प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी: Page 10 of 324

रूजू होणार होता. २९ ऑक्टोबर १८२७ रोजी एलफिन्स्टनने राजाला निरोपाचे आणि एक प्रकारे शेवटचे पत्र लिहिले. त्यात त्याने राजाचे आभार मानले आहेत, राजाने दिलेल्या त्याच्या राजघराण्याच्या शकावलीचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. राजाचे भावी आयुष्य सुख समृद्धीचे जावो असे अभिष्टचिंतन केले आहे. त्यांच्या मैत्रीची आठवण पण सतत ठेवू, नव्या रेसिडेंटबद्दल-रॉबर्टसनबद्दल राजाने काढलेले धन्योद्गार आणि राजाने उदारहस्ते २५ हजार रुपयांची एलफिन्स्टन प्रोफेसरशिपसाठी दिलेली देणगी याचा आवर्जून उल्लेख केला आहे.

असे असताना लंडनला गेल्यावर त्यांचे मतपरिवर्तन झाले का, अथवा ब्रिग्जच्या गोपनीय पत्राचा, अहवालाचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि या प्रकरणात आपण तोंड उघडावयाचे नाही अशी शपथ त्याने घेतली होती, आणि म्हणून हे सारे उघड्या डोळ्यांनी तो तटस्थपणे पाहत राहिला होता. ग्रँटच्या बेचैनीने लिहिलेल्या पत्रांना तो प्रतिसाद देत नव्हता. रंगो बापूजीशी तो संबंध ठेवत नव्हता. सप्टेंबर १८४१ रोजी साता-याच्या काही मुसलमान सेवकांनी पाठविलेल्या पत्राची (हे दीर्घ मोडी पत्र इंडिया ऑफिस लायब्ररीत आहे) तो दखलसुद्धा घेत नाही. हे सारे काही गूढ वाटते.

एलफिन्स्टन आणि ग्रँट डफ या दोघांपेक्षा ब्रिग्ज मात्र निराळा होता. साता-यात असताना राजा त्याच्या मनातून उतरला असला तरी राजावर झालेला अन्याय त्याला सहन झाला नाही. रंगो बापूजीने आणि इतर ब्रिटिश सद्गृहस्थांनी जेव्हा झाला प्रसंग त्याच्या निदर्शनास आणला. तेव्हा या प्रकरणात त्याने हिरीरीने भाग घेतला. पार्लमेंटमध्ये भाषण करून राजाची बाजू प्रभावीपणे मांडली आणि रंगो बापूजीशी असलेल्या आपल्या मैत्रीचा जाहीर उच्चार केला. प्रबोधनकारांनी त्याचे समर्थ निवेदन आपल्या ग्रंथात दिले आहे. (पृ. २११-२१२) आपल्या आठवणीच्या ग्रंथात तो म्हणतो, साता-यात मी जेव्हा होतो, तेव्हा राजाला आपला कारभार सांभाळण्याचे सर्वाधिकार दिले होते, आणि तो त्यांचे एलफिन्स्टनने दिलेल्या सूचनाप्रमाणे काटेकोरपणे पालन करीत होता, त्यात थोडीही कसर तो करीत नव्हता. तो धूर्त होता. आपल्या देशबांधवात असलेल्या पुष्कळशा गैरसमजुतीपासून मुक्त होता ; न्याय आणि नैतिकता यासंबंधी त्याच्या काही ठाम कल्पना होत्या, आणि त्यामुळे खोटेपणा करण्याची त्याच्यापासून तिळमात्रही अपेक्षा करता येणार नाही.

सातारा प्रकरणांतील ग्रँट डफ, एलफिन्स्टन आणि ब्रिग्ज यासंबंधित ब्रिटिश अधिका-यांच्या भूमिका समजावून घेतल्यानंतर, या प्रकरणाला विशिष्ट वळण लावणा-या बाळाजीपंत नातू याच्या कारस्थानाचा आपणास थोडक्यात परामर्ष घ्यावयाचा आहे. पाचवडच्या एका भिक्षुक भटाचे पोर ते काय, आणि राज्यक्रांतीच्या काळात स्वदेशी मुत्सद्यांच्या नाकात वेसणी घालून त्यांना आपल्या धोरणावर नाचवते काय ?’ असा सवाल करून प्रबोधनकारांनी या खलपुरुषाचे कपटकारस्थान विस्तृतपणे मांडले आहे.

पेशव्यांच्या फडात कारकुनी मिळाली नाही म्हणून पेशव्यांचे शत्रू इंग्रज यांच्या नोकरीत तो सामील झाला, आणि त्याच कारणावरून प्रतापसिंहानेदेखील त्याला आपल्या सेवेत दाखल करून घेण्यास इंग्रजांना संमती दिली. वास्तविक बाळाजीचा उपयोग जसा एलफिन्स्टनने बाजीरावाविरुद्ध करून घेतला. तसाच त्याला साता-याबाबतही पुढे मागे जरूर पडल्यास होईल असे त्याला वाटत असावे. प्रतापसिंहाची सुटका करण्यास आपण मदत करू असे आश्वासन देताना एलफिन्स्टनने रंगो बापूजीला अगदी बजावून सांगितले होते की, चुकूनसुद्धा ही गोष्ट बाळाजीला समजता कामा नये. एलफिन्स्टनने पुढे मोठ्या धूर्तपणे बाळाजीची नेमणूक ग्रँटचा सहायक म्हणून केली, आणि इंग्रजांना सातारच्या राजघराण्याशी उद्भवलेल्या प्रारंभीच्या समस्या सोडविण्यास त्याची खूप मदत झाली. प्रथम त्याने माईसाहेबांची समजूत काढून आपल्या मुलांचा मार्गदर्शन करण्याचा म्हणजेच पर्यायाने रीजंट बनण्याचा विचार त्यांच्या डोक्यातून काढून टाकला. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तनख्याचा. राजाची मागणी ३० लाखांची होती पण बाळाजीच्या मध्यस्थीने ग्रँटने ती साडेतीन लाखांवर मिटवली. बाळाजीपंताने ग्रँटला एकदा सांगितले की, ‘‘शाहू महाराजांनी हे राज्य एका ब्राह्मणाच्या स्वाधीन केले हा फार मोठा शहाणपणा केला ; नाहीतर मराठी साम्राज्य यापूर्वी केव्हाच लयाला गेले असते. ’’ (४-५-१८१८)

४ मार्च १८१८ रोजी बाळाजीपंत साता-यास प्रथम प्रतापसिंहाशी बोलणी करण्यासाठी