पंडिता रमाबाई सरस्वती : Page 14 of 31

म्हणतात, हे पुरुषांविरुद्ध बंड आहे. भयंकर पाप आहे . पुरुषांचा स्त्रियांविषयी असलेला दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांची खरमरीत कानउघडणी केली नाही आणि स्वतःच्या सर्वांगिण उद्धाराची धडपड केली नाही, तर माझ्या मताने तेच मोठे पाप ठरत आहे हा पंडितेच्या जाहीर व्याख्यानाचा मतितार्थ असे.

एका अभागी बालविधवेचे प्रथम दर्शन

 पंडिता स्वतः विधवा असल्या तरी महाराष्ट्रात बालविधवांचा किती निष्ठूर छळ समाज करीत असे, याची त्यांना स्पष्ट कल्पना नव्हती. पुण्यात व्याख्यानाचा कार्यक्रम चालू असतानाच एक दिवस कोणीतरी एका अल्पवयी ब्राह्मण बालविधवेला घेऊन बाईंकडे आला. ती रंगाने काळीकुट्ट, चकणे डोळे, अगदीच कुरूप अशी होती. पाच वर्षांची असतानाच तिचे लग्न लावण्यात आले होते. लग्नानंतर थोड्याच दिवसांनी तिचा नवरा मेला. तिची सासू-सासरा तिचे तोंड पहायला राजी नव्हते. चांडाळणीनं माझा मुलगा खाल्ला. राक्षसीन आहे ही   असा सासूचा सारखा आक्रोश चालायचा. रमाबाई म्हणतात - मी त्या गरीब बापड्या अभागी पोरीकडे पाहताच, अशा परिस्थितीतल्या बायांसाठी काहीतरी मी करावे, या स्फूर्तीचा अंकूर माझ्या मनात रुजला गेला. हिंदु विधवांसाठी एक आश्रम काढण्याची कल्पना मी लोकांपुढे मांडू लागली. सहा महिने खूप धडपड केली, पण कोणाच्याही हृदयाला द्रव येईना. नंतर वाटले, आधी मीच वैद्यकीय शिक्षण घ्यावे आणि मग या अनाथ विधवांच्या तारणाच्या प्रश्नाला हात घालावा. याच वेळी विलायतेला जाण्याचे विचार माझ्या मनात घोळू लागले. विलायतेला निघेपर्यंत त्या बालविधवेचे पालन-पोषण बाईंनीच केले.

हंटर कमिशनपुढे पंडितेची साक्ष

 सन १८८३ साली लॉर्ड रिपन व्हाइसरॉयच्या आमदनीत, सर विल्यम हंटरच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाख्यातील शिक्षणविषयक प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी नेमलेले एक कमिशन पुण्यास आले. प्रमुख ब्राह्मण स्त्रिया आणि आर्य महिला समाजाच्या सभासदांच्या एकमुखी शिफारशीने पंडिता रमाबाईंची कमिशनपुढे साक्ष झाली. कमिशनपुढे तुम्ही कोणत्या आधाराने साक्ष देता ?” असे हंटरसाहेबांने विचारताच रमाबाई म्हणाल्या - स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केल्याबद्दल हिंदु समाजाकडून ज्यांचा अतिशय छळ झाला, लोकांनी ज्यांच्या मार्गात अनेक अडचणी उत्पन्न केल्या आणि ज्यांच्यावर अखेर बहिष्कारही घातला, अशा एका दशग्रंथी पढिक ब्राह्मण पंडिताची मी कन्या असून, स्त्रियांचा दर्जा वाढवण्यासाठी आजन्म, अखंड कार्य करीत रहावे, असा मी निश्चय केला आहे.

यावेळी बाईंना इंग्रजी फारसे येत नव्हते. पुण्याच्या फीमेल ट्रेनिंग कॉलेजला प्रिंसिपलबाई मिस हरफर्ड जवळ त्या नुकत्याच शिक्षण घेत होत्या. सगळी साक्ष मऱ्हाठीतच झाली. मुलींच्या शाळा, हायस्कूले अधिकाधिक उघडली पाहिजेत, तेथे ट्रेन शिक्षिका असाव्या, इन्स्पेक्टर्स बायाच असाव्या. याशिवाय हिंदी स्त्रियांची मोठ्यातली मोठी अडचण म्हणजे हुशार शिकलेल्या स्त्री डॉक्टरणींचा तुटवडा ही होय. पुष्कळ प्रकारच्या स्त्री रोगात आणि विशेष करून प्रसूतीच्या समयी पुरुषांस आपली स्थिती कळविण्याला आमच्या लज्जावति हिंदू स्त्रियांस फार संकोच वाटतो. पुष्कळ प्रसंगी प्राण गेला तरी त्या पुरुष वैद्यांना आपली स्थिती कळविणार नाहीत. अशा अवस्थेत स्त्रीवैद्यांच्या डॉक्टरी शिक्षणाची तरतूद सरकारने तात्काळ करणे जरूरीचे आहे. या देशातले शेकडा ९९ लोक स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध आहेत. स्त्रियांना समाजात काही महत्त्वाचा दर्जा आहे, हे त्यांना मान्यच नाही. बायकांत तिळाएवढा जरी दोष त्यांना दिसला तरी ते त्या राईचा पर्वत करून तिच्या शीलाला कलंक लावतात. गरीब बिचाऱ्या बायका धीट नसतात. त्यांना कशाचे काही ज्ञान अथवा माहितीही नसते. एखादे प्रकरण कोर्ट कचेरीपर्यंत गेलेच, तर बोलक्या पुरुषांचा शब्द खरा मानला जातो आणि बाईंचे कोणीच काही ऐकत नाही... येथल्या बायकांत कसली हिंमत नाही, कशाचा उत्साह नाही, काही नाही. जिकडे पहावे तिकडे नकार घंटा !” इत्यादी मुद्यांवर सडेतोड दिलेली रमाबाईंची साक्ष पाहून सर विल्यम हंटरसाहेबांना मोठे कौतुक वाटले. विलायतेस परत गेल्यावर साहेबांनी त्या साक्षीचे इंग्रजी भाषांतर करवून ते प्रसिद्ध केले आणि एडिबरो येथे त्या साक्षीततल्या मुद्यावर एक जाहीर