अखेरचे भाषण

माझी जीवनगाथा आणि ऊठ म-हाट्या ऊठ या पुस्तकांचे प्रकाशन प्रबोधनकारांच्या मृत्यूच्या दोन महिने अगोदर झालं. त्याप्रसंगी केलेल्या भाषणात प्रबोधनकारांनी आपल्या जीवनाचे सार मांडले आहे. तेच हे प्रसिद्ध भाषण.

 

सज्जन हो ! भाषणाच्या बाबतीत मैदान मारणारा तो ठाकरे आज नाही. प्रकृती क्षीण झालेली आहे. तेव्हा आज बोलतोय ते कृपया सहन करून घ्यावं. चार पिढ्यांचा काळ मी पाहिला, अनुभवला. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ यात फार बदल झालेला आहे. विशेषतः महिला वर्गाच्या बाबतीत ! महिलांनी फारच सुधारणा केलेली आहे. मला वाटतं, त्या काळी रूढी, धर्म, परंपरेच्या नावाखाली जे अनंत अत्याचार झाले, त्यांच्या सध्याच्या महिलांनी चांगला सूड उगवला आहे. सध्याच्या महिलांना पुष्कळ लोक नावं ठेवतात. मी म्हणतो, तुम्ही आणखी सुधारणा करा. खूप सुधारणा करा.

 

माझ्या लहानपणीची, १४ वर्षांचा असतानाची गोष्ट आहे. गंगाराम सुभेदार नावाचे एक मिलिटरी गृहस्थ पनवेलला वस्तीला होते. तुमच्या आमच्यासारखे चांगले कपडे घालून फिरायचे. तो, त्याची बायको, विधवा सून... कारण त्यांचा थोरला मुलगा चायनाच्या लढाईत मेला होता. रणांगणी, धारातीर्थी पडला होता. पण लोक त्यांना अशा प्रकारे वागवीत की, ते पाहून माझ्या मनात संताप उत्पन्न व्हायचा, हे असं लोक का करतात ? त्यांना न शिवण्यामागे असं काय महापातक त्यांनी केलं आहे ? ह्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांच्याशी मी ओळख करून घेतली. एकदा त्यांच्या घरी गेलो. चहा घेतला. ह्याची कुणकुण गावात पसरताच सगळीकडे बोंबाबोंब झाली. ठाक-यांचं कार्ट बिघडलं . पण त्या घरात एक मोठी घटना घडली. तिथे चहा प्यायला बसलो असताना, तिथला टापटीपपणा पाहून ते महारवाड्यातलं घर असं वाटत नव्हतं ते माझ्या घरासारखंच वाटलं. त्यांची सूनही चहा पिताना समोर होती. तिच्याशी ओळख झाल्यावर मी तिला म्हटलं ताई! तुझा नवरा रणांगणी मेला. पण तू एवढे दागदागिने घालतेस ? बरं, घातलेस तर घातलेस, मग कुंकू का लावीत नाहीस ? कुंकू लावायला हरकत नाही. विधवांनी कुंकू लावू नये, असं कोणत्या – मनुस्मृतीत लिहिलंय ?’ ती म्हणाली, मी तुमच्यासाठी कुंकू लावीत नाही !’ ती आणि मी समवयस्क, चपापलो, म्हणजे?’ वा S वा S वा S ती तरुणी ! तिने अशी उत्तरं द्यावी. म्हणाली, आमचे यजमान हे असे बिछान्यामध्ये लोळून मेले नाहीत. धारातीर्थ तलवार गाजवून मोक्षाला गेले. त्यांच आठवण म्हणून हे दागिने घालते... त्या मुलीचा – माझ्या त्य बहिणीचा माझ्या मनावर इतका विलक्षण परिणा झाला, की खरा ब्राह्मण नाटक लिहीत असताना, तिला मी विठू महाराची सून सीता ही भूमिका देऊन तिथे मी तिचं ऋण फेडलं.

 

अशा आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी येतात. त्यातून आपण घडत असतो. माझी आजीही अशीच ! आमच्या घराण्यात व्रत घेणारे लोक फार ! माझी आजी, म्हणजे वडिलांची आई.... तिने वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केलेलं मोफत प्रसूतीकार्य तब्बल साठ वर्षं अखंड चालवलं. तिचे नाव सीता असले तरी घरादारात ती बाय म्हणून ओळखली जात असे. बाय, बाई अडली आहे, चला. म्हणताच जेवणाचे ताट सारून ती चटकन जायची पनवेलच्या क्षेत्रामध्ये हजारो बालकांची तिने सुटका केली. मुलगा झारा तर, नारळ नि साखरेची पुडी आणि मुलगी झाली तर, नुसती साखरेची पुडी ; यापेक्षा चुकून कधी कुणाकडून तिने तांब्याचा छदामही घेतला नाही. हे काम ती धर्म मानून करायची आणि ते करीत असताना, जातपात, धर्मगोत, स्पृश्य-अस्पृश्य, हिंदू-मुसलमान असले भेद कधी मनात आणले नाहीत. मौज म्हणजे, हातून एखादी केस निपटेनाशी झाल्यावर डॉक्टरही निर्वाणीचा उपया म्हणून बायला बोलवायचे. एकदा पनवेलच्या मुसलमान पोलीस पाटलाची बायको अडली होती. सर्जनचाही इलाज