प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी: Page 2 of 324

पुस्तकाच्या छपाईच्या कामात स्वतः लक्ष घातल्याने हे पुस्तक वेळेवर वाचकांच्या हाती देणे शक्य झाले आहे.

 

मधुकर आष्टीकर

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

प्रास्ताविक

राजर्षि छत्रपती शाहू महाराज मृत्यूशय्येवर असताना ५ मे १९२२ रोजी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शपथ घेतली होती की, सत्यनिष्ठ छत्रपती प्रतापसिंह आणि छत्रपतिनिष्ठ रंगो बापूजी यांचा तपशीलवार इतिहास मी लिहितो. ’’ सतत ३० वर्षे मेहनत करून, उपलब्ध सर्व साधनांची छाननी करून २१ मे १९४७ रोजी ग्रंथ पूर्ण केला आणि तो राजर्षींच्या स्मृतीला अर्पण केला. पुढे `प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी या नावाने हा ग्रंथ १९४८ साली प्रसिद्ध केला आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात एक मौलिक भर घातली.

 सातारचे राजे प्रतापसिंह आणि मावळातील एक वतनदार रंगो बापूजी यांची चरित्रे परस्पराशी इतकी निगडित आहेत की सातारा राज्याचा उदय, विकास आणि अस्त यांचा विचार करताना या दोन व्यक्तींच्या कार्याचा विचार एकत्रितपणे करणें अनिवार्य आहे, आणि म्हणूनच प्रबोधनकारांनी ग्रंथाची रचना तशी केली असावी. या चरित्रात इतर जी प्रसंगानुसार पात्रे आणि अमित्र येतात त्यांत बाळाजीपंत हा देशी आणि एलफिन्स्टन, ग्रँट डफ बिग्ज, कॅप्टन रॉबर्टसन, कॅप्टन कोगन, लाडविक यांच्यासारखे स्थानिक अधिकारी मित्र, कर्नल ओव्हन्स, रॉबर्ट ग्रँट, सर जेम्स रिवेट कारनेक हे जन्मवैरी आणि शेवटी डॉ. मिल्न, पार्लमेंटचा सभासद जोसेफ ह्यूम, जॉर्ज थॉमसन सारखे परदेशस्थ पाठीराखे यांचा उल्लेख करावा लागेल.

असे असले तरी या चरित्रग्रंथात प्रामुख्याने तीन व्यक्ती आल्या आहेत. दोन नायक – राजा प्रतापसिंह आणि रंगो बापूजी आणि एक खलनायक बाळाजीपंत नातू आणि त्याला हाताशी धरून खेळी करणारा मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट. सूडबुद्धीने माणूस पेटला म्हणजे तो कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचे अलिकडच्या काळातील एक उदाहरण म्हणजे बाळाजीपंत नातू. प्रबोधनकारांनी एकूण ३० प्रकरणांत (पृष्ठे २७५) आणि त्यास पूरक अशा विस्तृत परिशिष्टांत हे चरित्र कथन तपशीलवार केले आहे. त्यांच्या मते प्रतापसिंह आणि रंगो बापूजी म्हणजेच साता-याच्या राज्यक्रांतीचा इतिहास.

या ग्रंथाचा मुख्य चरित्र नायक म्हणजे रंगो बापूजी पण त्याच्या जन्ममृत्यूची नोंद कोठे आढळत नाही. रंगो बापूजीच्या आयुष्यातील लक्षणीय कार्याला उठाव मिळावा म्हणून त्याचे पूर्ववृत्त सांगतांना प्रबोधनकारांनी शिवाजीराजाच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याची पार्श्वभूमी मोठ्या औचित्यपूर्णपणे या ठिकाणी मांडली आहे. हिंदवी स्वराज्य या शब्द प्रयोगाबद्दल जरी काही मतभेद असले तरी दादाजी नरसप्रभूची पत्रे, हे म-हाष्ट्र राज्य आहे हा जेधे करीण्यातील उल्लेख या आणि इतर समकालीन साधनावरून शेंद्री (सह्याद्री) लगतच्या स्वयंभू रोहिरेश्वराच्या मनांतील हे राज्य व्हावे ही इच्छा `बंडवाल्या शिवरायांनी कशी पूर्ण केली याचे थोडक्यात पण समर्पकपणे निरूपण प्रबोधनकारांनी केले आहे आणि पुढील कथावस्तूची पार्श्वभूमी उत्तम रीतीने तयार केली आहे.

 १७व्या आणि काही अंशी महाराष्ट्राचा इतिहास हा वतनासाठी झालेल्या भांडणतंट्यांनी भरलेला आहे. ऐतिहासिक घराण्यांची जी कागदपत्रे प्रसिद्ध झालेली आहेत त्यात वतन हाच विषय प्रामुख्याने आलेला आहे. याचे कारण वतन हे सामाजिक प्रतिष्ठेचे आणि राजकीय आकांक्षेचे साधन होते. त्यातला आर्थिक भाग हा गौण स्वरूपाचा होता. उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा या लोकगीतावरून वतन ही संस्था मध्ययुगात सामाजिकदृष्ट्या किती मोलाची होती याची कल्पना येईल. दिल्लीपतीला नियंत्रित करणा-या महादजी शिंद्याला वकिल-इ-मुतालिक या पदापेक्षा श्री गोंद्याचा पाटीलबाबा हा किताब अधिक भूषणाचा वाटत होता. तेव्हा वतनासाठी धडपड ही गुप्ते घराण्यातील लोकांनाही अटळ होती, आणि म्हणून रंगो बापूजीने वतनासाठी धडपड केली या कारणाने त्याला दोषी ठरविणे योग्य नाही.

शिवरायाकडून आपल्या वंशंजांना मिळालेले वतन