पंडिता रमाबाई सरस्वती : Page 22 of 31

असलीच पाहिजे. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्याबद्दल कोणाला काही आग्रह करण्यात येणार नाही, तसे शिक्षणही देण्यात येणार नाही, अशी जाहीर हमी रमाबाईंनी घेतलीच होती.

 रोज त्रिकाळ रमाबाई आपल्या ९-१० वर्षांच्या मनोरमा कन्येला बरोबर घेऊन एका स्वतंत्र खोलीत प्रार्थना नि बायबल वाचन श्रद्धेने करीत असत. आधीच त्यांनी सर्व मुलींच्या हृदयात मातृवत् आदराचे स्थान मिळवले होतेच. ही आपली आई रोज भक्तीच्या उमाळ्याने देवाची कशी प्रार्थना करते, इकडे मुलींचे लक्ष गेल्याशिवाय राहणारच कसे ? प्रथम प्रथम दरवाजाआडून त्या तो प्रार्थनेचा सोहळा नि प्रार्थना गीतांचे गायन पहात-ऐकत. दरवाजा उघडाच असे. नंतर मुली थोडथोड्या जवळ जाऊन उभ्या राहू लागल्या. पुढे बसू लागल्या. गीतेही गाऊ लागल्या. येशूच्या प्रार्थनेत तल्लीनही होऊ लागल्या. रमाबाईंचा तो स्वच्छ पांढरा पोषाख, त्यांचे ते गोड गळ्याचे प्रार्थना-संगीत, भक्तिभावाने पाणाळलेले त्यांचे ते डोळे आणि देवाला आळविण्यासाठी एकतानतेने त्यांनी मारलेल्या हाका, यांचा त्या मुलींवर काही परिणाम झाला नसता तरच ते मोठे आश्चर्य होते.

 श्रद्धेचा प्रश्न फार गूढ आहे. कोणाची कशावर श्रद्धा बसेल, त्याचा नेम नसतो. अग्निदेवाचा उपासना करणारे कितीतरी पाराशी हिंदू देवांची नि संतांची उपासना करणारे आहेत. शेकडो हिंदू मुसलमान पिरांना नवस करतात आणि मुस्लिम संतांचे एकनिष्ठ भक्त बनतात. पोर्तुगीज अंमलात अत्याचाराने बाटवलेले कित्येक ख्रिस्ती समाज आजही स्थानिक पालक फादरांची मुर्बत राखण्यासाठी, बाबतीस (बाप्तिस्मा), लगीन आणि मरतिक हे तीन विधी ख्रिश्चन विधीने करून, शिवाय मूळ घराण्यातले हिंदू कुळधर्म खुशाल उघडपणे करतातच.

 सुना-मुलींना झोडपीत घरी नेल्या

 झाले. काही दिवसांनी कित्येक मुलींनी आम्हाला ख्रिस्ती धर्माचा बाप्तिस्मा द्या अशी रमाबाईंकडे मागणी केली. ही बातमी बाहेर फुटताच, सनातन्यांच्या छावण्यात एकच हल्लकल्लोळ उडाला. रानडे, भांडारकर, तेलंग, चंदावरकरांसारखे सुधारकही घाबरले. रमाबाईंनी आपले वचन मोडले, असा सनातनी ओरडा करू लागले. महाराष्ट्रातील सगळी हिंदुधर्माभिमानी आणि सनातनी वर्तमानपत्रे रमाबाईंवर जळजळीत आग ओकू लागली. घरोघर, दारोदार चव्हाट्यावर हा एकच विषय जो तो आपल्या परीने वादविवादू लागला. पुणे शहरातल्या अनेक लोकांनी आपापल्या सुना-मुली सदनातून शेपाटून घरी नेल्या. जाताना त्या सारखा टाहो फोडीत. कित्येकींना तर त्यांच्या पालकांनी लाजलज्जा गुंडाळून ढोरासारख्या बडवीत ओढीत नेल्या. ६०-७० मुलींपैकी अवघ्या १५ मुली काय त्या सदनात राहिल्या. ज्यांना बळजोरीने घरी नेण्यात आले, त्यापैकी पुष्कळ थोड्याच दिवसांनी आपणहून सदनात परत आल्या आणि आम्ही वयात आलेल्या (मेजर) आहोत, आमचे सुख-दुःख आम्हाला कळते, अशा मॅजिस्ट्रेटपुढे जबान्या देऊन सदनात राहिल्या. पुणे शहरात रमाबाईंच्या निंदा टवाळीने भयंकर उग्र रूप धारण केले. घाणेरड्या शिव्यागाळीनी भरलेल्या पत्रांचे तर रोज ढीगच येऊ लागले.

 रमाबाईंच्या ठिकाणी दुसरी कोणी बाई असती तर त्या विरोधाला तोंड देता देता वेडी झाली असती किंवा सदनाचा उद्योग गुंडाळून स्वस्थ बसली असती. पण धन्य त्या पंडिता सरस्वतीची ! तिचा आपल्या कार्यावरचा विश्वास दुर्दम्य होता. इश्वरी प्रसादावर तिची अढळ श्रद्धा होती. हिंदू समाजातील अनाथ अबलांचा आणि विधवांचा कौटुंबिक, धार्मिक नि सामाजिक छळवाद समूळ नष्ट झालाच पाहिजे आणि तो मीच करणार, परमेश्वरच माझ्या हातून हे कठीण काम करवणार, हा त्यांचा आत्मविश्वास क्षणोक्षणी उफाळत होता. खवळलेल्या लोकमताला भिऊन, रानडे, तेलंग प्रभृति सन्मान्य सहायकांनी शारदा सदनाच्या व्यवस्थापक मंडळाचे राजीनामे दिले. ‘‘काही हरकत नाही. सगळा हिंदू समाजच काय, पण सगळा हिंदुस्थान देश, सगळे जग माझ्या विरोधाला उभे राहिले तरीही अबलोद्धाराचे निश्चित कार्य मी तडीला नेणार, ’’ इतक्या कडव्या निर्धाराने रमाबाई, आजूबाजूला गडद माजलेल्या लोकक्षोभाच्या अंधारातून, भविष्याच्या किरणांकडे टक लावून बसल्या.

 प्रकरण ८ वे

 तोडिला तरु फुटे आणखी भराने

 हव्या त्या परिस्थितीत चित्ताची एकाग्रता भक्कम ठेवणे हा पंडिता रमाबाईंच्या स्वभावधर्मातला