प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान: Page 95 of 235

सावित्रीबाईंच्या कार्याची थोरवी गायिली आहे.
''1864 साली सावित्रीबाईंनी 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह मिशनरी छापखान्यात छापून प्रसिध्द केला. त्यात शिक्षणावरील काही कविता, बळी स्तोत्रे, उपदेशपर काही कविता आहेत. 1892 साली सावित्रीबाईंचा 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला. त्यात सावित्रीबाईंना ज्योतिरावांकडून कशी प्रेरणा मिळाली हे व्यक्त करून देशाचा प्राचीन काळापासूनचा सामाजिक इतिहास वर्णिलेला आहे.''105
सावित्रीबाईंना या कार्यात सनातनी लोकांकडून मानहानी व त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सावित्रीबाईंना शाळेत जात-येत असताना त्यांच्याबरोबर संरक्षणासाठी बळवंत कोल्हे याची नेमणूक केली होती. ज्योतिरावांच्या वडीलांनी सनातनी लोकांना भिऊन सावित्रीबाई व फुले यांना घराबाहेर काढले; परंतु त्यांची कार्यनिष्ठा व नीतीधैर्य अविचल होते.
''1856 रोजी सावित्रीबाई ज्योतिरावांना माहेरहून लिहिलेल्या एका पत्रात म्हणतात, 'पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे आहेत तसेच येथेही आहेत. त्यांना भिऊन हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे? सदासर्वदा कामात गुंतावे. भविष्य आपलेच आहे.''106
सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते रघुनाथ बनकर यांची कन्या कु. शांताबाईने 1939 साली सावित्रीबाईचे चरित्र लिहिले. त्या म्हणतात,
''सावित्रीबाई जातीने अस्पृश्यांच्या घरी जात व सदुपयोगाचे घुटके त्यांना पाजत. मी खात्रीने सांगते ही महासाध्वी जर एका ब्राह्मण समाजात जन्मास आली असती तर तिचे चरित्र त्या समाजाकडून त्वरित लिहिले गेले असते; पण ती क्षत्रिय माळी समाजात जन्मास आली.''107
प्रसिध्द चरित्रकार धनंजय कीर यांनी सावित्रीबाईने दाखविलेले अलौकिक धैर्य, सहन केलेल्या हालअपेष्टा, शिव्याशाप यांचा उल्लेख करून म्हणतात,
''19 व्या शतकात स्त्रियांच्या उध्दारासाठी व्यतीत केलेले सावित्रीबाईसारखे अन्य आदर्श नि उदात्त उदाहरण क्वचित आढळून येईल. पंडिता रमाबाईंचे पांडित्य नि भरारी त्यांच्या ठायी नसेल; परंतु मंगल धडाळी, निर्व्याज मानवता आणि भारतीय धवलात या गुणात रमाबाई त्यांची बरोबरी करू शकल्या नाहीत.''108
3.2.1.8 पंडित धोंडीराम नामदेव कुंभार
पं. धोंडीराम कुंभार हे फुले यांचे सहकारी होते. फुले यांच्या 'गुलामगिरी' या पुस्तकात ज्योतिबा व धोंडीबा यांच्यात झालेला संवाद. त्यातील धोंडीबा हेच होत.
''18 नोव्हेंबर 1875 रोजी ब्रिटिशांच्या आगमनाप्रसंगी त्यांनी पद्यरचना करून त्यांचे स्वागत केल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. सत्यशोधक समाजाचा खेडोपाडी प्रसार करण्यात ते अग्रेसर होते. त्यासाठी लेख, पद्यरचना, भाषणे इत्यादींचा त्यांनी वापर केला. सत्यशोधकाची चळवळ हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी चालविली आहे, अशी शृंगेरीच्या शंकराचार्यांची खात्री झाली. सातारा जिल्ह्यात दहिवडी येथे शंकराचार्यांचा मुक्काम असताना तेथील भिक्षुकांनी धोंडीराम कुंभार यांनी चालविलेल्या सत्यशोधक मताच्या प्रसाराबद्दल तक्रार केली. 25 डिसेंबर 1894 रोजी शंकराचार्यांची धोंडीराम कुंभारांबरोबर सतत पाच तास बोलणी केली; पण उभयतांत कोणती बोलणी झाली याचा तपशील उपलब्ध नाही; पण धोंडीराम कुंभार हे पक्के हिंदू धर्माभिमानी असून स्वत: हिंदू धर्माचे व सत्यशोधक धर्माचे माहितीगार आहेत, असे मोहर शिक्यांसह शिफारस देऊन त्यांची बोळवण केली.''109
धोंडीरामाला शंकराचार्यांकडून 'पंडितराव' हा किताब आणि त्यांच्या संस्थानचे सरसुभेपद मिळविल्याबद्दल त्यांना मानपत्रे देण्यात आली. त्यांनी अनेक पुस्तके सत्यशोधक चळवळीच्या ध्येय उद्दिष्टांना पूरक अशी लिहून या तत्त्वांचा प्रसार केला.
''कुंभार यांनी 'सत्यदर्पण' (1893), 'वेदाचार' (1896), 'तमाशा' (1897) अशी पुस्तके लिहिली. कुंभारलिखित 'वेदाचार' या पुस्तिकेत याज्ञिक भट हे भ्रष्ट, खादाड, हिंसक आहेत. वेदात अपवित्रता, अन्याय, निर्दयता, व्यभिचार, हिंसा, मद्यपान इ. गोष्टी होत्या. वैदिक दैवते, व्यभिचारी, चोर, लबाड होते ही बाब त्यांनी वैदिक साहित्यातील उतारे देऊन मांडली. याशिवाय 'दीनबंधू' पत्रात त्यांनी सत्यशोधक समाज व तत्त्वांचा महिमा सांगणारी अनेक पदे प्रकाशित केली.''110
3.2.1.9 मोरोपंत वाळवेकर
मोरोपंत वाळवेकर जातीने ब्राह्मण. फुले यांचे शाळकरी मित्र होते.
''फुले यांनी शूद्रातिशूद्रांसाठी काढलेल्या शाळेला जागा मिळावी म्हणून त्यांनीच ब्रिटिशांकडे अर्ज केला होता.''111
सुतिकागृहाच्या कामीही त्यांनी फुले यांना मदत केली होती. फुले वाळवेकरांच्या खाजगी मैत्रीविषयी फुले यांचे अनुयायी गोविंद काळे लिहितात,
''वाळवेकर मुंबईहून पुण्यास आले म्हणजे बहुतेक वेळा त्यांच्याकडेच उतरत असत. त्यांच्या व वाळवेकरांच्या मैत्रीच्या गोष्टी चालल्या म्हणजे ऐकण्यास बहार वाटे. ते एकमेकांची थट्टा

संदर्भ प्रकार: