पंडिता रमाबाई सरस्वती : Page 5 of 31

त्या भयंकर दुष्काळाच्या आठवणी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. त्या वाचल्या म्हणजे आजही अंगावर काटा उभा राहतो. त्या सांगतात - ... १८७६-७७ साली तो दुष्काळ कळसाला पोचला होता. तरी त्याची भयंकर चिन्हे दोन तीन वर्षे आधी जाणवतच होती. आई-वडिलांनी आम्हाला शास्त्रपारंगत खूप केले असले तरी बाहेरच्या जगाची आणि लोकव्यवहाराची फारशी अटकळ आम्हाला नव्हतीच. दुष्काळामुळे चहूकडे लोकांचे काय हाल होत होते, कोणत्या अवस्थेत ते जगत होते नि मरत होते याची स्पष्ट कल्पना असल्याचे मला आठवत नाही. पण प्रत्यक्ष आमच्याच कुटुंबातल्या मंडळींवर आलेल्या अन्नान्न दशेचे प्रसंग आणि आम्ही भोगलेल्या विपत्ती मात्र माझ्या चांगल्या स्मरणात आहेत.... आमच्या कुटुंबाने चांगले दिवस पाहिलेले होते. बाबांचा स्वतःचा जमीनजुमला होता. विद्वेत्तर त्यांनी पुष्कळ संपत्तीही मिळवलेली होती. ती आली तशी गेली ! या दुष्काळाच्या प्रसंगात त्यांची प्रकृती सारखी खंगत गेली आणि शेवटी त्यांचे डोळे गेले. मग मात्र आमची सगळ्यांची पाचावर धारण बसली. राजमान्य लोकमान्य पंडितांची मुले आम्ही. तशात पांढरपेशा ब्राहण वर्गातले पोट भरण्यासाठी मोलमजुरीही आम्हाला करता येईना. धर्मशास्त्रा प्रमाणे काटेकोर सचोटीने कसे वागावे, सोवळे ओवळे कसे पाळावे, उद्यापने तीर्थस्नाने कोणत्या मंत्रांनी नि तंत्रांनी करावी, कोणकोणते उपास करावे, इतके आमचे शास्त्राध्ययन झालेले असले, तरी वडील-मातोश्रींच्या बरोबर आपली स्वतःचीही अन्नान्न दशा झाली असता मानपान नि सामाजिक इभ्रत गुंडाळून ठेवून, प्राण वाचविण्यासाठी पडेल तो हलकासलका उद्योगधंदा कसा करावा, हे ज्ञान आम्हाला नव्हते. बरे, करावा तर आमचा उच्च वर्णत्वाचा, विद्वत्तेचानि ----- पणाचा अभिमान आडवा यायचा ! शास्त्रे उदंड शिकलो पण व्यवहाराची नि आमची गाठच पडलेली नव्हती. देव देवता आज ना उद्या आमच्यावर सोन्याचा वर्षाव करतील, आमच्या हाल अपेष्टांचे नि दैन्याचे पांग फेडतील, म्हणून स्वतः अर्धपोटी किंवा चक्क उपाशी राहून ब्राह्मणांच्या थाळ्या दक्षणेने भराव्या, ईश्वराचा राग शमवण्यासाठी त्याची आराधना करावी, नदी तीर्थात बुचकळ्या माराव्या, तासनतास गळ्या इतक्या पाण्यात उभे राहून मंत्रोच्चार करावे, यापेक्षा प्राण वाचवण्याची कोणतीच व्यावहारिक कला किंवा अक्कल आम्हाला उमगेना. माझा भाऊ श्रीनिवास एकवीस वर्षांचा तरणाबांड होता. पण महिनेच्या महिने उपासतापास करून त्याने आपल्या बांधेसूद पीळदार शरीराची माती करून घेतली होती. जवळ होते नव्हते त्या सगळ्यांची वाट लागली. अखेर, उपासमारीने मरण यायचे तेवढे शिल्लक उरले. अरेरे, केवढा तो घोर प्रसंग ! काय ते आमचे दैन्य आणि किती लाजीरवाणी ती परिस्थिती !

मुली, जन्मभर इश्वरसेवा कर

 व्यंकटगिरीच्या शिखरावर असलेल्या तिरुपती क्षेत्रात असताना या घोर प्रसगातून ही मंडळी सापडली. माणूस माणसाला विचारी ना आणि देवही वाचवण्याला धावेना ! आजवर केली ती तीर्थयात्रा नि देवदेवतार्चन वायाच गेले म्हणायचे ? आपल्याच लोकात दारिद्र्याच्या लज्जेने कसेबसे जगण्यापेक्षा, रानावनात जाऊन मुकाट्याने मेलेले पत्करले, असा कडेलोटीचा विचार करून, डोंगरे कुटुंब जिवावर उदार होऊन निर्जन अरण्यात घुसले. अहोरात्र अकरा दिवस पायपिटी. झाडपाला खावा नि पोटाची आग शमवावी. उपासमारीने कोणाचे पाऊलही धड उचले ना. अखेर शास्त्रीबोवांचा वाटेतच लोळागोळा झाला. देवाला हाक मारायची सोयच नाही आणि दैव तर हात धुऊनच मागे लागलेले ! निर्जन अरण्यात माणूस तरी कोठे आढळणार ? मानी अनंतशास्त्र्यांना कुटुंबाचे होत असलेले हाल पहावेनासे झाले. त्यांनी

 जिवंत जलसमाधी घेण्याचा निश्चिय

 एकेकाला जवळ बोलावून ते अखेरचा निरोप घेऊ लागले. रमाबाई सगळ्यात धाकटी. शेवटी तिला त्यांनी जवळ घेतली. तो प्रसंग रमाबाईंच्या शब्दातच वाचा –

... बाबांची दृष्टी गेलेली. माझा चेहरा त्यांना कशानं दिसणार ? त्यांनी मला पोटाशी घट्ट धरले. माझ्या डोक्यावरून नि गालावरून प्रेमाने हात फिरविला. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. त्यांचा कण्ठ भरून आला होता. शब्दही नीट उमटत नव्हता. ते म्हणाले – बाळे,