प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी: Page 6 of 324

त्याला दिलेल्या एका सूचनेत एलफिन्स्टन  म्हणतो, राजाची प्रजा आणि स्वतः राजा यांच्या मनावर असे बिंबवावे की, सातारा राज्याच्या हद्दीतील खेड्या-खेड्यातून राजाचा झेंडा फडकविला असला, आणि तेथील रहिवासी हे जरी राजाचे प्रजाजन असले तरी, नावापुरते सुद्धा शिवाजीच्या साम्राज्याचे पुनर्जीवन करण्याचा इथे इरादा नाही. ( it is not intended to revive even in name the empire of seevajee ) ब्रिटिश सरकार हे सार्वभौम आहे हा विचार जर राजाने आत्मसात केला नाही तर आपण निर्माण केलेले हे सातारा राज्य एक दिवस आपल्यावरच उलटेल अशी धोक्याची सूचनाही त्याने ग्रँटला दिली होती. छत्रपती हा किताब साहजिकच इंग्रजी तहनाम्यात नाही पण त्याचा मराठीत तर्जुमा करताना लिपिकाने छत्रपती हा शब्दप्रयोग केला आहे.

एलफिन्स्टन हा साम्राज्यवादी असला तरी ब्रिटिशांचे साम्राज्य भारतावर किती काळ टिकेल याबद्दल त्याच्या मनात शंका होतीच. आपला मित्र जेम्स मॅकिनटोश याला १८१९ साली लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की, ``ब्रिटीश सरकार हे कालांतराने नष्ट होणार हे माझे विधान कोणत्याही पूर्वग्रहावर आधारलेले नसून निव्वळ तर्कावर आधारलेले ( not prejudice, but reason ) आहे.’’ भारतीयांच्या शिक्षणासाठी प्रादेशिक भाषेतून तयार केलेल्या त्याच्या पुढे पडलेल्या पुस्तकांचा ढिगारा पाहून त्याचा सहकारी ब्रिग्ज त्याला हे सार कशासाठी, असा सवाल करतो. त्यावर एलफिन्स्टन म्हणतो, एतद्देशीयांना शिकविण्यासाठी पण त्याचप्रमाणे आपल्याला युरोपला परत जाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी ( To educate the natives, but it is high road back to Europe )

वास्तविक एलफिन्स्टन हा प्रतापसिंहाच्या राज्यकारभारावर खूष होता. साता-याच्या एका भेटीत ग्रँट डफच्या तालमीत तयार झालेल्या या राजाच्या वाड्यातील खाजगी खोलीला तो भेट देतो. त्या खोलीत टेबल-खुर्चीवर बसून शिवाजीचा हा वंशज कामकाज करतो याचा त्याला अचंबा वाटतो. आणि तो म्हणतो अशा प्रकारच्या शांततावादी वंशजाबद्दल त्याच्या पूर्वजाला (शिवाजीला) काय वाटले असते हे मला सांगता येणार नाही. ( I do not know what his ancestor would think of so peaceful a descendent ) राजाला देखील एलफिन्स्टनबद्दल आदर वाटत असे. एलफिन्स्टनच्या निरोप समारंभप्रसंगी जे मानपत्र त्याला देण्यात आले होते त्यावर पहिली स्वाक्षरी प्रतापसिंहाची होती. १८३६ पासून ब्रिटिस अधिका-यांनी जेव्हा राजाविरुद्ध कुभांड रचण्यास सुरुवात केली तेव्हा आपल्या २३ मार्च १८३७ च्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्स या कंपनी सरकारच्या सर्वश्रेष्ठ संस्थेकडे केलेल्या विनवणी पत्रात तो आल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एलफिन्स्टनचे मत मागवावे अशी विनंती करतो. ग्रँट डफने देखील १८३९ ते १८४९ असा सतत दहा वर्षे पत्रव्यवहार करून राजाचे निर्दोषित्व एलफिन्स्टनला पटविण्याचा प्रयत्न केला, पण त्याने या प्रश्नावर राजाच्या बाजूने अथवा विरुद्ध असे कोणतेच मत ग्रँट आणि इतर ब्रिटिशांप्रमाणे का केले नाही हे एक न उकलणारे कोडे आहे. समजा एलफिन्स्टन या काळात भारतातच असता तर त्याने हे संकट टाळले असते का ? का साम्राज्यवादी एलफिन्स्टनला जे होते आहे ते ठीकच आहे असे वाटत होते ? का याच उत्तर आजपर्यंत तरी कोठे सापडले नाही. रंगो बापूजी त्याला कधी भेटलाच नाही काय ? का त्याच्या प्रयत्नाला यशच आले नाही ? एलफिन्स्टनने अशी विरक्ती आणि मौन का स्वीकारले होते ?

या प्रकरणापाशी सुरुवातीपासून संबंधित असलेली दुसरी प्रमुख व्यक्ती म्हणजे कॅप्टन जेम्स ग्रँट. १८१८ साली प्रथम राजाला भेटला, आणि दिवसेंदिवस त्याचे ऋणानुबंध दृढच होत गेले. राजाच्या पदच्युतीचे, वनवासाचे आणि शेवटी अवतार समाप्तीचे सर्वांत अधिक दुःख जर कोणा इंग्रजास झाले असेल, तर ते जेम्स ग्रँटला, असेच म्हणावे लागेल.

१८१८ च्या एप्रिल महिन्यात ग्रँटने साता-याच्या राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली, एलफिन्स्टनच्या सूचनांप्रमाणे राज्यकारभार पाहिला. राजाला शहाणे करून सोडले. तहनाम्याचे काटेकोर पालन करणे आणि