सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 7 of 16

तितक्याच जोराने उत्तर दिले,  ‘तुझी अवलाद जैनाची आहे की x x x? मी फासावर गेलो तरी बेहत्तर, पण खोटे काम कधी करणार नाही. जा तुला वाटेल ते कर. या वेळी पहाटेच्या ५चा सुमार होता. थोड्याच वेळात एकदम काही पोलिस  ‘च्या माडीवर घुसले आणि भाऊरावला पकडून घेऊन गेले.

कोल्हापुरी पोलिसांचे अत्याचार

भाऊरावची अटक केवळ पोलिसी प्रेरणेनेच होती असे नव्हे, तर त्याच सूत्र खुद्दाकडूनच हालत होती. वाटेल ती उलाढाल करून डांबर प्रकरणात लठ्ठ्यांना लोळविण्याचा महाराजांचा निश्चयच होऊन बसला होता. मग त्याच्या मागे पोलिसांची कानटोचणा असो, नाहीत लठ्ठ्यांच्या हितशत्रूंची हातलावणी असो. भाऊरावला जामिनावर सोडविण्याचा काही मित्रांनी प्रयत्न केला, पण अर्ज नामंजूर झाला. इतकेच नव्हे, तर तास प्रयत्न करणाराना, याद राखून ठेवा या त्र्याक्षरी पदवीचे धमकीदान झाले.

कावळ्याचा बंगला हे एक कोल्हापुरातले कुप्रसिद्ध स्थळ आहे. या एका बंगल्यात अत्याचाराचे अमानुष प्रकार झाले आहेत तितके यमपुरीच्या देखाव्यात सुद्धा पहायला मिळायचे नाहीत. तुला जरीमरी येवो असा कोणी कोणाला शाप दिला तर मनुष्य त्याची हसण्यापलीकडे किंमत करणार नाही, पण १९०७ सालापासून कोल्हापुरात कावळ्याचा बंगला हे नाव ऐकताच शेकडो माणसे गारठून जात असत. आरोपीच्या तोंडून सत्याचा अर्क पिळून काढण्याचे पोलिसी घाणे या बंगल्यात राजरोज रात्रंदिवस सुरू असत. अमक्या तमक्याला कावळ्याच्या बंगल्यावर नेला इतकी बातमी कळली की खुशाल त्याची सर्वांनी आशा सोड वी. परत आलातर पुनर्जन्म होऊनच यायचा. सत्यार्क पिळून काढण्याची सर्व आयुधे या बंगल्यात सज्ज असत आणि ती पद्धतशीर उपयोगात आणणारे कसाईही त्याकाळी कोल्हापुरी पोलीससेनेत पुष्कळ असत.

भाऊराव जर डांबर - प्रकरणात अण्णासाहेबा लठ्ठे यांच्याविरुद्ध साक्षीचा पुरावा करता, तर सहज पाच सहा हजार रुपये खिशात टाकून मोकळा सुटता. पोलिसांनी मुस्कटामारी, उरधोंडी, बरगडफोडी वगैरे प्राथमिक समजुतीचे प्रयोग भाऊराववर केले. पण तो काही बनेना ! अखेर त्याला कावळ्याचा बंगला दाखविला. तेथे तक्तपोशीच्या बहालाला भाऊरावचे हातपाय बांधून टाकीत आणि खालून पाठीवर व कुल्यवार चामड्याच्य हंटरचे तडाखे हाणीत. एक हंट-या थकला की दुसरा. दुस-यानंतर तिसरा. थोडी विश्रांती, पुन्हा मागील अंकावरून पुढे चालू असा प्रकार रक्तबंबाळ होईपर्यंत चाले. भाऊरावशिवाय आणखीही काही तरुण पोलिसाच्या पहा-यात बहिर्विधीसाठी बाहेर असताना, वाटेत एक रिकामी विहीर भाऊरावला लागली. विहिरीत पाणी नव्हतचे. वर खाली बाजूला काळा कडक फत्तर. क्लेशपूर्ण जिवाचा पूर्णविराम करण्याचीही संधी छान आहे. असा निश्चय करून, पोलिसांची नजर चुकवून, भाऊरावने  हिसक्यासारखे खाली डोके करून धाडकन विहीरीत उडी घेतली.कल्पनी ही की डोके कातळावर आपटून चटकन प्राण जावा ! परंतु, वेळ आली तरी काळ आला नव्हता. खाली डोके करून उडी मारली, तरी अखेर तळाच्या चिखलावर भाऊराव  ढुंगणावरच सुखरूप येऊन आदळला. कोठे काहीच दुखापत नाही. पूर्वी लहानपणी सर्पदंश झाला होता, त्यातूनही बचावला. त्यानंतर हा आत्महत्येचा प्रसंग विलक्षण चमत्काराने टळला. पोलिसांनी धामधूम करून आरोपीला वर काढले. मॅजिस्ट्रेटपुढे उभे केले. जबानी घेतली. आत्महत्येचा आरोप ठेवला. दवाखान्यात रव नगी झाली. येथून सुटल्यावरही पुन्हा कावळ्याचा बंगला आणि शिक्षा आहेच. त्यापेक्षा पुन्हा एकदा या कष्टमय जिवाचा अंत करण्यासाठी भाऊरावने तावदानाची काच फोडून त्याची मूठभर भुकटी खाल्ली. तास दीड तास झाला तरी काही परिणाम होईना, म्हणून वर एक बाटलीभर घासलेट पिऊन टाकले, पण काहीच परिणाम झाला नाही. पुढ दवाखाना सुटल्यावर न्यायदान होऊन, आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल ८ महिन्यांची साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. कैद साधी होती. तरी भाऊरावला बिलंद कटवाला दामू जोशाच्याच कोठडीत कोंडण्यात आले होते.

प्रो. लठ्ठे यांना प्रत्यक्ष जरी अटक केली नव्हती, तरी त्यांच्यावर गुप्त पोलिसांची सक्त छाया ठेवण्यात आली