पंडिता रमाबाई सरस्वती : Page 24 of 31

राष्ट्रीय अवहेलनांच्या मुळाशी आहेत, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही.

 ‘‘स्त्रियांच्या डोळ्यातून निष्कारण

 गळलेला एकच अश्रूबिंदू अटम बॉम्बपेक्षा

 भयंकर उत्पात करू शकतो.

 हा एक विचारवंत तत्वज्ञाचा इशारा लक्षात ठेवण्यासारखा आहे.

 जाईन जाईन, मी सदनातच जाईन

 सनातन्यांचा कलकलाट नि सदनाची भरभराट

 पंडिता रमाबाई नावाची एक राक्षसीण विधवांचा कैवार घेण्यासाठी पुढे सरसावली आहे, घरोघरच्या विधवांना आश्रमात ती नेत असते, त्यांना शिकवित असते, खायापियाला घालीत असते, हा ज्याच्या त्याच्या तोंडी, कुत्सित बुद्धीने का होईना, सारखा प्रवाद ऐकू येऊ लागल्यामुळे, ‘‘शारदा सदन हे जर आम्हाला माहेरघरची वागणूक देत असेल, तर मी तिथे अगत्य जाईनच जाईल, अशा निर्धाराने पुष्कळ गावोगावच्या विधवा आपणहून रात्रबेरात्र सदनाच्या दरवाजाशी येऊ लागल्या. फार काय, पण कित्येक सनातन्यांनीही आपल्या विधवा लेकी सुना गुपचूप आणून सदनात ठेवल्या. पन्नासावर विधवांनी सदन पुन्हा गजबजले. शिवाय, कोठे एकाद्या बाईचा अथवा बालविधवेचा छळ होत असल्याची बातमी बाईंना लागली तर त्या तात्काळ त्या ठिकाणी, मग ते कितीही दूर असो, हिंदुस्थानातल्या कोणत्याही प्रांतात असो, स्वतः जाऊन तिची मुक्तता करीत असतं. विरोधकांनी कायदेबाजीचा पाठिंबा घेऊन अनेक वेळा त्यांना पोलीसी कचाट्यात अडकवण्याच्या खटपटी केल्या. पण बेडर रमाबाई तेथेही त्यांना पुरून उरल्या.

 दानेदानेपर लिखा है खानेवाले का नाम

 सदनात विद्यार्थीनीची जसजशी संख्या वाढू लागली, तसतसा खर्चाचा प्रश्न रमाबाईंना भेडसावू लागला. अमेरिकेतून येणारी सालिना २०-२५ हजार रुपयांची मदत पुरेनाशी झाली. सदनाचे स्वतःचे काही तरी हुकमी उत्पन्न असले पाहिजे, या हेतूने त्यांनी पुण्यापासून ३४ मैलावरच्या केडगाव खेड्यात १०० एकर जमीन खरेदी करून तेथे शेतीवाडी-बागबगीचे तयार करून, त्या उत्पन्नावर सदनाच्या अन्नपाण्याचा प्रश्न सोडवण्याची खटपट करून ठेवली.

 ‘‘माझा हात म्हणजे पैसा चाळण्याची चाळण आहे ’’

 ‘‘पैसा आला की तो गेलाच. एका हाताने किती चेक जमा झाले ते पहायचे आणि दुसऱ्या हातातल्या लेखणीने ते तात्काळ वाटेला लावायचे. एवढेच माझे काम ’’, असे रमाबाई नेहमी म्हणत असतं. ‘‘शेकडो, हजारो, लाखो अनाथ, अपंग, विधवा भगिनींचा आत्मोद्धार व्हावा, त्या कामी माझे सारे आयुष्य एकरकमी झिजावे, ’’ ही त्यांची महत्त्वाकांक्षा आणि हातात असणारा तुटपुंजा पैसा, याचा झगडा अखंड चालायचा. ‘‘मी काय कोणाचे संगोपन किंवा उद्धार करणार ? कर्ता करविता देव समर्थ आहे. ज्याने तोंड दिले, तो भाकरीची सोय करतोच करतो. आपल्या खटपटी निमित्तमात्र. ’’ ही त्यांची श्रद्धा अभेद्य असे आणि कोठून ना कोठून लागेल तेवढा पैसा वेळच्या वेळी त्यांच्याकडे चालून येत असे.

 सन १८९५ साली पुण्यात प्लेगचा कहर उसळला. इतक्या मुली येऊन येथे राहणे धोक्याचे होते. म्हणून रमाबाईंनी केडगावात तंबू ठोकून सदनातल्या बऱ्याचश्या मुली तेथे नेल्या. केडगावला पाण्याचा नेहमी दुष्काळ. घेतलेली जमीनही खडकाळ. पण देवाचे नाव घेऊन रमाबाईंनी तेथे विहिरी खणण्यास सुरुवात केली. त्यांना मनमुराद पाणी लागले. बागायत शेत मळे खुलू-फुलू लागले.

 १८९६ चा भयंकर दुष्काळ

 इतक्यात मध्यप्रांत नि मध्य भारतात भयंकर दुष्काळ पडल्याच्या बातम्या फैलावल्या. रमाबाईंच्या हृदयात भूतदयेच्या कळवळ्याचे काहूर उसळले. आपणही उपासमारीचे हाल कदन्न खाऊन कसे काढले, तो सारा इतिहास त्यांच्या नजरेपुढे थयथयाट करू लागला. दुष्काळातल्या स्त्रिया, मुलींची सुटका, हा प्रश्न चुटकीसारखा सुटणारा नव्हे, अन्नान्न करून प्राण सोडणाऱ्या हजारो लोकांना ही एकटी बाई कशी काय मदत करणार ?

 कशाला भलतीच होड घेता बाई ?’

 जवळ नाही पैसा, नाही कसलीच साधन सामुग्री ! जिथे सरकार आणि मोठमोठे लक्षाधीश दाते हात टेकतात, तेथे रमाबाईसारख्याचा पाड तो काय ? पण त्यांच्या हृदयस्थ आत्मारामही