सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 16 of 16

उपयोगिलेल्या स्पष्टोक्तीचा असाच उपयोग करून घेणे, यालाच राजकारणी न्यायबुद्धी असे म्हणतात, अलिकडे हिंदी वृत्तपत्रांवर सत्ताधा-यांची केवढीही करडी नजर असली, तरी असल्या न्यायबुद्धीला चालना देण्याचे कार्यच ती आपल्या स्पष्टोक्तीने जुळवून आणीत असतात हे विसरून भागणार नाही. सारांश, कोल्हापुरी पोलिसांच्या अत्याचाराचा संबंध महाराजांशी जोडण्याचा अर्थ आमच्या वाक्यातून मुळीच निघत नाही आणि तसा आमचा हेतूही नव्हता व कधी असणारही नाही. महाराजांना या गोष्टी फार मागाहून कळल्या व त्याविषयी काही कडक उपायही त्यांनी योजले होते. अत्याचाराच्या खरे खोटेपणाविषयी शंका निरसनार्थ सावरकराप्रमाणे भाऊराव  पाटील ईश्वलरकृपेने प्रत्यक्ष जिवंत आहेत आणि त्यात महाराजांचा काही संबेध असल्याचे तेही जर म्हणत नाहीत तर आम्ही तरी कोठून विधान करणार. सारांश कोणत्याही दृष्टीने पाहिल्यास आमच्य विधानात शाहू महाराजांच्या चारित्र्याला धक्का देण्याइतके सूक्ष्म अथवा भरीव काहीच नाही मात्र भलत्या कल्पनेची कावीळ झालेल्या डोळ्यां ना सगळा लेखच पिवळा दिसला, तर आम्हापाशी कसलाच उपाय नाही.

तक्रारीचा उगम कोठून ?

या एका मुद्याची शहानिशा केली की आम्ही लेखणी खाली ठेवणार. दि. मॅ. साहेबांना हा प्रश्न आम्ही स्पष्ट विचारला. ते म्हणाले, ओरिएंटल ट्रान्सलेटरकडून हे भाषांतर आलेले आहे. अशा गोष्टी योग्य अधिका-यांच्या नजरेला आणणे हे त्यांचे कर्तव्य आहे. यापलिकडे मला काही माहीत नाही.

ओ. द्रॅ. च्या या कर्तव्यक्षमतेबद्दल आम्ही प्रथमच आभार मानून ठेवतो. प्रश्न इतकाच सुचतो की ही त्यांची कर्तव्यदक्षता या एकाच बाबतीत एवढी जागरूक का बनली ? कोल्हापुर संस्थान आणि शाहू महाराज यांची हवी तशी बीभत्स व बेजबाबदार निर्भर्त्सना करण्यात पुण्याच्या भटीपत्रांचा नंबर पहिला आहे. ही त्यांची अनेक वर्षांची परंपरा आहे. अजूनपर्यंत ती अखंड सुरू आहे. नुकत्याच घडलेल्या धनवडी अत्याचाराच्य मागे पुणेरी भटांना दिसणा-या कटातही त्यांनी कोल्हापूरच्या महाराजांना गोवण्याची नातूगिरी केलेली आहे. या सर्व प्रसंगी ओ. द्रा. ने पुण्याच्या डि. मॅ.चे लक्ष वेधण्याची अशीच कर्तव्यदक्षता दाखविली होती काय ? गुदस्त साली सर्रास भटी पत्रातून होळकरांची बीभत्स विटंबना सुरू असताना ओ. द्रा. ने हीच कर्तव्यदक्षता गाजवली होती काय ? देशी संस्थानांची सकारण निष्कारण विटंबना करणा-या किती भटी पत्रकारांना सरकारने आजपर्यंत जाब विचारलेला आहे ? का भटांना सारे खून माफ करण्याचा मनुस्मृती अंमल अजूनही चालूच आहे ? खालसा वृत्तपत्राच्या टिकेपासून देशी संस्थानाचे संरक्षण व्हावे म्हणून प्रिन्सेस प्रोटेक्शन अक्ट नावाचा कायदा अस्तित्वात आहे.

होळकर प्रकरणी या क्टचा मुंबई सरकारने उपयोग करावा, म्हणून प्रबोधनद्वारा आम्ही अट्टाहासाची अनेक मराठी इंग्रजी आर्टिकल्स खरडली. पण तिकडेही ओ. ट्रा.चे लक्ष गेल्याचे दिसले नाही. पुढे तो क्ट नीट वाचून पाहता ; ज्या राजावर टीका टिपणी झाली असेल त्यांनी प्रत्यक्ष तक्रार केल्याशिवाय ब्रिटीश सरकार त्या कायद्याचा अंमल करू शकत नाही अशी त्यात मेख आढळली. प्रस्तुत प्रकरणी तशी तक्रार कोल्हापुराकडून झालेली आहे काय ? असा स्पष्ट प्रश्न डि. मॅ. साहेबास विचारता त्यांनी ते मला समजण्यास काही मार्ग नाही असे उत्तर दिले. अर्थात येथेच सारा मार्ग खुंटला. तथापि लेखी नसेल तर तोंडी काहीतरी सूचनेचा प्रकार झाल्याशिवाय ही तक्रार जन्माला आली नसावी खास काहीही असो आणि तक्रार करणारा कोणीही असो ; आम्ही आमचा खुलासा स्पष्टपणे केला आहे. तेवढ्याने कोणाची शंकानिवृत्ती खास होईल, अशी आम्हाला आशा आहे. कोणत्याही बाबतीत प्रमादाक्षमत्वाची ( infallibility) घमेंड आम्ही मारणे शक्यच नाही. ते माणसाला साधत नाही, ते माणुसकीचेही होणार नाही. अर्थात वृत्तपत्रकारांचे सत्यनिरूपणाचे प्रामाणिक कर्तव्य बजावीत असताना एखाद्या शब्दाने, वाक्याने, संदर्भाने किंवा आणखी कशानेही कोणाचीही मनोवृत्ती दुखावली गेली असल्यास केवळ शाहू महाराजांसाठी एक सोडून लाख वेळा दिलगिरी व्यक्त करण्याचा दिलदारपणा ( chivalry) प्रबोधनकारात खास आहे.