प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी: Page 5 of 324

मूलतः साम्राज्यवादी होते, पण इंग्रजांचे राज्य लोकांनी स्वीकारावे म्हणून त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी काही अंशी त्यांनी उदारमतवादी धोरणाचा पुरस्कार केला होता. मन्रो हा प्रामुख्याने सेनानी होता, आणि एलफिन्स्टनच्या राजकीय डावपेचांना त्याचा पूर्ण पाठिंबा होता. एलफिन्स्टनची शेवटचा पेशवा अशी तो संभावना करीत असे.

पेशव्याशी लढा देऊन कंपनीने जो मराठी प्रदेश जिंकला होता त्याची विल्हे कशी लावावयाची ही एक मोठी समस्या गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्जपुढे होती. कंपनी सरकारपुढे दोन पर्याय होते – एक शिवाजीच्या वंशजाला एक छोटीशी जागीर देऊन त्याला स्वस्थ बसविणे आणि दोन राजाला जिंकलेल्या मराठी मुलखाचा विशेषत : - नीरा-भीमा नद्यांमधला एक छोटासा प्रदेश बांधून देणे आणि त्याला मर्यादित स्वरूपाचे सार्वभौमत्व देणे, मर्यादित सार्वभौमत्व ही संकल्पना राज्यशास्त्राच्या कोणत्याही सिद्धांतात बसत नाही. सार्वभौमत्वाचे विभाजन म्हणजे सार्वभौमत्वाचे विनाशीकरण होय. साता-यासाठी इंग्रजांनी ही खास राजनीती शोधून काढली होती. ब्राह्मणांनी बळकावले तरी मराठी सत्ता छत्रपतीच्या वंशजाला परत मिळवून देऊन मराठ्यांची सहानुभूती आणि पाठिंबा कंपनी सरकारला मिळवावयाचा होता. इकडे ब्रम्हवृंदाना खूष करण्याकरिता आणि लिखापढी केलेले निष्ठावंत कारकून कंपनी सरकारला मिळावेत म्हणून श्रावणमाशी रमण्यांत ब्रम्हवृंदांना जी दक्षिणा मुक्तपणे वाटली जात असे, त्याच दक्षिणेचा एक फंड बनवून त्यातून संस्कृत कॉलेजची (हेच पुढे पूना कॉलेज आणि नंतर डेक्कन कॉलेज बनले) कल्पना निघाली आणि आपल्या उदारमतवादाचे प्रदर्शन करून त्याने ब्राम्हणांचा ही विश्वास संपादन करण्याचा आणि पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना देखिल ब्रिटिश राजवट हे ईश्वरी वरदान वाटू लागले, अशा या साम्राज्यवादी एलफिन्स्टनने इंग्लंडमधील समकालीन तत्त्वज्ञ जेरेमी बेंथॅम यांच्या अधिकांचे अधिक सुख या उदारमतवादाचा बुरखा घेऊन आपले मूळ साम्राज्यवादी स्वरूप झाकण्याचा प्रयत्न केला.

एलफिन्स्टने २५ सप्टेंबर १८१९ रोजी ११ कलमी तहनामा राजाबरोबर केला तो म्हणजे पुढे होणा-या सामीलनाम्याची पूर्वतयारी होती असे म्हणता येईल. विशेषतः करारातील २ आणि ५ या कलमानी राज्याच्या विलिनीकरणाचे सूतोवाच करून ठेवले होते. कलम २ म्हणजे इंग्रज बहादूर याचे सरकारांतून जे राज्य देत आहे ते घेऊन सरकार इंग्रेज बहादूर यांचे कह्यांत व मदतीत निरंतर संतोषाने राहून सरकार इंग्रेज बहादूर यांचे सल्ला-मसलतीने हरयेक काम करीत जाऊ. अशी नमनालाच भूमिका घेऊन कलम ५ मध्ये स्वच्छ इशारा दिला आहे की, महाराज याचे सरकारातून काही तफावत पडल्यास या तहनाम्याचे रूईने (विचाराने) महाराज याचे सरकारास जो फाईदा आहे तो बरबाद होईल. राजाने बाहेरच्या माणसांना भरावयाचे नाही. पत्रव्यवहार करावयाचा नाही, लग्नास बाहेरगावी जावयाचे नाही, अथवा घरगुती कारणास्तव बाहेरच्या लोकांशी व्यवहार करावयाचा असेल तर तो इंग्रजांच्या मार्फत करावा अशी जाचक बंधने या कलमात होती. हेच मर्यादित सार्वभौमत्वाची स्वरूप होते. ५ व्या कलमांत अशी सवलत दिल्याने जहागीरदारांचे फावले व राजाशी त्यांचा संघर्ष सुरू झाला आणि केवळ या ५ व्या कलमाचा आधार घेऊन रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नरला राजाच्या पदच्युतीची कारवाई करणे सोपे झाले. हे सारे एलफिन्स्टनने मोठ्या धूर्तपणे केले होते.

१८१९ च्या या तहनाम्यास १८२६ साली एक चार कलमी पुरवणी जोडून परत एकदा १८१९ सालचा तहनामा बळकट करण्यात आणि राज्याच्या सीमांचा तपशील, सहा जहागीरदारांची नावे, राजाच्या खर्चाची तरतूद, यांचा पुनरुच्चार करण्यात आला होता. प्रतापसिंहाला असे वाटत होते की, आपल्या नोकराला म्हणजे बाजीराव पेशव्याला एकदा तडीपार केले म्हणजे त्याने गिळंकृत केलेला सर्व मुलुख इंग्रज आपल्या स्वाधीन करतील. पण हा सरळसोट व्यवहार इंग्रजांच्या राजनीतीत बसत नव्हता. येथे एक गोष्ट प्रामुख्यानें लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की एलफिन्स्टनने शिवाजीच्या वंशजात रूढ झालेला छत्रपति ह्या किताबाचा प्रतापसिंहाच्या बाबतीत चुकूनसुद्धा कोठे उल्लेख केला नाही. साता-याचा पोलिटिकल एजंट म्हणून ग्रँटची नेमणूक केल्यावर