पंडिता रमाबाई सरस्वती : Page 15 of 31

व्याख्यान देऊन तेथल्या श्रोतृगणांस रमाबाईंच्या अपूर्व माहितींने चकित केले. त्या काळी हिंदुस्थानात एवढी सुशिक्षित, धीट नि पोक्त विचारांची कोणी स्त्री असेल असे विलायतेच्या लोकांच्या स्वप्नीही नव्हते. रमाबाईंची साक्ष महाराणी व्हिक्टोरियांच्या वाचनात आली. पुढे त्यांच्याच खास सूचनेवरून लेडी डफरिन पंड, स्त्री डॉक्टरणी आणि हिंदी स्त्रियांसाठी खास इस्पितळांची योजना करण्यात आली.

विलायतेला गेलेच पाहिजे

पंचखंड दुनियेच्या विविध क्षेत्रातील शास्त्रीय ज्ञानाचा महासागर इंग्रजी भाषेत अपरंपार भरलेला आहे, याची रमाबाईंना प्रचिती आल्यामुळे आणि तेवढे शिक्षण हिंदुस्थानात मिळणे कठीण असल्यामुळे, आपण विलायतेला गेलेच पाहिजे, असा त्यांनी निर्धार केला. आर्य महिला समाजासाठी इलाखाभर काढलेल्या त्यांच्या दौऱ्यात, कौतुक, उत्तेजनापेक्षा विरोध आणि निंदेलाच त्यांना विशेष ठकरा द्याव्या लागल्या. हिंदु समाजाची मनोवृत्ती म्हणजे कठिण फत्तराची एक विशाल तटबंदीच असल्याचा त्यांना अनुभव आला. सुधारक म्हणविणाऱ्या मंडळींतही लेचेपेचेपणा फार. समाजाला न दुखावता साधेल तेवढे साधून घेण्याची त्यांची धोरणे, ठोसर, भरीव नि परिणामकारक सुधारणा घडवून आणायची तर कार्याची कदरही तितकीच कट्टर असली पाहिजे. तसले वातावरण निर्माण करण्यासाठी पाश्चात्य देशातल्या समाजसुधारक चळवळीचे निरीक्षण करावे, तेथल्या अनेक शास्त्रांचा स्वाध्याय करावा, तिकडील धर्मक्रांतीकारकांची चरित्रे अभ्यासावी, एवढ्यासाठी विलायतेला जाण्याचा पंडिताबाई बेत करू लागल्या.

ख्रिस्ती मिशनऱ्यांची सहानुभूती

बंगाल आसामकडे असतानाच धर्माच्या बाबतीत पंडिता साशंकवादी (अग्नॉस्टिक) बनल्या असल्या तरी त्यांची ईश्वरावरील श्रद्धा अटळ होती. तिकडे असतानाच बायबलचा त्यांनी वरवर अभ्यास केला होता. पुण्यास आल्यावर तेथल्या थोरथोर हिंदी मिशनरी पंडितांच्या सहवासाने येशू ख्रिस्ताच्या भूतदयाळू चरित्राचे त्यांना आकर्षण वाटू लागले. पूर्वी व्याख्यान प्रवचनात त्या भगवद्गीतेतील वचने आधाराला घेत असत. पण मागाहून त्या बायबलातील ख्रिस्त-वचनांचाही भरपूर उपयोग करू लागगल्या होत्या. सुभाषित सद्वचन, सत्यार्थ कोणाचा नि कोठला का असेना तो विश्वासाने पत्करण्यात कसले पाप ? सत्य ते सत्यच धर्माच्या सोवळ्या संकुचितपणाची कुंपणे त्याला कशाला हवीत ? असा त्यांचा वाजवी दावा असे.

स्मृती पुराणोक्त हिंदु धर्मावरील विश्वास उडालेले शेकडो सुधारक बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही होतेच. प्रत्येक नव्या कल्पनेचा हिरिरीने पुरस्कार करण्यात पुढे पाऊल टाकण्याची शहामत असणाऱ्या शेकडो चित्पावन मंडळींनी यापूर्वीच ख्रिस्ती धर्मात प्रवेश केलेला होता. एवढे साहन ज्यांना जमले नाही, ते तुकारामादिकांच्या भागवत धर्माच्या सावली सावलीने जातपात-तोडक अशा प्रार्थना समाजाने आणि परमहंस सभेच्या गुप्त चळवळींने, नवा हिंदूधर्म प्रचारात आणू पहात होते. म्हणजे रमाबाईंच्या धर्मविषयक मानसिक खळबळीच्या हंगामातच महाराष्ट्रात स्मृती पुराणोक्त वैदिक धर्माविरुद्ध उघड बंड चालू झालेले होते. ज्ञानेश्वर ज्याच्या पाया आणि तुका ज्याचा कळस असा

सर्वोभूतीं प्रेम । वैष्णवांचा धर्म ।

 भेदाभेद भ्रम । अमंगळ ।।

असा जोरदार पुकारा करणारा भागवत धर्म पंढरपूरच्या माहात्म्याने महाराष्ट्रभर शेकडो वर्ष गर्जतच असताना, त्याच तत्त्वावरच्या ख्रिस्ती धर्माकडे विचारवंत ब्राह्मणांचा ओघ का खेचला जावा, याचे कित्येकांना आश्चर्य वाटण्यासारखे आहे. त्याचे समाधान थोडक्यात असे.. भागवत धर्म म्हणजे मागासलेल्या ब्राह्मणेत्तर लंगोट्या नि घोंगडीवाल्या समाजाचा धर्म. ब्राह्मणांची कर्मे तेवढी वेदोक्त. बाकीच्यांची फक्त पुरणोक्त. या कट्टर समजतुतीप्रमाणेच भागवत धर्मपंथाला ब्राह्मणांनी अजिबात वाळीत टाकलेला होता. रमाबाईंनाही याच कारणामुळे त्याचा परिचय करून घेता आला नाही, तर त्यात नवल कशाचे ?

शिवाय मनाला केवळ तात्विक शांती देणारा आणि माणुसकीची नुसती महान तत्त्वे सांगणारा धर्म रमाबाईंच्या चिकित्सक प्रकृतीचे समाधान करू शकतच नव्हता. तशात, मूर्तीपूजेवरचा नि कर्मकांडावरचा त्यांचा विश्वास साफ नाहीसाच झालेला होता. नेमक्या अशा मनःस्थितीत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांना येशूच्या पंथाचा चांगुलपणा शिकवला. येशूने प्रवचित केलेली भूतदयेची सर्व कृत्ये मिशनरी संस्था प्रत्यक्ष कशा आचरणात आणीत आहेत, याचे दाखले दाखवून, त्या धर्माकडे त्यांची प्रवृत्ती वळवण्याचे बरेचसे काम पुण्यातच साधून घेतले होते. या कामी रेवरंड नीळकंठ उर्फ निमाया गोरे या संस्कृत ख्रिस्ती पंडिताने बरीच मेहनत घेतली. रमाबाईंच्या विलायत जाण्याचा