पंडिता रमाबाई सरस्वती : Page 2 of 31

काशीयात्रा म्हणजे एक मोठे श्रमसाहसाचे दिव्यच असे. शीरसलामत घरी परत येईल तो भाग्यवान! वाटेत त्यांची बायको वारली. तिला त्यांनी प्रतिज्ञेप्रमाणे थोडेफार संस्कृत गुपचुप शिकवले होते. काशीयात्रा पुरी करुन वडिलांची परत रवानगी केल्यावर अनंतशास्त्री काशी येथेच आणखी शास्त्राध्ययन करण्याठी राहीले तत्वज्ञ्यानाचा विशेष अभ्यास करण्यासाठी काश्मीरलाही गेले. तेथल्या महाराजांनी दान दक्षणा मानपानाने त्यांची पुष्कळ संभावना केली. नेपाळच्या महाराजांनी सुद्धा या दक्षिणी पंडिताचा चांगला सत्कार केला.

विवाहाचा अवचित योग

नेपाळहून गुजरात दक्षिण प्रांताचा प्रवास करीत परत येत असताना पैठण मुक्कामी वाईचे माधवराव अभ्यंकर या गृहस्ताची गाठ पडली. संसाराचे गाडे मनासारखे नीट जुळले नाही म्हणजे पुर्वीचे लोक वैतागाने काशीयात्रेला निघून जात असत. अभ्यंकर हे असेच वैतागून आपली बायको आणि अंबाबाई नावाची अवघी नऊ वर्षाची एक कन्या बरोबर घेऊन रस्त्याला सास्ष्टांग नमस्कार घालीत घालीत काशीला चालले होते. अनंतशास्त्र्यांचे वय या वेळी ४४ वर्षांचे होते, तरी ते निरोगी सशक्त आणि तेजस्वी पाहून माधवराव अभ्यंकरांनी त्यांना अंबाबाईचे शास्त्रोक्त पाणीदान करुन, ती नवरा बायको पुढे चालती झाली.

'हा भ्रष्टाचार चालायचा नाही'

घरी परत येताच अनंतशास्त्र्यांनी आपल्या अल्पवयी लक्ष्मीबाई पत्नीला संस्कृत शिकवण्याचा उपक्रम चालू केला. त्यांचे अध्ययन जरी जुन्या धाटणीने झाले असले तरी देशाटन, पंडितमैत्री, ठिकठिकाणच्या समाजस्थितीचे अवलोकन, यामुळे अनंतशास्त्री कडवे विवेकवादी, चिकित्सक, आणि पुरोगामी वळणाचे बनले होते. बायकोला संस्कृत शिकवण्यचा हा सुधारकी बाटकेपणा घरातल्या आणि आजूबाजूच्या लोकांना मुळीच आवडला नाही. "स्त्रियांना कधी कोणी शिकवतात काय ? शिकून त्या पुढे काय दिवे लावणार. अनृतं साहसं माया त्या ’! छे आम्हाला हे साफ परवडणार नाही. बायकोला संस्कृत शिकवायचे म्हणजे काय ? संस्कृत म्हणजे देववाणी ! वेदवाणी! स्त्रियांना नि शूद्रांना ती उच्चारण्याचा अधिकारच नाही. असा सगळ्या गावात गलबला माजला. अशा गलबल्याला दाद देण्या इतके अनंतशास्त्री कच्या दिलाचे नव्हते. स्त्रियांनी सर्व प्रकारचे शिक्षण घेउन पुरुषांप्रमाणे विद्यावान, प्रज्ञावान झालेच पाहिजे. प्राचीन काळी अशा स्त्रीशिक्षणाचा प्रघात होताच होता. या सत्यशोधनाला ते धिटाइने चिकटून राहीले.

जयाचे नांव पुरूषोत्तम !

स्वता:चे घर आणि सारा गाव बायकोच्या शिक्षणाला विरोघ करतो असे दिसताच, अनंतशास्त्री आपल्या अल्पवयीन बायकोला बरोबर घेउन एको वस्त्रानिशी वनवासाला निघाले. याला म्हणतात कडवी तत्वनिष्टा ! सत्याचा शोध बिनचूक झाला, तत्व मनाला खासखूस पटले का त्याच्या सिद्धीसाठी सर्वस्वावर निखारे ठेवायलेही जो तायार होतो, तोच पुरूषोत्तम, तोच खरा पंडित आणि तोच मानवतेचा खरा उद्धारक. जगातल्या सगळ्या सुधारणा असाच तत्वनिष्ठ सत्यशोधकांनी घडवून आणलेल्या आहेत.

अनंतशास्त्री बायकोला घेउन जे निघाले ते थेट तृंगभद्रा नि कृष्णा नद्यांचा उगम झाला आहे अशा गंगामूल अरण्यात गेले. जिकडे तिकडे दाट भयंकर अरण्य. लांडगे, कोल्हे, वाघ, अस्वलांचा सुळसुलाट. माणूस तिकडे चुकूनसुद्धा फिरकायचे नाही. अशा निर्जन ठिकाणी ठाम मांडले. वस्तीच्या पहिल्याच रात्रीचा अनुभव लक्ष्मीबाई सांगत असत. त्या दिवशी रात्री डोके टेकायला आम्हाला निवा-याची जागा तर नव्हतीच, पण अंग टाकायलाही गवत नव्हते. चक्क डोंगराळ जमिनीवर डोके टेकून आम्ही राहिलो. चालण्याच्या थकव्याने कसाबसा डोळा लागतो न लागतो तोच अगदी जवळपास वाघाची डरकाळी ऐकू आली. माझ्या काळजात धस्स झाले.

उद्योगाने जंगलाचे मंगल

शाबास त्या अनंतशास्त्र्याची ! आपल्या अल्पवयीन पत्नीला धीर दिलासा देउन, त्या भयाण जंगलात झाडी तोडून निवा-याला जागा तयार केली. लाकूडफाटा जमउन एक झोपडी बांधली.जंगली फळांमुळांवर आहार चालवला. लक्ष्मीबाईंना संस्कृताचे पाठ देउन तिला विद्यानंदाची गोडी लावली. सुरवातीला तिला हे जंगल नविन कंटाळवाणे नि एकलकोंडे गेले खरे, परंतु दोघेही धाडसी नि उद्योगी असल्यामुळे, तेथे त्यांनी थोड्याच दिवसात फळबागा नि शेतवाडी तयार करून संसाराची मांडणी केली. लक्ष्मीबाईंचे संस्कृता चे अध्ययन सारखे वाढत चालले.

विद्वान सर्वत्र