प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी: Page 4 of 324

हॉस्पिटल) केली आणि इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर चालून जाण्याचा दिवस निश्चित केला. पण सिद्ध झालेले सैन्य, जरीपटक्याची काठी मोडली, अपशकुन झाला म्हणून पुढे गेलेच नाही. बेसावध असलेल्या इंग्रजांची २८ ची काळरात्र टळली ते सावध झाले आणि जरीपटक्याची मोडलेली काठी मराठी राज्य मोडून बसली.

१८१७-१८ हा काळ प्रतापसिंहाच्या जीवनातील अत्यंत कसोटीचा काळ होता. रावबाजीने राजाला त्याच्या परिवारासह वासोट्यावरून बाहेर काढले आणि आपल्या युद्धछावणीत दाखल करून घेतले, आणि तो इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून आपल्याबरोबर रानोमाळ फरफटत नेले. पुढे युद्ध संपले. रावबाजीने शरणागती पत्करली. इंग्रजांनी राजाचा कब्जा घेतला. मोठ्या दिमाखाने त्याला साता-यास आणले आणि तेथून पुढे नवे पर्व सुरू झाले.

प्रबोधनकारांनी समकालीन मराठी, इंग्रजी साधने विशेषतः पेशवे दप्तर, मराठी दप्तर, रुमाल प्रवासवर्णने, ऐतिहासिक कागदपत्रे, एलफिन्स्टनचे चरित्र आणि तर इंग्रजी ग्रंथ यांचा तपशीलवार अभ्यास केला होता. याचा आपल्या ग्रंथात जागोजागी जे उल्लेख केले आहेत आणि आपल्या विधानांच्या पुष्ठ्यर्थ जी दीर्घ परिशिष्टे जोडली आहेत त्यावरून चांगलाच प्रत्यय येतो. प्रबोधनकारांपूर्वी हा विषय बी. डी. बसू, स्टोरी ऑफ सातारा कलकत्ता १९२२, आणि अडव्होकेट र. गो. राणे, सातारा, छत्रपति प्रतापसिंह महाराज यांचे चरित्र पुणे १९२९, या दोघांनी हाताळलेला होता, पण त्यांच्या निवेदनांना काही मर्यादा होत्या. प्रबोधनकारांनी त्या ग्रंथाहून अधिक तपशीलवार माहिती देऊन या विषयाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात १९४७ नंतर जी नवी साधने उपलब्ध झाली, ग्रंथ निर्माण झाले, त्याचा उपयोग करून घेऊन विद्यमान ग्रंथातील विषयाला पूरक अशा माहितीचा परिचय करून देणे आवश्यक वाटल्याने तसे करण्याचा प्रयत्न या प्रास्ताविकेत केला आहे.

प्रतापसिंहाला राज्य मिळाले, पण रंगो बापूजीला साता-यात नोकरी दिली गेली नाही. प्रतापसिंह त्याला विसरला होता की काही हेतूने त्याला बाजूला ठेवले होते हे सांगणे कठीण आहे. प्रबोधनकार म्हणतात, रंगो बापूजी उघडा राहिला (पृ. ४५) पण आपली सोय लावा असा त्याने आक्रोश केला नाही. सातारच्या नोकरीपेक्षा रंगो बापूजीने जाणूनबुजून कंपनी सरकारची नोकरी पत्करली असावी. कंपनीत राहून आपण राजाची सेवा चांगल्या रीतीने करू शकू अशी त्याची भावना असावी. कंपनी सरकार नेटिवास जवळ करीत असत त्यामागे त्यांचाही काही हेतू असावा. पेशव्यांच्या विरुद्ध बाळाजीपंत नातू आपणांस चांगला उपयोगी पडेल म्हणून एलफिन्स्टनने त्याला कंपनीच्या नोकरीत ठेवले होते, आणि त्याचा साहेबानी मराठी राज्याचा संपूर्ण नाश करण्याच्या कामी चांगला उपयोगही करून घेतला होता. रंगो बापूजी हा एलफिन्स्टनकडे प्रतापसिंहाची कैफियत घेऊन गेला तेव्हा छत्रपतीशी कंपनीची काही बोलणी चालली आहेत, ह्याचा सुतराम सुगावा बाळाजीपंताला लागू देऊ नकोस, असे त्याला बजावण्यात आले होते. कदाचित नातूच्या साता-यातील कटकारस्थानांवर बारीक नजर ठेवण्यासाठीच रंगो बापूजीला कंपनी सरकारच्या सेवेत रूजू करून घेतले असावे.

१८१८ ते १८३९ या २१ वर्षांच्या कालखंडात सात्या-यात जे जे घडले त्याचा साद्यंत वृत्तांत प्रबोधनकारांनी दिला आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक लिहिणे येथे आवश्यक नाही. परंतु एलफिन्स्टनची या संपूर्ण प्रकरणांतील भूमिका. सातारचा पोलिटिकल एजंट आणि राजाचा एक सन्मित्र म्हणून कॅप्टन जेम्स ग्रँट याने निवृत्तीनंतरही राजाशी ठेवलेला ऋणानुबंध आणि बाळाजीपंत नातू याने सूडबुद्धीने वागून प्रतापसिंहाचा कसा छळ केला, यासंबंधी प्रस्तुत लेखकाला नव्या संशोधनाच्या आधारे जी काही माहिती त्यासंबंधी येथे अल्पसे विवेचन करावयाचे आहे.

सातारा राज्याची निर्मिती हा एलफिन्स्टनच्या खास राजनीतीची विजय होता असे सामान्यतः मानले जाते. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात दख्खन देशाचा कारभार करण्यासाठी कंपनी सरकारने माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन आणि थॉमस मन्रो या दोन माणसांची नेमणूक केली होती, यांपैकी पहिला राजनीतीज्ञ होता आणि दुसरे रणनीतीज्ञ. कंपनी सरकारची दक्षिणेत आणि पुढे सर्व देशावर सत्ता दृढमूल करण्यास या दोघांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. हे दोघेही