प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी: Page 7 of 324

एलफिन्स्टन साहेबाची मर्जी संपादन करणे, कारण मित्र म्हणून तो फार मोठा माणूस आहे, पण एकदा का जर तो संतापला, तर त्याच्या सारखा भयंकर माणूस नाही. ( great in friendship and terrible in wrath ) याची जाणीव त्याला सतत करून देणे, इत्यादी कामे त्याने अक्कल हुशारीने पार पाडली, आणि १८२२ साली राजाकडे कारभाराची सर्व सूत्रे स्वाधीन करून तो २८२३ रोजी लंडनला परतला. राजा आणि ग्रँट हे समवयस्क होते आणि त्यामुळे त्या दोघांची चार वर्षांत चांगलीच मैत्री जमली. सातारा राज्य, राजा आणि प्रजा यांच्या हिताची त्याला जाणीव होती हे त्याच्या उपलब्ध खाजगी पत्रव्यवहारावरून लक्षात येते. भारतातून निवृत्त होऊन येणा-या कंपनीच्या अधिका-याकडे तो आवर्जून साता-याची चौकशी करीत असे. १८२३ साली राजाला धाडलेल्या एका पत्रात तो म्हणतो, साता-याविषयी सगळ्या चांगल्या गोष्टी ऐकण्यास मी उत्सुक आहे. जगातल्या कोठल्याही भागापेक्षा मला साता-यात अधिक रस आहे. १८३० साली साता-याचा रेसिडेंट रॉबर्टसन त्याला भेटला आणि म्हणाला, श्रीमंत महाराज आपले रयतेला बहुत सुंदर आणि योग्य आहेत. आपले राज्य मोठ्या दक्षतेने आणि उदारत्वे करून चालवितात व आपला देश सुरक्षित राखिला आहे. इतके असून कंपनी सरकारशी अकृत्रिम स्नेह करून असतात. याजप्रमाणे मी सदोदित अपेक्षा करितो की जे जे उत्तरोत्तर गवरनर जनरल तिकडे येतील त्यांनी आपली स्तुती बादशाहापाशी करावी, जीपासून मला जल्मबर समाधान होईल. (इंग्रजी पत्राचे मराठी भाषांतर पेशवे दप्त भाग ४२ :४५) राज्यकारभाराविषयी सूचना देताना १८२८ च्या एका पत्रात तो राजाला लिहितो, कार्यप्रवणता, सावधानता, काटकसर आणि उदारता ही तुझ्या कार्याची चतुःसूत्री असली पाहिजे. ( Be active, vigilant, economical and liberal )  सातारची प्रजा, शेतीव्यवसाय, शिक्षण इत्यादी विविध क्षेत्रांकडे आपल्या सेवानिवृत्तीनंतरही त्याने आपले लक्ष पुरविले होते. सातारा राज्य आणि राजा वाचले पाहिजेत असे त्याला सतत वाटत राहिले. सातारा देश माझा खासगत असता तर इतके अगत्ये केले नसते, परंतु आपले देशाचे सर्वकाळ हित व्हावे हीच त्याची भावना होती.

१८३९ची राजाची पदच्युती, आणि १८४८ साली झालेले सातारा राज्याचे विलीनीकरण यासंबंधीची आपली मते निर्भिडपणे एलफिन्स्टनला कळवून कंपनी सरकारचे कसे चुकले हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. साता-याचा राजा आणि त्याचे राज्य हे अशारीतीने आपल्या डोळ्यादेखत नाहीसे व्हावे, आपण लावलेले रोपटे, जे डौलाने वाढत चालले होते ते असे एकाएकी उखडून टाकले जावे याची खंत त्याला शेवटपर्यंत लागून राहिली होती. (त्याचा मृत्यू २८ सप्टेंबर १८५८ रोजी वयाच्या ६९व्या वर्षी झाला) सातारा प्रकरणात ब्रिटिशाची वागणूक प्रामाणिकपणाची नव्हती याबद्दल त्याच्या मनात तिळमात्रही शंका नव्हती, असे असूनही आपली खाजगी मते जाहीरपणे मांडण्याचे आणि रंगो बापूजीला मदत करण्यासाठी एलफिन्स्टन आणि ग्रँटसारखी माणसे पुढे का आली नाहीत हे समजत नाही, आणि त्याची खंतही वाटते.

प्रतापसिंह आणि ग्रँट यांची मैत्री असाधारण स्वरूपाची होती. कृष्णराव रामराव चिटणीस याने रचलेल्या समकालीन पद्यमय चरित्रात म्हटले आहे, ``ग्रांटसाहेब बडो धूर । सब राजनमो महशूर । उसे राजा प्रताप चतुर । मिलाय लिया अपनेमे ।। ग्रँट स्वतःला मराठा माणूस म्हणवून घेत असे. मराठ्यांचा संपूर्ण इतिहास त्याने लिहिला तो केवळ ज्या मराठ्यांपासून आपण भारताचे राज्य जिंकून घेतले ते मराठे कोण आहेत, हे सा-या युरोपला कळावे या हेतूने होय. त्यामुळे ग्रंथाच्या नामाभिधानात मोगलांचा –हास आणि ब्रिटिश सत्तेचा उदय हे जॉन मरे या प्रसिद्ध प्रकाशकाने सुचविलेल्या नामांतराचा धिक्कार करून तो आपले हस्तलिखित परत घेऊन येतो, आणि या पुस्तकावर स्वतःचे सुमारे २००० पौंड खर्च करून लाँगमन कंपनीमार्फत प्रकाशित करतो. असा हा तडफदार ग्रँट सातारा प्रकरणात मूग गिळून