प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी: Page 9 of 324

तहातील अटीशी विसंगत आहे, तसेच ब्रिटिश सरकार साता-याचा सर्व मुलुख आपल्याकड़े घेऊ शकत नाही. आप्पासाहेबाच्या दत्तकाला मंजुरी देणे शहाणपणाचे नाही इत्यादी अनेक गोष्टी, ज्या प्रतापसिंहाचा पाठपुरावा करणा-या होत्या त्या तो केवळ स्वतःच्या समाधानासाठी एलफिन्स्टनला कळवितो आणि स्वस्थ बसतो. जाहीर उच्चार करीत नाही.

ग्रँटनंतर साता-याचा रेसिडेंट म्हणून कॅ. जॉन ब्रिग्ज याची नेमणूक झाली. राजाच्या वृत्तीत थोडासा फरक पडत चालला आहे असे त्याला वाटू लागले होते. शेजारच्या कोल्हापूर संस्थानाला जे स्वातंत्र्य आहे तसे आपल्याला मिळावे. सत्तांतरानंतर पूर्वीच्या तहनाम्यांत बदल व्हावा असे त्याला वाटणे स्वाभाविकही होते. आपले राजाविषयीचे मत ब्रिग्जने अधिकृतरित्या सरकारकडे पाठविले नाही. पण आपली नाराजी व्यक्त करणारे एक गोपनीय पत्र ८ ऑक्टोबर १८२६ रोजी एलफिन्स्टनला लिहिले आहे. विठ्ठलपंत दिवाणाच्या मृत्यूनंतर ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा बाळासाहेब नावाच्या एका आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला दिवाणपदी नेमले हे ब्रिग्जला आवडले नाही. राजाच्या वर्तनात काही सुधारणा झाली नाही, आपण स्वतंत्र आहोत, तहनामा बंधनकारक नाही, रेसिडेंटची जरूरी नाही असे तो जे जाहीरपणे बोलतो. तसेच कोल्हापूरकरांशी संबंध जोडण्याची त्याची तीव्र इच्छा सफल झाली तर सातारा राज्याचा कारभार आपल्या हाती परत घ्यावा लागणार असे ब्रिग्जने आपल्या पत्रात सूचित केले आहे. आपली मुदत संपत आली आहे, आणि या सा-या प्रकरणांतून आपली लौकरच सुटका होणार याचा आनंदही तो येथे व्यक्त करतो. आपण राजाविरुद्ध अधिकृत तक्रार करीत नाही असे ब्रिग्ज म्हणतो त्यावरून त्याचा आशावाद व्यक्त होतो, आणि सारे काही ठीक होईल असेच त्याला वाटत असावे असे दिसते.

ग्रँटसारखे राजाने ब्रिग्जशी मैत्रीचे संबंध ठेवले नाहीत याचे कारण त्याला इंग्रजाचा स्वभाव कळला नाही, त्याचे सारे आडाखे चुकले असे ब्रिग्ज एलफिन्स्टनच्या एका पत्रात म्हणतो, (१२ नोव्हेंबर १८२६) तो पुढे असेही म्हणतो की त्याच्या अव्यवहारीपणामुळे तो माझ्या मनातून उतरला आहे. पण त्याचा निरोप समारंभ मोठ्या सौहाद्रपूर्ण वातावरणात पार पडला. राजाने दिलेली भेट हि-याची अंगठी, त्याने प्रेमाने स्वीकारली. असे सर्व ठीकठाक असले तरी पण सातारा सोडण्यापूर्वी त्याने मुंबई सरकारला जो एक विस्तृत अहवाल सादर केला आहे त्यात त्याच्या राज्यकारभाराची भलावण केली आहे पण नजिकच्या माणसांवर देणग्यांची खैरात करणे, कोणावर विश्वास न ठेवणे आणि इतर काही बाबींसंबंधी खंतही व्यक्त केली. शेवटी त्याने असा इशारा दिला आहे की, राजाला वेळीच जागे करणे, त्याला ताकीद देणे हे त्याच्या हिताचे आहे. राजा एखाद्या कारस्थानात अडकला की त्याच्यावरचा आमचा विश्वास नष्ट होईल, आणि त्याचा नाश होईल (१ जानेवारी १८२७)

राजा कोणत्या कारस्थानात गुंतला असेल या ब्रिग्जच्या विधानावर एलफिन्स्टनला विश्वासच बसत नाही. ब्रिटिश सरकार उलथून पाडण्याच्या कोणत्याही कटात राजा असणार नाही असे त्याला वाटत होते. पण राजाबद्दल काही विश्वसनीय आणि निश्चित बातमी असेल तर मात्र त्याला ताकीद दिली पाहिजे असे तो प्रभारी रेसिडेंट सिम्पसन यास कळवितो (१९-२-१८२७) आणि या बातमीने थोडेसे जरी काही तथ्य असेल तर आपल्यावर सरकारचा विश्वास नाही अशी त्याची भावना होऊ देऊ नका. फक्त सौम्य ताकीद प्रथम द्या, पक्का अधिकृत पुरावा हाती आल्याखेरीज कारस्थानाविषयी काही बोलू नका. असे तो सिम्पसनला बजावतो. (६ मार्च १८२७) राजाविषयी विनाकारण प्रतिकूल मत करून घेतले आहे अशी भीती त्याला वाटते म्हणून तो त्याला लिहितो, राजा कारस्थानात गुंतलाच असेल, तर त्याला दिली जाणारी शिक्षा अगदी सौम्य असेल. (७ मार्च १८२७) यावर, सकृतदर्शनी राजा जरी गुंतलेला वाटत असला, तरी आता लगेच त्याला काही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. असे सिम्पसन एलफिन्स्टनला आश्वासन देतो. (९ मार्च १८२७) ऑक्टोबर १८२७ मध्ये एलफिन्स्टनने मुंबईचा निरोप घेतला. जॉन मालकम हा १ नोव्हेंबर १८२७ रोजी त्याच्या जागी