पंडिता रमाबाई सरस्वती : Page 4 of 31

फुकटखाऊंचा नि भटाभिक्षुकांचा तकादा लागला. ती शिकून चांगली प्रौढ होइपर्यंत मी तिचा विवाह करणार नाही, असा शास्त्रीबोवांचा आग्रह. पण अखेर लक्ष्मीबाईंच्या हट्टासाठी कृष्णाबाईंचा विवाह करून त्यांनी घरात घरजावइ आणला. हे जावईबोवा निघाले छंगीफंगी ! एक वर्षाच्या आतच त्यांने सास-याच्या संपत्तीची नि शेतवाडीची मनस्वी लूट नि अफरातफर केली. आळश्रमातल्या मंडळींची उपासमार होऊ लागली. शिष्य भराभर निघून गेले. आश्रम उजाड पडला.

प्रकरण २ रे

 कर्माची खटखट

 देणेदारांचे देणे फेडून लक्ष्मीबाई, मुलगी कृष्णाबाई, मुलगा श्रीनिवास आणि अवघ्या सहा महिन्यांची रमा बरोबर घेऊन अनंतशास्त्री तीर्थयात्रा करायला बाहेर पडले. त्या काळच्या तीर्थयात्रा म्हणजे एक प्राणांतिक प्रवासच असे. आजकालच्या आगगाडी, मोटारी, तारायंत्राच्या युगातल्या मंडळींना त्याची कल्पना होणेच कठीण. रस्ते, सडका, केवळ पायदळीच्या. सगळा प्रवास अनवाणी पायानी करायचा. वाहनांचा उपयोग करायचा नाही. काही तुरळत ठिकाणी अन्नछत्रे असली तरी तेथे अन्न घ्यायचे नाही. शास्त्रीबोवांनी सहा महिन्यांच्या रमा छोकरीला एका टोपलीत बसवून मजुराच्या डोकीवर दिली. बाकी सर्व मंडळी पायी कूच दरकूच करीत मद्रास प्रांताकडे निघाली.

एखाद्या मुक्कामाच्या क्षेत्रात धर्मशाळेत किंवा गावाबाहेर झाडाखाली छावणी द्यायची. स्नानसंध्या आन्हिक उरकून देवळात किंवा नदीच्या घाटावर संस्कृत पोथी उघडून पुराण सांगायचे. पोथीपुढे भाविक श्रोते चिमूट-मुठी तांदूळ किंवा दिडकी दमडी टाकतील तेवढ्यावर निर्वाह करायचा आणि त्यातूनच क्षेत्रस्थ, उपाध्ये, गोसावी, साधूसंतांना दक्षणा, दाने द्यायची. एका जागी असे काही दिवस काढल्यावर पुढे प्रयाण करायचे, असा क्रम चालू झाला. ज्या अनंतशास्त्राच्या गंगामूल आश्रमात शेकडो शिष्य नि पांथस्थ यात्रेकरू इच्छा भोजनाची चंगळ उडवीत होते, त्या बिचाऱ्यांवर आज चव्हाट्यावर पुराणे सांगून कुटुंबाचे पोट भरण्याचा प्रसंग आला. पुष्कळ वेळा त्याना उपासमारही व्हायची. पण हे सारे सहन करून ही मंडळी कट्टर धर्म निष्ठेने ईश्वरोपासना, तीर्थस्नाने आणि दाने करीत अखंड प्रवास करीत राहिली.

रमाबाईंचे वनवासातले शिक्षण

 इसवी सन १८५८ पासून तो १८७८ पर्यंत म्हणजे २० वर्षे कुटुंबाचा यात्रेचा वनवास चालू होता. बिचारी बाल रमा या वनवासातच वाढत होती. शास्त्रीबोव नि लक्ष्मीबाई अशाही वनवासात मुलांच्या शिक्षणाविषयी अत्यंत जागरूक राहून त्यांचे बौद्धिक संर्वर्धन करीत होते. रमा सात वर्षांची होताच तिला संस्कृत शिकवायला प्रारंभ केला. आईने रोज पहाटे ४ वाजता उठावे आणि आपल्या चिमुकल्या रमेला संस्कृत, भागवत, पुराण, गीता, व्याकरण नि अमरकोशाचे पाठ द्यावे. ते चांगले घोकवून घ्यावे. बाई बारा वर्षांची झाली तेव्हा तिला भागवत पुराणाचे अठरा हजार संस्कृत श्लोक अस्खलित पाठ म्हणता येत असत. शिवाय गीता स्तोत्रे नि कोशतर तोंड पाठ होतेच. या वनवासी डोंगरे कुटुंबाने २० वर्षात हज्जारो मैलांचा पायी प्रवास करून सेतूबंध रामेश्वरापासू तो उत्तरेकडे थेट काशी काश्मीर हिमालय पर्यंतची शेकडो तीर्थक्षेत्रे पाहिली. काही ठिकाणी त्यांना तुरळक सज्जन आदरतिथ्य लाभायचे तर पुष्कळ ठिकाणी हातावर मिळवून तळहातावर खाण्याचे आणि पोट बांधून उपाशी झोपण्याचे प्रसंग मुबलक आले. तीर्थयात्रा कशासाठी ? तर तीर्थस्नाने केल्याने, भटाभिक्षुकांना नि साधु-गोसाव्यांना दाने दक्षणा, भोजने दिल्याने आणि जागोजागच्या देव दैवतांचे दर्शन घेतल्याने सात जन्मांची पातके जळून भस्म होतात, असे पुराण ग्रंथात आवर्जुन लिहिले आहे. या श्रद्धेच्या समाधानासाठी ! एवढा मोठा पढिक धर्मग्रंथी जाडा विद्वान शास्त्री, विवेकवादी नि चिकित्सक, पण तोही या पुराणिक भुलथापांना बळी पडला ! मग इतर आडूमाडूंची अवस्था काय होत असेल ? अखेर, काशी केली, वाराणशी केली, कर्माची खटखट नाही गेली, असाच बिचाऱ्यांना कटु अनुभव आला.

मद्राशी दुष्काळात कुटुंबाची आहुती

उत्तर हिंदुस्थानातली सर्व तीर्थक्षेत्रे पाहून झाल्यावर, डोंगरे कुटुंब दक्षिणेकडे परतले असता, १८७६-७७ च्या मद्रास इलाख्यात भडकलेल्या दुष्काळाच्या तडाक्यात सापडले. एखाद्या भयंकर रोगाच्या साथीसारखे हजारो लोक भुकेला बळी पडून धडाधड मरत होते. यावेळी रमाबाई चांगली १८ वर्षांची तरुणी होती.