सत्यशोधक भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणप्रसाराच्या कामाला संपूर्ण भारतात तोड सापडणं कठीण आहे. आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार कोण असतील तर ते कर्मवीरच. ते प्रबोधनकारांना आपले गुरू मानत. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेच्या पसा-याचा सारा आराखडा दादरच्या खांडके बिल्डिंगमधे तयार झालाय. कर्मवीरांचं पहिलं चरित्रही प्रबोधनकारांनीच लिहिलंय. ते आधी प्रबोधनमधे छापून आलं होतं. त्यातील छत्रपती शाहूंच्या एका उल्लेखामुळे त्यावेळी मोठा वादंग उडाला होता. सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्प परिचय...

महाराष्ट्रात भिक्षुकशाहीची सत्ता अजून बरीच वरचढ आहे. विशेषतः लोकशिक्षणाची दोन शस्त्रे – शिक्षणसंस्था व वृत्तपत्रे – ही सर्वस्वी भिक्षुकांच्या हाती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत या सत्तेपुढे कोणाचेही काही शहाणपण चालणार नाही. गेली २५-३० वर्षे भिक्षुकी वृत्तपत्रांनी हजारो गारगोट्या हिरे म्हणून लोकांच्या गळ्यात बांधल्या. देशभक्त, राष्ट्रसेवक देवर्षि, महर्षि, तपस्वी, वीर, पीर, समाजभूषण, शिक्षणालंकार इत्यादी नाना प्रकराचे शेंदूर माखून त्यांनी शेकडो दगडधोंडे देव म्हणून गावोगावच्या नाक्यानाक्यां वर थापलेले आढळतात. या सवंग देवांच्या देवळात शेकडो स्वार्थी व लु च्च्या लोकांनी शिरकाव करून घेतला आहे व त्यावर त्यांनी आपल्या पोटापाण्याच्या वंगणाच प्रश्न अगदी बुळबुळीत रीतीने कायमचा सोडविलेला आहे. गेल्या १५ वर्षांत फंडगुंडगिरी ही एक बिनचूक देशोद्धारक यक्षिणीची कांडी जोरावर झाल्यामुळे तर हजारो भिक्षुकी गांधिलमाशा मधमाशांची रूपे पांघरून या राष्ट्रीय पोळ्यावर गावोगाव घोंगावत असतात. भिक्षुकी वृत्तपत्रे म्हणजे वाटेल त्या क्षुद्राला कलमाच्या एकाच फटक्याने देवकळा देणा-या विश्वकर्म्याची मंदिरे बनली आहेत. भिक्षुकी पत्रांत मेलेला कोणता माणूस सार्वजनिक कामात पडत नसे ? गावोगावच्या पोराटोरांना माहीत असलेल शेकडो कु-हाडीचे दांडे भिक्षुकी कृपेने देशाचे देशपांडे म्हणून प्रतिष्ठितपणे मिरवत आहेत. बोलून चालून भिक्षुकशाही हाच मुळी एक भयंकर गांधिलमाशांचा पोळा ! मग त्यांच्या घोंगावण्याने जनतेची दिशाभूल का होणार नाही ? आणि हि-यांच्या भावाने गारगोट्या का विकल्या जाणार नाहीत ?

भगवंताने देशसेवेचा ताम्रपट भिक्षुकांनाच एकट्याला दिलेला नाही, त्यांच्या ब-या वाईट अभिप्रायावर जगण्या मरण्याची बळजबरी सुरू होणे शक्य नाही त्यांच्या कारस्थानाला कोणी कितीही बळी पडला, तरी तो जर अस्सल निष्ठावंत कर्मयोगी असेल, तर त्या कारस्थानाने त्यांचा रोमही वाकडा होणार नाही, भिक्षुकीशाहीच्या हाती शिक्षणप्रसार व वृत्तपत्राचे प्रचंड शिंगोडे असल्यामुळे त्यांना आपल्या भिक्षुकी गुंडगिरीचा ध्वनि जबरदस्त घुमविता येतो. परंतु तेवढ्यामुळे असे समजण्याचे मुळी गोष्टीच काही कारण नाही, की महाराष्ट्रात त्यांच्या कंपूशिवाय दुसरे कोमी मितभाषी एकनिष्ठ स्वार्थत्यागी देशसेवक व जनसेवक नाहीत. आहेत, ठिकठिकाणी निश्चयाने, एकनिष्ठेने आपापली विहीत कर्तव्ये मिटल्या तोंडी करणारी अनेक नररत्ने आहेत. ती शोधून काढून त्यांच्या कर्तबगारीचा आणि शीलाच्या कमावणीचा परिचय विवेकी महाराष्ट्रीयांना करून देणे प्रबोधनाचे कर्तव्य आहे. भिक्षुकांना आणि त्यांच्या पायतणाचे नाल बनलेल्यांना ही रत्ने गारगोट्या वाटली, तर ती त्यांच्या दृष्टीची पुण्याई समजून विवेकवादी जनांनी तिकडे दुर्लक्षच करणे श्रेयस्कर आहे.

सातारचे भाऊराव पाटील

हे नाव आजकाल भिक्षुकी कंपूत मोठ्या आचक्या दचक्याचे झाले आहे. सातारा जिल्ह्यातच काय पण अवघ्या महाराष्ट्रात हे नाव निघताच ब्राह्मणेतर जनतेत एका जोरदार चैतन्याचे वारे स्फुरण पाऊ लागते, टिळकी पुण्याईवर महाराष्ट्राच्या सर्व कारणी नेतृत्वाचे आसन फुकटाफाकट पटकविणा-या नरसोपंत केळकरांपासून तो थेट टिळकी कारस्थानांना बळी पडून हतप्रभ झालेल्या अच्युतराव कोल्हटकरापर्यंत असा एकही भिक्षुक सापडणार नाही की ज्याला भाऊराव पाटलांची कर्मयोगी कदर आणि बहुजन समाजावरील त्यांचे जिव्हाळ्याचे वजन माहीत नाही. कृतज्ञतेला पारखा न झालेला असा कोणता अस्पृश्य आहे की जो हे नाव ऐकताच या या पाटील मास्तरा विषयी आदरयुक्त भावनेने आनंदाश्रू ढाळणार नाही. सातारा जिल्ह्यात असा एकही शेतकरी नाही की भाऊरावाने ज्याच्या माजघरापर्यंत प्राथमिक शिक्षणाचे लोन नेऊन पोचविलेले नाही. ब्राह्मणेतर बहुजन – प्रबोधनाची अशी कही संस्था, चळवळ, परिषद, सभा, जलसा, व्याख्यानमाला, जत्रा किंवा शाळा आढळणार