प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी: Page 3 of 324

हे राष्ट्रसेवेसाठी आहे. वतनदार हे राज्याचे दायाद खरे पण दायाद म्हणजे वाटेकरी नव्हे तर स्वराज्यस्थापनेच्या कार्यातील सहकारी होत याची जाणीव ठेवून आपल्या वतनावर पाणी सोडून अनेक वतनदार शिवकार्यात सामील झाले होते. रंगो बापूजीला ही विचारसरणी मान्य असावी. १६५५साली गुंजणमावळच्या देशमुखाला अभयदान देताना शिवाजीराजे म्हणतात, आमच्या इमानावरी आपली मान ठेवून आम्हापासी येणे, कोणे गोष्टीची चिंता न करणे हे अभयदानच रंगो बापूजीला प्रेरणा देणारे ठरले असावे, हे कसल्याही पदाची अपेक्षा न करता केवळ प्रतापसिंहाच्या इमानावरी आपली मान ठेवून रंगो बापूजी निष्ठेने लढला हे प्रबोधनकारांनी रेखाटलेल्या त्याच्या चरित्ररेषेवरून स्पष्ट होते.

१८०३च्या वसईच्या तहाने रावबाजीने मराठी राज्य इंग्रजांच्या पतपेढीवर ( ?) गहाण टाकले होते. १८११ साली एलफिन्स्टन पुण्याचा रेसेडेंट म्हणून आला. त्याची नियुक्ती ही जणूकाय मराठी राज्याची दिवाळखोरी जाहीर करून ते लंपास करण्यासाठीच विधात्याने केली होती. योगायोग असा की हा साहेब १७९५ साली आले नशीब काढण्यासाठी म्हणून मायदेश सोडून भारतात आला आणि १७९६ साली त्याची पहिली नेमणूक बनारस येथे न्याय खात्यातील एक साधा सहाय्यक म्हणून झाली आणि नेमके त्याच वर्षी दुसरा बाजीराव पेशवा झाला. पुढे बाजीरावाला पदच्युत करून त्याची नेमणूक बनारस जवळच्या परिसरात ब्रह्मवर्तात केली, आणि दुर्दैवाने १८३९ साली सातारच्या प्रतापसिंहाला याच शहरी वनवासासाठी धाडण्यात आले आणि मराठ्यांच्या सत्तेची उरलीसुरली नावनिशाणीही उध्वस्त होण्याच्या मार्गाला लागली. काशी हे ठिकाण मराठ्यांच्या उत्कर्षकाल आणि विनाशकाल यांच्याशी अप्रत्यक्ष रित्या निगडीत झाले आहे. मराठा पातशहा एवढा पत्रपति झाला. या मंत्राचा उद्घोष करण्यासाठी गागाभट्ट काशीहून आला, परमानंदाने शिवचरित्राचे प्रवचन काशीत केले आणि त्याच काशीच्या परिसरात छत्रपतीचे राज्य खालसा करून प्रथम दुस-या बाजीरावाला आणि मराठी सत्तेची नामोनिशाणी देखील राहू नये म्हणून इंग्रजांनी प्रतापसिंहाला पाठविले. इतिहासाचे वळण हे असे अनाकलनीय असते.

प्रतापसिंहाला आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी रावबाजी आणि कंपनी सरकार आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. सातारचे राजे दुसरे शाहू महाराज तथा आबासाहेब यांच्या मृत्यूनंतर १८०८ साली प्रतापसिंह मराठी दौलतीचा धनी बनला. तुम्ही थोरले शाहू व मी थोरला बाजीराव असे आपले नाते राहील. अशी बतावणी करून राजाला आपल्या अंकित ठेवण्यासाठी साखरपेरणीचे काम रावबाजी सतत करीत होता. पण राजाची होणारी कुचंबणा लोकांच्या लक्षात येत होती. अशावेळी राजाची सुटका करण्यासाठी रंगो बापूजी पुढे आला. आणि काही निमित्ताने एलफिन्स्टनची गाठ घेऊन छत्रपतीच्या दैन्यावस्थेचे निवेदन त्याने साहेबास केले, आणि छत्रपतीला वाचविण्यासाठी मदतीची याचना केली. एव्हांना एलफिन्स्टने चिटणीसांनी सादर केलेल्या मराठ्यांच्या बखरीचे वाचन करून शिवशाहीचा परिचय करून घेतला होता, पण प्रत्यक्ष राजकारणात हस्तक्षेप करण्यापूर्वी सातारच्या किल्ल्यावर नजरकैदेत असलेल्या प्रतापसिंहाची त्यासाठी संमती हवी होती. रंगो बापूजीने आव्हान स्वीकारले आणि रामदासी शिष्यांचा वेष धारण करून जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करीत, अनेक हाल अपेष्टांना, मारहाणीला तोंड देत महाराजांची गुप्तपणे भेट घेऊन साहेबाला हवे ते संमतीपत्र मिळविले आणि त्याच्याकडून मदतीचे आश्वासन घेतले. आणि येथूनच रंगो बापूजीच्या कार्याचा शुभारंभ झाला. रावबाजीला याचा सुगावा लागला असवा कारण, त्याने प्रतापसिंहाची साता-याच्या किल्ल्यावरून उचलबांगडी करून वासोट्याच्या दुर्गम किल्ल्यांत त्याला कडेकोट बंदोबस्तात त्याने डांबून ठेवले. हा सारा रोमहर्षकारक प्रसंग प्रबोधनकारांनी मोठ्या कौशल्याने रंगविला आहे.

रंगो बापूजीच्या प्रयत्नामुळे असेल अथवा आपल्या जासूसामार्फत राज्याच्या छळासंबंधी मिळालेली माहिती एलफिन्स्टनला पटली असेल म्हणून असो, इंग्रज-मराठे संघर्षाला तेव्हापासून सुरुवात झाली. राजा इंग्रजाकडे जाऊ नये असे रावबाजीचे प्रयत्न आणि राजाला आपल्या बाजूला वळविण्याचे साहेबाचे प्रयत्न यांतून परस्परांचे संबंध बिघडत गेले. २८ ऑक्टोबर १८१७ रोजी बाजीरावाने आपल्या सैन्याची जमवाजमव गारपीरावर (आजचे ससून