पंडिता रमाबाई सरस्वती : Page 12 of 31

अनेक वजनदार गृहस्थांच्या शिफारशीवरून त्यांनी सुपरिचित अशा महाशय बाबू बिपिन बिहारी दास मेधावी यांच्याशी  कलकत्त्यानजिक बेकिमपूर येथे नोंदणी पद्धतीने विवाह केला. (ऑक्टोबर १८८०) त्यांचा किवा माझा हिंदु धर्मावर अगर ख्रिस्ती धर्मावर मुळीच विश्वास नव्हता, म्हणून आमचे लग्न सिव्हिल मॅरेज कायद्याप्रमाणे झाले, असे रमाबाई सांगतात.

 धर्माविषयी मनाची कालवाकालव

 हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे कडकडीत नेम, आचार, आहार संभाळूनही मनाचा शांती लाभली नाही, माणुसकीचाही कोठे ओलावा आढळला नाही. हिंदु समाजात स्त्रियांचा दर्जा आणि मानसिक अवनति शूद्रातिशूद्र, अस्पृश्यां इतकीच खालावलेली, वेद-स्मृती-पुराण-प्रमाणित हिंदू धर्म व्यवस्थेत त्यांच्या उद्धाराला अवकाश नाही, सोयच नाही. याचा पुरेपुर अनुभव आल्यामुळेच, रमाबाई या वेळी साशंकवादी बनल्या. जात्या त्यांचा पिंड कट्टर धार्मिकच होता आणि अखेरपर्यंत तो धार्मिकच राहिला. पण माणसाच्या आत्मोन्नतीला चालू हिंदु धर्म निरुपयोगी, एवढा सिद्धांत मनोमन पटल्यामुळे माणुसकीचा मार्ग दाखवणारा निराळा एकादा धर्मपंथ शोधण्याकडे त्यांच्या मनाचा कल धावा घेऊ लागला होता. त्यांनी वेद, उपनिषदे, वेदांग, स्मृत्यादी सर्व ग्रंथांचा कस्सून स्वाध्याय केला. पण कोठेच त्यांना समाधान लाभले नाही. आत्मवृत्तात त्या म्हणतात - कोणत्या तरी धर्माची मला मोठीच आवश्यकता वाटू लागली. हिंदू धर्मात तर माझ्या जीवाला कोणतीच आशा दिसली नाही. ब्रम्होपंथात तर नक्की असे काहीच आढळे ना. सर्वच मोघम आणि सर्व धर्मातील चांगले दिसले तेवढे वेचून घेऊन त्यांची खिचडी बनवलेली. त्यामुळे माझ्या मनाचे समाधान होईना.

महाराष्ट्रात भयंकर खळबळ उडाली

 रमाबाईंने चांगल्या चांगल्या ब्राह्मण तरुणांना डावलून अखेर एका आसामी शूद्राशी विवाह केल्याची बातमी महाराष्ट्रात येताच, जो तो नाके मुरडू लागला. छे छे छे, बायका म्हणजे अनृतं साहसं माया असे शास्त्रकार सागत आले ते काय खोटे ? तशात ही बया शिकलेली ! बायकांना शिकवा म्हणतात ना हे सुधारक ? घ्या म्हणावे शिक्षणाची ही फळे ! कलियुग, कलियुग बरं का हे ! असाच भ्रष्टाचार चालायचा. असा भटाभिक्षुकांत आणि धर्माभिमानी गृहस्थांत एकच आरडा ओरडा चालू झाला.

रमाबाईंचा हा वैवाहिक संस्कार दुर्दैवाने औट घटकेचा बुडबुडाच ठरला. अवघ्या एकोणीस महिन्यात तो आटोपला. ता. १६ एप्रिल १८८२ रोजी त्यांनी आपल्या मनोरमा कन्येला जन्म दिला आणि पुढे एकच महिन्याने बाबू मेधावी एकाकी पटकीच्या आजाराला बळी पडले. ब्राह्मणांच्या मुलीने शूद्राशी विवाह केल्याबद्दल देवाने छान प्रायाश्चित दिले, अशा निष्ठूर वल्गनांचे धर्माभिमान्यांच्या छावण्यात भरपूर पीक आले.

प्रकरण ५ वे

 पंडितेचे महाराष्ट्रात आगमन

 पती निधनानंतर रमाबाईंच्या चरित्र्याचे दुसरे क्रांतीकारक मन्वंतर चालू झाले. यावेळी कर्नाटक, महाराष्ट्र नि आसाम येथील नात्यागोत्यांची बहुतेक माणसे एकामागून एक दिवंगत झालेली. जिवाला विरंगुळा नि आधार काय तो चिमुकल्या मनोरमा मुलीचा. केवळ कोठेतरी निष्क्रीय नि निराशावादी आयुष्य कंठण्यासारखा त्यांचा पिंड बेहिमती नव्हताच. वनवासातच जिचे बालपण नि तारुण्य गेले, वनवासानेच जीला शौर्य, धैर्यादी गुणांचा कस लावून कर्तबगार बनवले आणि मातापित्याच्या अखंड धार्मिक शिकवणीने जिची नैतिक पातळी उंचावून ईश्वरावरचा भाव अचळ अढळ बनला होता, तो पंडिता कोणत्याही प्रसंगाने डगमगणारी थोडीच होती ? जातिवंतांना संकटेच चैतन्याचे तेज चढवतात. संकटांच्या कडेलोटानेच त्यांचे आत्मतेज उफाळून उठते. कठोर परिस्थितीच्या कर्कश घासणीतूनच त्यांच्या कर्तबगारीच्या ठिणग्या सणासण चमकत उफलतात.

बाई, मायभूमीला परत या

इंग्रजी भाषेने हिंदी आचार विचारांत केलेली अपूर्व क्रांति आणि भारताबाहेरच्या प्रबुद्ध जगाशी जोडलेला संबंध रमाबाईंनी बंगाल, आसाम प्रांतात पाहिलेला असल्यामुळे, त्या भाषेचा अभ्यास करण्याच्या हेतूने त्या मद्रासला गेल्या. पण तेथल्या लोकांच्या अपरिचित भाषेमुळे त्यांचे तेथे काही जमेना. इतक्यात सरदार लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख, रावसाहेब महादेव गोविंद रानडे, वामन आबाजी मोडक, दादोबा पांडुरंग, डॉ. भांडारकर, तेलंग चंदावरकर प्रभृति पुरोगामी मंडळींकडून त्यांना पुन्हा निकडीचे बोलावणे गेले आणि