अखेरचे भाषण : Page 4 of 4

असं असं केलं तर आपण त्यातून बरोबर सुटून जाऊ हे हुन्नरी माणसाचं नेहमीचं ध्येय आहे, आजकाल काय, एकदा एस.एस.सी. झाले की नोकरी पाहिजे. अरे, इतर काय गुण आहे का तुझ्यात ? काही नाही ! केवळ सुरक्षित पगाराची नोकरी पाहिजे. हे अलिकडच्या तरुणांनी सोडलं पाहिजे, मला काय करता येईल, ते मी स्वतंत्र करीन ! आपल्याला काय पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करावं, याचाच ध्यास असावा. अशा हुन्नरामुळे मी काही करू शकलो. ज्याच्या अंगात हुन्नर आहे, हिंमत आहे, जिद्द आणि स्वाभिमान आहे, असा माणूस कधीही बेकार आढळायचा नाही. हा माझ्या जीवनाचा साक्षात्कार आहे, सिद्धांत आहे.

 

परमेश्वरानं परिस्थितीच्या ठोकरा देत देत, ज्या ज्या ठिकाणी मला नेलं आणि त्या रंगभूमीवर मला उभा केला, तिथली भूमिका मी चांगली वठवली. मग ती भूमिका कशी का असेना ! नाटकातही काही वर्षं घालवली. तिथंही काही केलं. जे केलं ते मात्र समाजासाठी केलं. हे व्यसन आहे. बघा. ते एकदा लागलं की सुटत नाही. आजही सुटलं नाही. रोज वाचतो. सकाळचा चहा झाला की वर्तमानपत्र पुढ्यात येतात. सगळी वाचून काढतो. काय जरूर आहे हो या वयामध्ये ? पण पाहतोय, काय चाललंय ! विचार करतो, या धोरणांनी देशात आणि महाराष्ट्राचं कसं काय पुढे होणार आहे ? पुढारी लोक असं असं का बोलतात ? त्याची कारणं काय ? ह्याचा माझ्या डोक्यामध्ये नेहमी विचार सुरू असतो. सकाळी अकरापर्यंत माझं वृत्तपत्र वाचन सुरू असतं. नवीन नवीन माहिती मिळते. आजच सकाळी भेटायला आलेल्या अनंत काणेकरांनी सांगितले, अरे बाबा, मी वाचतोय म्हणून वाचलोय !’

 

जय हिंद ! जय महाराष्ट्र !