पंडिता रमाबाई सरस्वती : Page 23 of 31

एक विशेषच होता. हाती घेतलेल्या कार्याला चोहोकडून कट्टर विरोध चालू असतानाच, त्या कृष्णा तुंगेच्या उगमाजवळील आपल्या माता-पित्याने पुनित केलेल्या गंगामूळ आश्रमाच्या जागेला भेट द्यायला निघून गेल्या. तिचे दर्शन होताच, तो जुना इतिहास त्यांच्या डोळ्यापुढे साक्षात उभा राहिला. तत्वनिष्ठेसाठी आपल्या जन्मदात्यांनी अनंत हालअपेष्टा, कठोर लोकनिंदा सहन केली, पण त्यांची ध्येयावरील श्रद्धा लवमात्र चळली-ढळली नाही. मुलाही त्याच कठोर मार्गाने गेले पाहिजे, हा मूक संदेश घेऊन रमाबाई लहानमोठी गावे फिरत फिरत पुण्याला परत आल्या.

 ‘‘माणुसकीला मुकलेल्या किंवा मुकवलेल्या अनाथ-अबलांनी निःशंकपणे मजकडे यावे, मी त्यांचे जीणे सुखाचे करीन, ’’ असा जाहीर पुकारा करीत, रमाबाई गावोगावी व्याख्याने, प्रवचने देत फिरल्या. त्याचा परिणाम होऊन, नातेवाईकांनी क्रूरपणाने वागवलेल्या पुष्कळ विधवा त्यांच्याबरोबर पुण्यास आल्या. एका विधवेची कहाणी ऐका. छपराच्या वाशाला टांगून तिला घोडी देण्यात आली होती. खाली उडी टाकून तिने आपली सुटका करून घेऊ नये, म्हणून खाली जमिनींवर काटेरी फांद्या नि रखरखते निखारे पसरून ठेवलेले होते. या अभागिनीची सुटका रमाबाईंनी मोठ्या हिकमतीने केली. तिच्या सासूने नि एका नातेवाईकाला आधी आमची शाळा तर पहायला चला, मग काय ते ठरवा. असे पटवून, त्य विधवेसह त्यांना पुण्याला आणले. काही आठवड्यानंतर त्या तरुणीचा आपल्यावर विश्वास बसला असे पाहून आणि तेथे मी खुशाल एकटी राहीन, असे तिचे वचन घेतल्यावर, रमाबाईंनी त्या सासूला नि नातेवाईकाला घरी परत जायला सांगितले. ‘‘तुमची सून वयात आलेली आहे. तेव्हा तिच्या मनाविरुद्ध तुम्हाला कायद्याने काहीही बळजोरी करता येणार नाही असे बजावून, त्या लटांबराला हुसकावून दिले. ही तरुणी रमाबाईंच्या कार्यात पुढे मोठी कार्यकर्ती म्हणून उपयोगी पडली.

 दुसरी एक कहाणी अशीच संतापजनक आहे. चाळीस वर्षांनी मोठ्या असलेल्या पुरुषाशी एका पाच वर्षे वयाच्या मुलीचा विवाह झाला होता. सहाव्या वर्षीच नवरा मेला नि ती विधवा झाली. तिचा दीर होता खाणावळवाला. त्याने तिला अर्धा मैल दूर असलेल्या विहिरीचे पाणी काढून आणायच्या कामाला जुंपले. कडकडीत उन्हात पाय पोळताहेत आणि डोक्यावर पाण्याने भरलेला मोठा हंडा, कडेवर एक घागर आणि हातात एक बालदी अशा पाणी भरण्याच्या खेप तिला सारख्या कराव्या लागत. जरा कुठे थोडा वेळ थांबली, उशीर झाला का तो नराधम तिला मारझोड करायचा. उपाशी ठेवायचा. रमाबाईंनी तिला पाहिले तेव्हा ती अकरा वर्षांची होती. त्यांनी तिला उपदेश केला. संरक्षणाची हमी दिली. तिचा आपल्यावर विश्वास बसल्याचे पाहून, तिला मुसलमान मुलाचा वेष देऊन (कारण नवरा मरताच तिचे केशवपन झालेले होतेच.) पुण्यास आणली. सदनात आल्यावर ती मुलगी चांगली शिकली, गुणवान निपजली, एका ख्रिश्चन तरुणाशी रमाबाईंनी तिचा विवाह करून संसारात बसवली.

 महाराष्ट्राच्या समाज नैतिक जीवनात जिच्या पुनरुज्जीवनाने एक उज्ज्वल इतिहासाचे पान लिहिले गेले, अशा एका ब्राह्मण विद्यार्थीनीची कहाणी सांगतो. ही विकेशा बालविधवाच होती. तिचा व्हायचा तो छळवादही झालेला होता. शारदा सदनात चार वर्षे ती आपला हिंदू धर्माचा आचार सांभाळून शिकत राहत होती. रमाबाईंनी तिचा एक पदवीधर सच्छील ब्राह्मण विधुराशी पुनर्विवाह लाऊन दिला. पुण्यात या पुनर्विवाहात जोडप्याचा समाजाकडून मनस्वी छळ झाला, हे सांगायला नकोच. अनेक नामवंत शीलवंत विद्वान पुत्रांची माता आणि शेकडो हिंदू विधवांची उद्धारक म्हणून ती महिला आज घडीलाही आपल्या आंतरराष्ट्रीय लौकिकाच्या पतिराजासह महिलोद्धाराचे कार्य अखंड करीत आहे. ओळखलीत का कोण ती ? महर्षी धोंडोपंत कर्वे यांच्या पत्नी सौ. आनंदीबाई कर्वे.

 रमाबाईंच्या चरित्रातल्या विधवोद्धाराच्या अशा किती तरी रोमहर्षक कथा सांगता येतील. हिंदुस्थान सोडून द्या, एकट्या महाराष्ट्रापुरतेच बोलायचे तर आमच्या तत्कालीन पूर्वजांनी समाजधर्माच्या किंवा धर्मशास्त्राच्या मुर्वतीसाठी बाल किंवा तरुण विधवांच्या केलेल्या राक्षसी छळांचे परिणाम आणि त्या हजारो असहाय निष्पाप जीवांचे तळतळाटाचे शापच आमच्या आजच्या अनेक