अखेरचे भाषण : Page 3 of 4

तुटला ! मी म्हटलं, बरं झालं, बला गेली ! कोण संबंध जोडायला जातोय !’ पुढे मुंबईला मला महाराज भेटले. म्हणाले, काय रे वांड ! एकदम आमच्यावर कोसळून पडलास. म्हटलं, हो, पडलो कोसळून !’... अरे, हो त्यांची मी सुधारणा करणार आहे.

 

.... सुधारणा करायची तेव्हा करा. पण हा मार्ग चुकीचा आहे !’ हे तुम्हाला कुणी तरी सांगायला पाहिजे. उगाचंच आपलं म्हणायचं नाही, मी मराठ्यांसाठी असं करतो नि अस्पृश्यांसाठी तसं करतो. सुधारणेसाठी सहा पोरं काय, लॉकअपमध्ये टाकायची ? काय, आहे काय ? त्या पोरांनी काय समजायचं ? तुम्ही सुधारणा पुष्कळ कराल हो ! पण आजची परिस्थिती काय ?’ मला सत्य सांगताना स्नेहही आडवा आणला नाही तो असा. कोल्हापुराच्याच नाही तर अनेक राजे-महाराजांशी माझा कामानिमित्ताने स्नेह जमला. त्यात बडोद्याचे महाराजही होते. इंदूर, देवासचे महाराज होते. मी नेहमी बोलत असे, राजे महाराजांच्या ताटाला ताट आणि पाटाला पाट भिडून जेवलेला हा ठाकरे, आज भाड्याच्या खोलीत राहतो. कारण मी सगळ्यांचा अनुभव घेतलाय. जो ते आपल्याला कामापुरता असतो, सत्य स्पष्ट बोललं की संबंध सुटला ! असे नाना त-हेचे अनुभव जीवनगाथेत लिहिले आहेत. आपण ते वाचा. त्याच्यापासून काही शिकण्यासारखं असेल ते शिका. मी अनेक कलांमध्ये शिरलो. प्रसंगाने. पण  डगमगलो नाही. आजच्या बेकार तरुणांना मी एकच सांगतो, तुमच्यामध्ये जर हुन्नर असेल, तर तुम्ही कधीही बेकार राहणार नाही. मी अनेक नोक-या केल्या आणि सोडल्या. पत्नीने एकदा विचारलं, काय हो ?’ तिला सांगितलं, तुला तुझी खंडणी पहिल्या तारखेला हातात मिळाली म्हणजे झालं ना ? (हशा) तू आणि तुझा संसार, बघून घे. खंडणीची तारीख चुकायची नाही. आम्ही एकदा फोटोग्राफीचा धंदा काढला. आता भांडवल कुठून आणायचं ? आमचे एक स्नेही होते. ते कॅम-याचे व्यापारी. एस. महादेव अँड सन्स, ते माझे शेजारी. त्यांच्या दुकानातून नवा कोरा कॅमेरा आणला. लॅबसाठीचं सामान आणलं. केमिकल आणलं. संधीही चालून आली. लग्नसराईचे दिवस होते. कर्जतपर्यंत गेलो. रोज नवरा-नवरीचे वीस-पंचवीस फोटो काढायचे. चार महिने काम केलं. बायकोची खंडणी बरोबर दिली. संसार तिने केला. संसारात मी कधी पाहिलं नाही. घरात काय आहे, नाही याचा कधी मी विचार केला नाही. त्यामुळे तांदूळ-डाळीचे भाव वाढले.... कोणच्या लेकाला माहिताय ? (हशा) तेल महाग झालं !’... अहो, कसलं तेल ? गोडं, खोबरेल की कसलं ? ह्या बाबतीत मी मूर्ख होतो. अहो, जे केलंच नाही ते कळणार कसं ? सर्व संसार तिच्यामुळेच झाला आणि मी माझ्या समाज प्रबोधनाच्या व्यसनात बुडालो. त्यामुळे हातून काही सत्कार्य घडलं, असं मला प्रामाणिकपणे सांगावसं वाटतं.

 

मी साईन बोर्ड पेंटिंग केले. मुंबईला आलेला मी तरुण, नोकरीला होतो. दरमहा पंचवीस रुपये पगार. पण आजचे पंचवीस रुपये निराळे आणि त्यावेळचे निराळे, पंचवीस रुपये हातात आले की स्वर्गाला हात पोहोचायचे. मी रहात होतो त्या बाजूला साईन बोर्ड पेंटिंगचं दुकान होतं. एकदा त्याच्या दुकानात सहज बसलो असता त्याला विचारलं, धंदा कसा चालतो ?’ तो म्हणाला, सुरेख चालतो !’...सुरेख म्हणजे दरमहा किती कमाई होते ?’ तीस चाळीस. सिझन असेल तेव्हा ऐंशी—नव्वदपर्यंत जातो. म्हणजे हा निरक्षर माणूस म्हणा, थोडा शिकलेला कोकण्या सत्तर – ऐंशी – नव्वदचे आकडे सांगतो आणि आमचे पांढरपेशी पंचविसाच्या करता जळतात ?’ ठरवलं. आता नोकरी बंद. मग साईन बोर्ट पेंटींग करू लागलो. फोटो एन्लार्जमेंट करू लागलो. यंत्राशिवाय. आईल पेंटींगची पोर्टेट केली. जे पडेल ते काम करायचो. अमुक एक प्रसंग आहे. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय,