पंडिता रमाबाई सरस्वती

प्रबोधनकार हिंदुत्ववादी होते यात दुमत नाही. पण त्यांचं हिंदुत्व नेहमीच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा खूप वेगळं होतं. नाहीतर हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्म स्वीकारणा-या पंडिता रमाबाईंचं चरित्र लिहिण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. त्यांनी महिलांसमोर रमाबाईंचा आदर्श उभा ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हे पुस्तक मुळातून वाचायला हवं कारण हे त्यांच्या अगदी सुरुवातीच्या चरित्रांपैकी एक आहे.

शंभर वर्षापूर्वी

"सुधारकांचे रक्त पडे, तेव्हा सुधारणा घडे"

महाराष्ट्रात आज मुलांच्या बरोबरीने मुलींचेहि शिक्षण सर्रास सारखे चालू आहे. हजारो मुली साक्षर सुविद्य आणि पदवीधर झाल्या आहेत, नित्य होत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने समाज-राजकारणात त्या श्रमत झगडत आहेत. पण शंभर वर्षापूर्वी

स्त्रियांना साक्षर करणे महापाप

स्त्रियांना साक्षर करणे महापाप समजण्यात येत असे, हे वाचून ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल त्या काळात मुलगी आठ वर्षाची झाली रे झाली का तिचा विवाह केलाच पाहिजे, असा संभावित रिवाज होता. केला नाही तर आई-बापाला नि सग्यासोय-यांना समाजात उजळ माथ्याने वावरण्याची पंचाइत. आठ वर्षाच्या मुलीचा नवरा किती वयाचा असावा, याचाही धरबंद नसे. चाळीस वर्षाचा बाप्याही चालायचा. तशात दुर्दैवाने एखादी बाला विधवा झाली तर तिचे सासरी माहेरी भयंकर हाल व्हायचे. तिचा केशकलाप न्हाव्याकडून भादरून विरूप करायचे, उपाशी ठेवायचे, मारहाण करायचे, भाजायचे, लासायचे. "अवदसा, पांढ-या पायाची, हिने नव-याला खाल्ला, राक्षसीण आहे ही" असे शिव्याशाप त्या बिचारीला दररोज खावे लागत असत. कधीकधी तिला घराबाहेरही हाकलून देण्यात येत असे. शिक्षण नाही, कसली विद्या नाही, समाजात कोठे थारा नाही, काय करायचे तिने? कोणाच्या घरी आचारीण, मोलकरीण म्हणून मरण येइतोवर जगावे किंवा तळीविहिरींचा ठाव घ्यावा. ५० वर्षापर्यंत संभावित म्हणविणा-या पांढरपेशी हिंदु जमातीत अशी स्त्रियांची अवस्था होती बरे! ती समूळ पालटण्यासाठी, 'स्त्रियांना शिक्षण दिलेच पाहिजे आणि बाल किंवा तरूण विधवांचे असले हाल कायमचे नाहीसे झालेच पाहिजेत' या निर्धाराने समाजाची निंदा, छळ, उपहास सोसून ज्या अनेक सुधारकांनी धडाडीचे प्रयत्न केले, त्यात पंडिता रमाबाई अग्रेसर अबलोद्धारक म्हणून महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासात चिरंजीव झाल्या आहेत. अनाथ अपंगांच्या सर्वांगीण उद्धारासाठी त्यांनी केलेली चळवळ आणि मिळालेले ठळक यश, यांची चित्त थरारून सोडणारी कहाणी आता वाचा नि ऐका. 

                                 प्रकरण १ ले

                             शुद्ध बीजापोटी .  

केल्यानें देशाटन पंडितमैत्री सभेंत संचार।

शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार॥

रमाबाईंचे वडिल अनंतशास्त्री डोंगरे. चितपावन कोकणस्थ ब्राम्हण. जन्म सन १७८६. दक्षिण कानडा जिल्ह्यात घाटाच्या पायथ्याशी मंगळूर म्हणजे माळहेरंबी येथले राहणारे. घराणे मोठे पण कर्जबाजारी. त्याला कर्ज मुक्त करण्यासाठी आपण लवकर लवकर विद्याध्ययन केले पाहिजे, या हेतूने अनंत बालपणीच घर सोडून बाहेर पडला. सहा वर्षापर्यंत त्याने अनेक नामांकीत गुरूंजवळ शास्त्राध्ययनाच्या संथा घेतल्या. मोठमोठ्या ज्ञानवंतांच्या संगतीने आचार विचारांची नैतिक कमावणी होत होती. शृंगारी मठाचे एक शंकराचार्य अनंताचे गुरूबंधू होते.

विद्येच्या बाबतीत अनंत अल्पसंतुष्ट नव्हता. विशेष ज्ञानाच्या प्राप्तीसाठी श्रीमंत पेशव्यांच्या पुणे राजधानीत गेला. दुसरे बाजीराव पेशवे यांची पत्नी सौ वाराणशीबाई यांना संस्कृत शिकण्यासाठी नेमलेले रामचंद्रशास्त्री साठे यांची शागीर्दी अनंताने पत्करली. वरचेवर त्याला शनिवार वाड्यात जाण्यायेण्याचे योग लाभले. वाराणशीबाई आपल्या मधुर आणि शुद्ध वाणीने हजारो संस्कृत श्लोक अस्खलित घडघडा पाठ म्हणताना पाहून ऐकून अनंताला मोठे कौतुक वाटले. येथेच प्रथम त्याला स्त्री शिक्षणाचे महत्व पटले. मी ही आपल्या पत्नीला अशीच शिकवीन, ही त्याने मनोमन प्रतिज्ञा केली. बाजीरावाची ब्रम्हावर्ताला रवानगी झाल्यावर साठेशास्त्री त्यांच्याबरोबर निघुन गेले. म्हणून म्हैसूर दरबारचे सभापंडीत रामशेषशास्त्री द्रवीड यांच्यापाठी पुढील अध्ययनासाठी अनंताने तिकडे प्रयाण केले.

म्हैसूरला त्याने दहा वर्षे काढली. विद्वान शास्त्री म्हणून त्याचा पुष्कळ गौरव झाला. संपत्ती पालखी चवरीचा मान मिळाला. घरी माळहेरंबीला परत येउन त्याने कर्जधाम फेडले आणि वडिलांना बरोबर घेउन सहकुटुंब अनंतशास्त्री काशीयात्रेला गेले. त्या काळाची