे

काळीज कापीत गेले ते शब्द सगळ्यांच्या ! जेमतेम पाणी घातले तोंडात. ते बेशुद्ध पडले ते पडलेच. तिसऱ्या दिवशी, त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

ज्ञान नि व्यवहाराची फारकत

  गावाचा एकही माणूस ढुंकून पाही ना. अखेर एका ब्राह्मणाला दया आली. त्याने मजूर आणवून दूर नदीच्या काठावर एक खड्डा खोदवला. गावचे लोक वाळीत टाकतील म्हणून तो दूरवरच राहिला. श्रीनिवास कृष्णाबोआ आणि रमाबाई या तिघांनी बापाचे प्रेत काठीला बांधून खांद्यावर वाहून दोन मैल नेले आणि शेवटचे संस्कार केले. थोड्याच दिवसात मातोश्री लक्ष्मीबाईंचा असाच अंत झाला. पाठोपाठ बहीण कृष्णाबाई पटकीच्या आजाराने मरण पावली. श्रीनिवास आणि रमाबाई भरल्या जगात उघडी पडली.

 प्रकरण ३ रे

 वनवास आणि जनवास

 आई-बाप नि बहिण अन्नअन्न, पाणीपाणी करून मेल्यावर श्रीनिवास आणि रमाबाई यांची अवस्था १३ व्या शतकातल्या अनाथ ज्ञानेश्वर भावंडांसारखीच झाली. या वेळी रमाबाई १८ वर्षांची नि श्रीनिवास २० वर्षांचा होता. दोघांचेही संस्कृत भाषेचे, भागवत, पुराण, भगवतगीता, व्याकरणादी अध्ययन उत्कृष्ट झालेले होते. संस्कृत भाषेत तासनतास अस्खलित संभाषण, प्रवचन करण्याचे रमाबाईंचे प्राविण्य कौतुकास्पद होते. पण जगाच्या व्यवहारात वागावे कसे आणि पोट भरावे कसे, याचे ज्ञान मात्र कोणालाही नव्हते. असणार कसे ? सारा जन्मच वनवासाच्या पायपिटीत आणि क्षेत्रोपाध्यांच्या भिक्षुकशाही जंजाळात गेलेला !

 बालवयापासून तो वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत आसेतू हिमालय तीर्थयात्रेचा हजारो मैल पायपिटी सारखी नशिबाला लागलेली. ठिकठिकाणी पाहिलेले देखावे, साधू, गोसावी, क्षेत्रस्थ, भटाभिक्षुकांचा लुटारूपणा, व्यसने नि अत्याचार, देवप्राप्तीसाठी आई-बापांनी केलेले निर्जळी उपासतापास, तीर्थस्नाने, स्वतः उपाशी राहून गोसाव्यांना उदारपणाने दिलेल्या दक्षणा नि आकण्ठ भोजने, अखेर प्राप्त झालेली अन्नान्नदशा आणि तिने घेतलेले आई-बाप, बहिणीचे निष्ठूर बळी, या सर्व प्रकाराचे मात्र रमाबाईंच्या चरित्रावर नि चारित्र्यावर इतके खोल परिणाम झाले की पुढचे तिचे सारे आयुष्य नि कर्तबगारी त्यांनी भरपूर थरारली आणि भरारली.

 वनवासाशिवाय गत्यंतरच नाही

 जवळ फुटकी कवडी नाही, पोटात अन्नाचा घास नाही, हातपाय थकलेले, जागोजागचा समाजही दाद घेत नाही, सहानुभूतीने साधी चौकशीही कोणी करीत नाही. अशा अवस्थेत ही बहीण-भाऊ देवाचे नाव घेऊन उत्तर हिंदुस्थानचा मार्ग आक्रमू लागली. एखाद्या गावात भावाने मिळेल ते काम पत्करावे,