पंडिता रमाबाई सरस्वती : Page 13 of 31

पंडिताबाई सन १८८२ साली पुण्यात आल्या.

पुण्याचे वातावरण खळबळले

चार वर्षांपूर्वी पुणेकरांनी पंडितेचे नुसते नावच ऐकले होते. आता त्यांच्या बुद्धीचे तेज, त्यांची अमोघ वक्तृत्वशक्ती, अष्टपैलू विद्वत्ता, त्यांचे तारुण्य, वैधव्य आणि अंगात पुऱ्या बाह्याचे पोलके आणि आपादमस्तक पांघरलेले ते पांढरे शुभ्र पातळ, या सर्व गोष्टींचा निरनिराळ्या दोन प्रकारांनी लोकांच्या मनावर परिणाम झाला. त्यावेळी पुण्यात दोन परस्परविरुद्ध विचारांचे समाजात तट होते. बाळ गंगाधर टिळकांच्या पुढारपणाखालचा पुराणोक्त फलप्राप्तर्थम् चा जुना मतवादी कंपू आणि दुसरा रावसाहेब रानडे लोकहितवादी वगैरेंच्या नेतृत्वाखालचा चिकित्सक सुधारकांचा कंपू. बाईच्या कर्तृत्वावर भावी समाजसेवेच्या धडाडीवर सुधारकांची दृष्टी होती, तर टिळक कंपूला वाटे की बाई दिसते चांगली, पण पुढे निघेल कशी कोण जाणे. उपनिषदांतील प्रज्ञावंत, ज्ञानवंत महिलांचे प्रतिक रानड्यांना रमाबाईत दिसे, तर पुराणमतवादी भिक्षुकशाही कंपूला ती अनृतं साहसं माया अशी दिसे.

पंडिताबाईंची पुणे शहरात  जागोजाग पुराणे, व्याख्याने होऊ लागली. पहिले पुराण रावसाहेब रानड्यांच्या बिऱ्हाडी झाले. हजारो स्त्री पुरुषांच्या सभांत धीटपणाने तासतास व्याख्याने देणारी, प्रेक्षकांवर नि श्रोत्यांवर विलक्षण छाप बसवून, हजरजबाबी चातुर्याने शंकितांच्या शंकांचा फडशा पाडणारी एक चित्पावन तरुण विधवा, म्हणजे पुण्यातला तो एक अपूर्व चमत्कारच होता. शेकडो ब्राह्मण स्त्रिया बाईंच्या प्रवचनाना गर्दी करून जमत. स्त्रियांनी साक्षर नि सुविद्य व्हावे, स्वतंत्र विचार करू लागावे, पुरुषांच्या बरोबरीने हर एक क्षेत्रात पुढे सरसावे, हे व्याख्यानातले मुद्दे म्हणजे पुष्कळ स्त्रियांना नवऱ्याविरुद्ध बंड करण्याची बायकांना चिथावणी असे वाटले. पंडितांच्या महिलोद्वारक स्पष्ट विचारांच्या मुद्यांविषयी पुष्कळ पुणेकरांना शंका कुशंका येत. पण तिची प्रत्यक्ष गाठ घेऊन वाद किंवा निषेध करण्याची मात्र कोणालाही छाती झाली नाही. मात्र, रिकाम टेकड्यांच्या पुणे प्रसिद्ध अड्ड्यांवर आणि बायकांच्या तोंडातोंडी रमाबाईंविषयी भलभलत्या कंड्या पिकवण्याचा बाजार खूपच माजला.

 वाटवावाटवी करायला आलीय मेली

यावेळी रमाबाईंचे धर्मांतरही झालेले नव्हते. त्यांनी बामणेतर गृहस्थांबरोबर विवाह केला होता इतकेच. तरीसुद्धा पुणेकर स्त्री-पुरुषांत त्यांच्याबद्दल कसकसल्या विचारांचे वारे वाहत होते. त्याचा एक नमुना पहा.

...ही बया जातिबाह्य ! बाटगी ! आमच्या घरात तिचा विटाळ कशाला ? सुधारकांनी वाटल्यास तिला मिठ्या माराव्या. पण तिचा सावळागोंधळ या घरात चालणार नाही. काय मेली, बापाने चांगले द्वारकेच्या श्रीकृष्णाशी लगीन लावून दिले, तरीसुद्धा तिने बंगाली बाबूशी लगीन लावून देह बाटवला. बरे, संसार तरी केला का ? तेही नाही. सगळे निरदाळण करून आता आलीय इकडे जगाची वाटवावाटवी करायला खुद्द रावसाहेब रानड्यांच्या घरांतली वडीलधाऱ्या स्त्रियांची ही मते, तर पुण्याचा भांग्या मारुतीचा कुटाळांचा अड्डा कसकसल्या कुटाळक्यांचे पेव घरोघर पचरवात असेल, याची कल्पना येते.

आर्य महिला समाज

रमाबाईंच्या आगमनापूर्वी पुण्यातील सुधारकांच्या काही स्त्रिया आठवड्यातून एकदा कोठेतरी जमून स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करीत असत. रमाबाई आल्यावर, रानडे, भांडारकर, मोडक, केळकर इत्यादी प्रार्थना समाजीय मंडळींनी त्यांना उत्तेजन देऊन, आर्यमहिला समाज नावाची एक संस्था चालू केली. तिच्या मार्फत रमाबाईंची व्याख्याने, चर्चा, प्रवचने चालू झाली. यासमाजाचे मुख्य हेतू – १) बालविवाहादी अनिष्ट चालींपासून स्त्रियांची सुटका आणि २) जुन्या परंपरेने आलेल्या धर्म व नीति यांच्या कल्पनांत नि भावनांत कालोचित बदल करणे, असे होते.

दर शनिवारी समाजातल्या पंडितेच्या प्रवचनांना शेकडो स्त्री-पुरुषांची गर्दी जमू लागली. बाईंची वाणी अस्खलित, मधुर आणि प्रवाही. विषय प्रतिपादनाची शैली खटकेबाज आणि आकर्षक यामुळे जुन्या-नव्या मतांच्या मंडळींवर त्यांच्या स्त्री विषयक नवीन मतांची छाप तेव्हाच पडत असे. थोड्याच दिवसात आर्य महिला समाजाची एक शाखा मुंबईला काढून पंडिताबाईंनी मुंबई इलाखभर प्रवचनांचा दौरा काढला. पुरुष आम्ही स्त्रियांना आपली मालमत्ता समजतात. धर्मशास्त्राच्या दंडकांकडे पाहिले तर स्त्रियांना स्वतंत्र असे कसलेच अस्तित्व नाही. या गुलामगिरीतून त्यांची सुटका व्हावी म्हणून आमची सारी धडपड. लोक