पंडिता रमाबाई सरस्वती : Page 25 of 31

त्यांना स्वस्थ बसू देई ना.

 पूर्वीचे दिवस आठव आणि धावण्याला धाव

 अशी त्यांची सारखी टोचणी चालू झाली. मागचा पुढचा काहीही विचार न करता, रमाबाई मध्य प्रांताकडे निघाल्या. त्यांच्या निश्चयाचा पुकारा होताच, काही मित्रांकडून त्यांना थोडथोडी पैशांची मदत येऊ लागली. मध्यप्रांताच्या कमिशनराने बाई, या सर्वभक्षी दुष्काळाच्या वणव्यात तुम्हाला काहीही करता येणार नाही. कशाला भलताच होड घेता ?” असं बजावले.

 भुसावळ टप्प्यावरचा चमत्कार

 आगगाडीने बाई जबलपुराकडे जात असताना, भुसावळला ऊतर, याच गाडीने पुढे जाऊ नकोस, असा त्यांना आतल्या आवाजाचा संदेश आला. त्याच गाडीने पुढे गेले तर पुढची गाडी चार तासाने उशीरा येणार आणि ठरल्या टप्प्यावर आडवेळी पोचणार, असा पेच पडला तरी बाई भुसावळला उतरल्या आणि धक्क्यावरच्या बाकावर पुस्तक वाचीत वेळ काढू लागल्या. असा वेळ काढणे फार कठीण असते. थोडे वाचावे, जरा इकडे तिकडे फिरावे, पुन्हा वाचावे, वाचण्याकडेही लक्ष लागत नाही, डोक्यात विचारांचे वादळ चालू.

 इतक्यात मुंबईहून नागपूर मेल आली. अवचित मिस हेलन रिचर्डसन ही रमाबाईंची एक हितचिंतक मैत्रीण त्यांच्याकडे धावतच आली. हल्लो रमाबाई, चटकन घ्या बरं हे असे म्हणून तिने बाईंच्या हातात एक नोटाचे पुडके दिले. मुंबईहून निघाल्यापासून, मी सारखी तुमची आठवण करीत होते. मनिऑर्डरच पाठवणार होते. पण इथेच भेटलात, बरे झाले. गुड बाय. असे म्हणून हेलनबाई चटकन गाडीत निघून गेल्या. तळमळीच्या कार्यकर्त्यांना साधनांची उणीव पडत नाही, हेच खरे.

 दुष्काळाचे भयानक चित्र

 त्या बापड्या अभागी प्राण्यांच्या अंगावर धड लकतरेही नव्हती. एकीकडे भुकेने त्यांचे जीव कासावीस होत होते, तर त्याच क्षणाला ते थंडीने कुडकुडतही होते. पुरुष-बायका, पोरे, म्हातार कोतारी, तरणीताठी झाडाखाली किंवा ओसाड भिंतींच्या आसऱ्याने एकमेकांशी अगदी चिकटून बसलेली. सगळीच काही एकदम मरत नसत. पण त्यांचे हाल पाहून, ही जिवंत रहाण्यापेक्षा चटकन मरतील तर बरे, असेच कोणाला वाटायचे. खरे दुर्दैव पुढेच आहे. नीच वृत्तीचे स्त्री-पुरुष, तरुण बायांच्या नि तरण्याताठ्या मुलींच्या पाळतीवर नेहमीच असतात. अन्नासाठी घरदार सोडून बाहेर पडलेल्या आणि दुष्काळी कामावर लागलेल्या असहाय बायांवर नि पोरींवर त्यांचा एक हलकट व्यापारच चालतो. या दुष्काळग्रस्तांची दीनवाणी दशा पाहून, बावीस वर्षांपूर्वीच्या आमच्या लाजीरवाण्या दशेचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. नशिब आमचे की त्या वेळी दुष्काळी छावणीत खडी फोडायला आमची रवानगी झाली नाही, असे रमाबाईंनी त्या दुष्काळाचे चित्र काढलेले आहे.

 आई बहिणीच्या काळजाने पहा

 देवावर भार टाकून रमाबाईंनी साठ निरश्रित विधवांची सुटका करून त्यांना थेट पुण्याला पाठवून दिले आणि या दौऱ्याच्या माहितीचा बॉम्बे गार्डीयन पत्रात एक लेख प्रसिद्धीला धाडला. त्यात त्या लिहितात - या वेळी तरुण बालविधवांविषयी माझे मन फारच कळवळले. त्यांना रिलीफ कॅम्पात किंवा दुष्काळी कामावर राहू देणे किंवा गल्लीकुच्चीतून अगर हमरस्त्यांवरून भटकू देणे म्हणजे त्यांचा पुरा सत्यानाशच होऊ देण्यासारखे आहे. दृष्ट टोळभैरवांच्या तावडीत त्यातल्या काही सापडलेल्या. काही जन्माच्या निकामी होऊन फत्तरी काळजाच्या धन्यांनी घराबाहेर हुसकावलेल्या, काहींना दुर्धर रोग जडून त्या मरणाच्या पंथाला लागलेल्या. काही इस्पितळातून परतताच पुन्हा पापाच्या खाईत म्हणजे मरणाच्या दारात उभ्या राहिलेल्या. काहींनी जनलज्जा मनलज्जा सोडून दिल्यामुळे माणुसकीला मुकलेल्या. असले अनेक प्रकार पाहताच

 नरक नरक म्हणतात तो हाच !

 असे मला वाटले. त्यांना अशा पोरक्या सोडून मरणी मेलेल्या त्यांच्या प्रिय आई-बापांचा विचार माझ्या मनात येऊन माझ्या आतड्यांना पीळ पडले. जिला म्हणून आईचे हृदय आहे, भगिनी प्रेम म्हणजे काय हे जिला कळते, अशी कोणती बाई अशा मुलींपैकी निदान थोड्याजणींकरता तरी आपल्याकडून काय अल्पस्वल्प करता येईल ते केल्याशिवाय राहील